

कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाकडून सतत पुकारण्यात येणाऱ्या निर्बंधाची आणि लॉक डाऊनची दहशत कायम असून आता या दहशतीची हळूहळू सवय होवू लागली आहे. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात आधीच आत्ममग्न झालेले समाजजीवन मोबाईल पाठोपाठ आता लॉक डाऊनच्या ‘फोबिया’ने ग्रस्त झाले आहे. लॉक डाऊन हा कोविडशी लढण्याचा पर्याय नक्कीच नाही. पण लोकांच्या जीविताच्या सुरक्षेच्या आड प्रशासकीय यंत्रणेने शोधलेली सोयीस्कर पळवाट आहे का ? हा प्रश्न फक्त एका देशाचा नाही, तर जगभरातील लोकांच्या मनात निर्माण झालेली ही शंका आहे. सततच्या अनामिक भीतीतून दडपण तयार होते, अन सततच्या या दडपणातूनच एकप्रकारचा मनोविकार (फोबिया) तयार होतो. इथं गेल्या दोन वर्षांपासून प्रतिबंधात्मक कडक निर्बंध, लॉक डाऊन यामुळे बंदिस्त जीवन जगणाऱ्या जनतेला आता या बंदिस्त जगण्या बरोबरच आत्ममग्न होण्याची सवय जडत आहे. जर प्रतिक्रिया आणि संवादच हरवणार असेल तर तो एकप्रकारचा क्राऊड फोबियांच म्हणावा लागेल.


भारतात सध्या ओमायक्रोनच्या रूपाने कोविडची तिसरी लाट सुरू आहे. दिवसेंदिवस बाधितांची वाढती आकडेवारीचं जर आरोग्य विभागाकडून येत असेल तर आत्ता लिहिताना ताजी आकडेवारी देखील देणे आवश्यक वाटत नाही. एखादी व्हायरल इन्फेक्शनची साथ असेल तर ती वेगाने संक्रमित होतच असते. बरं कोविड जोपर्यंत आपल्याला नवीन होता तोपर्यंत उपचाराबाबत आणि त्याच्या परिणामाबाबत कमालीची भीती बाळगणे यात गैर काहीच नव्हते. पण जगभरातून कोविड बाबतचे जनजागरण केल्यानंतर बऱ्याच प्रगतिशील देशांमधून लसीकरण झाल्यानंतर (ज्या देशांनी लसीकरण केल्याचा दावा केला आहे) पुन्हा येणाऱ्या नव्या रुपात येणाऱ्या व्हायरसमुळे पुन्हा-पुन्हा तणावाखाली प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कडक निर्बंध आणि लॉक डाऊन पुकारले जाणार असेल तर त्या देशातील समाजजीवन मनोविकारग्रस्त होणार नाही का ? गर्दीमुळे कोविड हा व्हायरस फैलावतो हेच आपण गेल्या दोन वर्षात मनात पक्के करून बसलो आहोत. त्यामुळे गर्दी टाळणे हाच त्याचा पहिला उपाय असला तरी गर्दी टाळणे म्हणजे ‘कर्फ्यु लावणे’ किंवा ‘लॉक डाऊन’ लावणे असा होत नाही. गर्दी नियंत्रणासाठी अनेक आदर्श असे उपाय आहेत. त्यात स्वयंशिस्त हा देखील उपाय आहे. लोकांना स्वयंशिस्तीची प्रेरणा देत सर्व गरजांची पूर्तता करणारी सरकारी सक्षम यंत्रणा अस्तित्वात असणे याची खरी गरज आहे. मुळात ज्या देशात सरकार जीवनावश्यक गरजा भागविण्यास असमर्थ असते, अश्या देशातून गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्या सरकारला पाशवी बळाचा वापर करावा लागतो. तर ज्यादेशातून सरकार जनतेच्या सर्व जीवनावश्यक गरजा भागविण्यास समर्थ असते अश्या देशाची सरकारी यंत्रणा सकारात्मक विचारांची असावी लागते. जर ती सकारात्मक विचारांची नसेल तर ती देखील उसळणाऱ्या गर्दीला शिस्तीत नियंत्रित न करता पाशवी बळाचाच अधिक वापर करताना दिसते. अश्या ठिकाणी निरुपद्रवी जनतेपेक्षाही सर्वशक्तिमान अशा प्रशासकीय यंत्रणेचाच उपद्रव अधिक दिसून येतो. याचाच परिणाम म्हणून कर्फ्यु अथवा लॉक डाऊनचा प्रयोग सातत्याने केला जातो. लहान मूल सतत रडते म्हणून जर त्याला ‘अफीम’चे चाटण दिले. तर ते काहीकाळ शांत पडून रहाते, पण ते शांत राहते म्हणून अफीमची मात्रा वाढविली तर त्या लहान मुलाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. यामध्ये ते मूल मंद बुद्धीचे देखील होवू शकते. शिवाय त्याच्या शरीराला अफीमची सवय होवून तो ‘अडीक्ट’ देखील होवू शकतो. हाच तर फोबिया आहे. आज समाज ‘कर्फ्यु’ आणि ‘लॉक डाऊन’ नावाच्या अफीमच्या डोसचा ‘अडीक्ट’ होवू लागला आहे.

रोज कोरोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीवर नियंत्रण मिळविताना नागरिकांना ‘कर्फ्यु’ अथवा ‘लॉक डाऊन’ची भीती घालणे कितपत उचित ठरेल ? आता गेल्या दोन वर्षांच्या या उपाययोजना मुळे धनिक अथवा गरीब दोन्ही वर्गाचं अर्थकारण बिघडलेले आहे. फक्त नोकरदार वर्ग अजूनही तग धरून आहे. तो देखील नोकरी टिकण्याची हमी देवू शकत नाही. सतत जनजीवन ठप्प होत असल्याने उपजीविकेवर विपरीत परिणाम होत आहेत. रोज मजुरीवर जगणाऱ्या वर्गाची कोरोना ऐवजी उपासमारीने मरण्याची शक्यता अधिक झाली आहे. व्यापारीवर्ग आपला व्यापार सुरळीत करू शकत नाही. सततच्या तणावातून आपण मुक्त कधी होणार आहोत ? याचे कुणाकडेच उत्तर नाही. यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवणे सरकारला जड जाणार आहे. याबरोबरच बकालवृत्ती वाढल्याने लूटमार आणि भ्रष्टाचार वाढत आहे. त्यावर सरकारला नियंत्रण ठेवणे कठीण जाणार आहे. सत्ता चालवायची म्हणून काही करून लोकांना आपला रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरायला बंदी घातली तर त्या देशात बेदिली माजणार हे नक्की. पण लोक रस्त्यावर उतरुनही त्यांना उत्तर सापडणार आहे का ? सरकार उलथवून टाकणे ही क्रिया त्यावरचा उपाय असणार नाही. तेंव्हा गरज असणार आहे ती या ‘क्राऊड फोबिया’वर ईलाज शोधण्याची. तेंव्हा आत्ताच सावध व्हा……कोरोना पेक्षाही महाभयानक व्हायरस आपल्या मनामध्ये ‘डेव्हलप’ होतोय, जो ‘क्राऊड फोबिया’कडे आपल्याला घेवून जात आहे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा