
मकरसंक्रांतीनंतर म्हणजेच साधारणतः जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शेतकरी बांधवांच्या “हुरडा पार्टी”च्या आयोजनाची लगबग सुरू होते. ‘हुरडा’ म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातून ग्रामीण भागात आता हुरडा पार्ट्यांना धुमधडाक्यात सुरुवात होते. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हा तालुका ज्वारीचे कोठार समजल्या जातो. त्यामुळे सोलापुरी हुरडा पार्ट्यांची रंगतच न्यारी असते. खास हुरड्यासाठी सुरती, गुळभेंडी, कुचकुची या प्रकारातील ज्वारीची पेरणी केली जाते. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेतही लसीकरणामुळे म्हणा किंवा कोरोनाला सोबत घेऊन जगण्याच्या मानसिकतेमुळे म्हणा, गेल्या वर्षीपेक्षाही यावर्षीच्या ‘हुरडा पार्ट्या’ धडाक्यात होणार याची आत्ताच खात्री वाटायला लागली आहे. शेतात पेटवलेल्या आगटीमध्ये (कोवळी ज्वारीची कणसे खरपूस भाजण्यासाठी खड्ड्यात किंवा लोखंडी पाटीत गोवऱ्या पेटवून केलेले निखारे) भाजून खरपूस केलेला हुरडा अन सोबत लसणाची, खोबऱ्याची चटणी, भाजलेले वांगे त्यावर तिखट-मीठ पेरून फड जमवून अगदी तब्येतीने जाम आडवा हात मारायचा. त्यावर एक स्टीलचा ग्लास भरून ताक प्यायचं. ही झाली हुरडा पार्टीची मेन डीश. सोबत गल्लीपासून अमेरिकेपर्यंत सल्ले देणाऱ्या राजकीय गप्पा असा सगळा जामानिमा असतो. दुपारी सूर्य डोक्यावर आला की शेतात डेरेदार आंब्याच्या झाडाची सावली पकडायची मग भरलेल्या वांग्याची भाजी,भाकरी-चपाती, शेंगाची चटणी-दही असं तृप्तीचा ढेकर देत जेवणावर ताव मारायचा. तिथंच जागा स्वच्छ करून वामकुक्षी म्हणून ताणून द्यायचं. संध्याकाळी ओठांवर हुरड्याची रेंगाळती चव ठेवूनच घराचा रस्ता धरायचा ही झाली आमची ग्रामीण मराठमोळी हुरडापार्टी.


नुकत्याच राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. आता विजयी उमेदवारांच्या जेवणावळी, सत्कार आणि जल्लोषासाठी हुरडा पार्टीसारखी दुसरी योग्य जागा आणखी कोणती असणार ? शिवाय ‘नगर पंचायत एक झाकी है…जिल्हा परिषद अभी बाकी है….’ असं म्हणत गावोगावी यंदा हुरडा पार्ट्या अधिकच रंगणार आहेत, यात शंकाच नाही. जिकडेतिकडे हुरडा पार्टीतून स्थानिक राजकीय चर्चांचा फड रंगणार. बाकी कोरोनाचा तो नवा व्हेरिएंट कुठंवर आलाय..? पहिल्यापेक्षा तो जास्त कडक आहे का ? चीनचा-पाकिस्तानचा नवा उद्योग काय चाललाय ? बायडन आपल्या मोदी साहेबांच्या नावाचा जप करतोय की नाही..? असल्या प्रश्नांना बगल देतच परवाच्या दौऱ्यात पवार साहेब खुश दिसले होते तेंव्हाच महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या निवडणुकांचा निकाल काय लागणार हे माहिती होतं असं छातीवर हात ठेवून आपल्या राजकीय ज्ञानाचं भांडार रिते करण्याची चढाओढ हुरडा पार्ट्यातून दिसणार आहे. महाराष्ट्राच्या वातावरणात देखील जरासा बदल झाला तर तो ग्लोबल वॉर्मिंगमुळे नव्हे तर पवार साहेबांमुळेच होतो असं मानणारा एक भाबडा पंथ महाराष्ट्रात अलीकडे टाळ-मृदुंगाच्या गजरात महाराष्ट्र दिंडी काढताना दिसतो. त्या पंथाला देखील हुरडा पार्टीमध्ये अगदी अग्रस्थान मिळणार. ग्रामीण भागात कोणत्याही निमित्ताने चार माणसे एकत्र येत असतील तिथं राजकारणाचा विषय निघणार नसेल तरच कोरोना महाराष्ट्रात कायमचा रहायला आलाय असं दस्तुरखुद्द जागतिक आरोग्य संघटना मान्य करेल. कारण राजकीय विषाणू हा कोरोना इतकाच प्रभावी विषाणू असतांना मराठी माणसांसाठी तो वरदान ठरलाय, मग कोरोनाने इथं रहायला का यावे ? जीव गेला तरी बेहत्तर…पण मराठी माणूस त्याचं अस्तित्वच मान्य करत नाही. तेंव्हा मास्क, सोशल डिस्टनसिंग, लसीकरण, आरटीपीसीआर, युनिव्हर्सल पास या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. गर्दी जमवणे त्यातून सांस्कृतिक कार्यक्रम करणे हाच आमचा बाणा आहे…बाकी हुरडा पार्टी तो बहाना है ।

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा