
मराठी माणूस चाकरमानी असतो. तो उद्योजक बनायचं कधीच धाडस करीत नाही. हा गैरसमज दूर करीत महाराष्ट्रातील सोलापूर सारख्या आडवळणी शहरात पंचवीस वर्षांपूर्वी “क्रॉस इंटरनॅशनल” या नावाने सुरू झालेल्या उद्योगाने आता जगातील ३५ देशांमधील बाजारपेठेत आपल्या उत्पादनाला पोहोचविले आहे. सोलापूर शहरालगत असलेल्या ‘कुंभारी’ या गावातील काशिनाथ रेवप्पा ढोले यांनी एमएस्सी (इनऑरगॅनिक केमिस्ट्री) ही पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर काही वर्षे मुंबईत एका कंपनीत नोकरी केली. त्यानंतर स्वतःचा उद्योग सुरू करण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी नोकरी सोडून सोलापूर गाठले. १९८७ मध्ये सोलापूर शहरालगत असलेल्या अक्कलकोटरोड एमआयडीसी मध्ये ” क्रॉस इंटरनॅशनल ” या उद्योगाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात या कंपनीत ऑटोमोबाईल क्षेत्राला लागणाऱ्या फ्रिक्शन पॅडचे उत्पादन घेतले जात होते. वाहनांच्या ब्रेक्समध्ये हे फ्रिक्शन पॅड वापरले जाते. याबरोबरच भारतात कुणीच बनवत नव्हते असे ऍसबेसटॉसचे फायबर सीलचे उत्पादन सुरू केले. त्यावेळी हे उत्पादन जर्मनीहून भारतात आयात केले जात होते. ऑटोमोबाईल क्षेत्रात हे उत्पादन सर्वांना लागायचे. त्यावेळी विदेशी ऑटोमोबाईल कंपन्यांचे भारतात उत्पादन सुरू झालेले नव्हते. त्यामुळे सर्व भारतीय कंपन्यांकडून मागणी वाढलेली होती. या उत्पादनामुळे १९९० मध्ये काशीनाथ ढोले यांना भारत सरकारचा ‘बेस्ट इम्पोर्ट सबस्टिट्यूट’ हा पुरस्कार मिळाला.

काशिनाथ ढोले यांचे सुपुत्र आशिष ढोले हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कंपनीच्या कामकाजात लक्ष पुरवीत होते. आशिष यांनी बीबीए आणि एफएमबी ही पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर २००८ मध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी कंपनीच्या पर्चेस आणि एचआर डिपार्टमेंटची जबाबदारी घेत अनुभव मिळविला होता. आशिष यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कंपनीचा विस्तार करण्याच्या धोरणाचा पाठपुरावा करत २०१० मध्ये ‘ईलॅस्टोमर सील’ या उत्पादन निर्मितीत प्रवेश केला. या उत्पादनाच्या वाढीसाठी भरपूर वाव होता. अगदी घड्याळ, पेन, कुकर, मोबाईल, वेगवेगळ्या इंजिनमध्ये, ऑटोमोबाईल क्षेत्रात ते थेट विमान, जहाज रॉकेट पर्यंत ‘ईलॅस्टोमर सील’ या उत्पादनाचा वापर होतो. या अतिशय महत्त्वाच्या पार्ट्सच्या उत्पादनामध्ये उतरत आशिष ढोले यांनी ३५ देशांमध्ये आपले वितरणाचे जाळे निर्माण केले. जगामध्ये पहिल्या दहा क्रिटिकल प्रॉडक्टमध्ये ‘सील’ हे तिसऱ्या क्रमांकाचे प्रॉडक्ट समजले जाते. क्रॉस इंटरनॅशनल मध्ये एकूण पाच प्रकारातील विविध प्रकारचे सील तयार केले जातात. हिट, प्रेशर, डस्ट, ऑइल सील, वॉटर सील या पाच प्रकारातील जवळपास अडीच हजार प्रकारचे वेगवेगळ्या आकारातील आणि वेगवेगळ्या उपयुक्ततेचे सीलचे उत्पादन घेतले जाते.


सीलचे डिझाईन आणि रबर फॉर्म्युलेशन या दोन गोष्टी सील्सच्या उत्पादनात महत्वाच्या असतात. क्रॉस इंटरनॅशनल मध्ये विविध प्रकारचे २५० रबर फॉर्म्युलेशन उपयोगात आणले जाते. प्रत्येक ठिकाणच्या तापमानानुसार इंजिन व इतर वस्तूंकरिता लागणाऱ्या सीलचे डिझाईन व रबर फॉर्म्युलेशन वेगळे असते. आठ एम.एम. च्या सीलपासून ते ३०० एम.एम. च्या साईजमध्ये सर्वप्रकारच्या सील्सचे उत्पादन क्रॉस इंटरनॅशनल मध्ये घेतले जाते. क्रॉस इंटरनॅशनल मध्ये फक्त सीलचे उत्पादन घेतले जाते. छोट्यातील छोट्या प्रॉडक्टपासून अवकाशात झेपावणाऱ्या विमान-रॉकेटपर्यंत प्रत्येक ठिकाणी सील हा अतिशय महत्वाचा घटक असतो. एव्हढ्या लार्ज स्केल मध्ये हे उत्पादन असल्याने जगभरातून या उत्पादनासाठी मागणी असते.

सोलापूरसारख्या आडवळणी शहरात औद्योगिक सुविधांचा अभाव आणि खर्चिक दळणवळण सुविधा असतांनाही एका मराठी उद्योजकाने सुरू केलेल्या या उद्योगाने पंचवीस वर्षात बघता-बघता जगातील ३५ देश आपल्या उत्पादनाने पादाक्रांत केले आहेत. भविष्यकाळात इंधनविरहीत इमोबॅलिटी साधनांचा वापर वाढणार आहे, त्यासाठी लागणाऱ्या सील्सचे उत्पादन तसेच फार्मासिटीकल, एरोस्पेस, डिफेन्स आणि सेमी कंडक्टर इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या पूरक सीलचे उत्पादन करण्याचा कंपनीचा विचार असल्याचे क्रॉस इंटरनॅशनल चे व्यवस्थापकीय संचालक आशिष ढोले यांनी स्पष्ट केले.


:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा