मलाबार नीमची (मेलिया डुबिया) शेती करणारे युवा शेतकरी नवनाथ तोरणे

अवर्षणग्रस्त भागातील शेती म्हणजे निव्वळ जुगार असतो. मात्र इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडिंगच्या क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वावर तीन-तीन कंपन्या स्थापन करणाऱ्या युवा उद्योजक नवनाथ श्रीमंत तोरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील हराळेवाडी (ता.-मोहोळ) येथे तीन एकरात मलाबार नीम (मेलिया डुबिया)ची अडीच हजार रोपे लावून शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शेतीचा प्रयोग केला आहे. पारंपारिक शेतीमधून नुकसान सोसत कर्जबाजारी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवनाथ तोरणे यांचा हा नवा प्रयोग निश्चितच मार्गदर्शक ठरणारा असाच आहे.

उद्योजक युवा शेतकरी नवनाथ श्रीमंत तोरणे.

आपल्या व्यवसायाच्या कामाच्या निमित्ताने चेन्नईला जात असताना त्यांना रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार वनराई दिसली. सहज म्हणून चौकशी केली असता त्यांना मलाबार नीम विषयी माहिती मिळाली. आपल्या व्यवसायातून कमावलेल्या पैशातून त्यांनी हराळेवाडी (ता.- मोहोळ) येथे तीन एकर शेती घेतली होती. त्या शेतीत ऊसाची लागवड करण्यासाठी ठिबक सिंचनाची (ड्रीप) पाईपलाईन टाकलेली होती. याच शेतीत कोरोना महामारीत पहिल्या लाटेच्या लॉक डाऊनच्या काळात त्यांनी मलाबार नीमची अडीच हजार रोपे आणून लावली. गेल्या वर्षभरात ती आता चांगली दहा फूट उंचीची झाली आहेत. ऊसाबरोबरच लावलेल्या या मलाबार नीमच्या रोपांची व्यवस्थित वाढ झाली. तर ऊसाच्या वाढीवर देखील याचा काही परिणाम झाला नाही. यंदाच्या गळीत हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच नवनाथ तोरणे यांनी साखर कारखान्याला आपला ऊस दिला आहे. आता वाढणाऱ्या मलाबार नीम सोबतच ते आंतरपीक म्हणून पालेभाजी आणि फळभाजीचे पीक घेणार आहेत.

ऊसाच्या तोडणीनंतर त्याच्या पाचटची कुट्टी करून शेतात खत म्हणून उपयोग करता येतो.

काहीतरी वेगळे करायचे म्हणून मलाबार नीमच्या शेतीचा प्रयोग केला का ? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच नाही असेच आहे. कारण नवनाथ तोरणे यांच्या मते या वृक्षाची नव्याने ओळख झाल्यावर कुतूहलापोटी त्यांनी त्याविषयी सखोल माहिती मिळवली. आंध्रप्रदेश-तामिळनाडू राज्यातील शेतकरी जर मलाबार नीमची शेती शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून करत असतील तर आपण ही शेती का करू नये ? बरं यासाठी पारंपारिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या हंगामी पिकाएव्हढाही खर्च येत नाही. याबरोबरच आंतरपीक देखील घेता येते. दहा फुटाच्या अंतराने मलाबार नीमच्या रोपांची लागवड केल्याने आंतरपीक अगदी ऊस, गहू, ज्वारी, मका, तूर, हरभरा याबरोबरच पालेभाजी-फळभाजीचे उत्पादन देखील घेता येते. यासर्व बाबींचा अभ्यास करूनच नवनाथ तोरणे यांनी लॉक डाऊनची संधी साधत आपल्या तीन एकर शेतात अडीच हजार मलाबार रोपांची लागवड केली. त्यातही लॉक डाऊनमुळे रोपांच्या लागवडीसाठी विनासायास शेतमजूर मिळाले. ऊस, द्राक्षाच्या शेतीपेक्षाही अतिशय कमी पाणी, कमी खर्च आणि शेतमजूरशिवाय करता येणारी ही शेती आहे. लागवडी पुरतेच मनुष्यबळ लागते. या रोपांना जनावरे तोंड लावत नसल्याने देखरेखीसाठी मनुष्यबळ ठेवण्याची गरज नाही. अगदी कमीतकमी पैश्यात रोप मिळत असल्याने बियाणांवरचा होणारा खर्च देखील नाममात्र आणि एकदाच येतो. शेणखताचा वापर केल्याने कमी खर्च आणि रासायनिक वापर नसल्याने जमिनीची प्रत देखील चांगली राहते.

केवळ पर्यावरणाचा समतोल राखणे एव्हढाच मलाबार नीमच्या शेतीचा उपयोग नाही तर ऊस, डाळिंब आणि द्राक्षंपेक्षाही अधिक उत्पन्न मिळवून देणारे ते पीक आहे. मलाबार नीमचे लाकूड हलके असते. त्याचा उपयोग खोकी, पेन्सिली, प्लायवूड आणि कागद बनविण्यासाठी केला जातो. म्हणूनच त्याला बाजारात चांगली मागणी आहे. अगदी पूर्णवाढ (वीस ते बावीस फुटापर्यंत) झालेले आणि पन्नास सेंटीमीटर व्यासाचे खोड झालेली एका झाडाला एक लाख रुपये एव्हढी कमाई होऊ शकते. अर्थात कृषिवन प्रकारात मोडणारी ही शेती असल्याने किमान पाच ते दहा वर्षापर्यंत या झाडांचे संगोपन करावे लागते. एकदा कापणी केली की त्याच्या मुळ्या फार खोलवर जात नसल्याने शेतीचे पर्यायाने मातीचे कोणतेच नुकसान होत नाही. मिळणारे उत्पन्न आणि पर्यावरणाचे संतुलन लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने किमान शेतीच्या बांधावर तरी मलाबार नीमची लागवड करावी असे मत नवनाथ तोरणे यांनी मांडले आहे.

मलाबार नीमच्या शेतीत आंतरपीक म्हणून चक्क ऊस देखील लावता येतो.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)