
भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही प्रणाली स्वीकारलेल्या सार्वभौम देशाचा स्वातंत्र्य दिना इतकाच महत्वपूर्ण दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन हा आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. या स्वतंत्र झालेल्या देशाने लोकशाही प्रणाली स्वीकारली. अर्थात हे स्वतंत्र झालेले लोकराज्य चालविण्यासाठी स्वतंत्र संविधानाची आवश्यकता होती. याकरिता संविधानाच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ३०८ सदस्यांची मसुदा समिती गठीत करण्यात आली. या मसुदा समितीने तयार केलेले संविधान (राज्यघटना) लागू करण्यात आली तो दिवस म्हणजे २६ जानेवारी १९५०. हाच दिवस दरवर्षी गणराज्य दिवस किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. आज आपण ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता स्थापन झाल्याचा दिवस. आपली पिढी ही स्वातंत्र्यानंतर बऱ्याच दशकांनी जन्मलेली पिढी असल्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय उत्सवाचे आपल्याला फारसे औत्सुक्य नसते. केवळ हक्काची सार्वजनिक सुट्टी मिळते म्हणून आपण हे दोन्ही राष्ट्रीय उत्सव लक्षात ठेवतो. फराळाचे वेगळे पदार्थ खायला मिळतात म्हणून जसे आपण एखादा उपवासाचा दिवस लक्षात ठेवतो ना ! अगदी तसंच…. केवळ मजा करायला सुट्टी मिळते म्हणून हे दोन्ही राष्ट्रीय उत्सव आपण लक्षात ठेवतो हे मात्र खरे…!

जगाच्या पाठीवर सर्वच देशांच्या नावात रिपब्लिकन हा शब्द असला तरी किती देश रिपब्लिकन आहेत ? सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात मात्र रिपब्लिकन या शब्दाला संविधानाचा आधार आहे. किंबहुना रिपब्लिकन या शब्दावरच संविधानाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे रिपब्लिकन हा केवळ एक शब्द राहिला नसून ती एक आचारसंहिता बनली आहे. स्वातंत्र्य कसे मिळाले हेच सांगणारी पिढी आज अस्तित्वात नसल्याने त्याबद्दलची ओढ आजच्या पिढीत दिसत नाही. अर्थात हे सर्वच स्वतंत्र झालेल्या देशांबाबत लागू होते. आदर्शवाद हा हवं ते मिळवून देणारा असूच शकत नाही. जिथं त्याग-समर्पणाची भूमिका जन्म घेते तिथं आदर्शवाद घट्ट रुजतो. मात्र त्याग-समर्पणातून इप्सित साध्य झाल्यावर हाच आदर्शवाद फेकून दिल्या जातो. हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी राष्ट्रप्रेम जागृत करण्याऐवजी सहली-पार्ट्यांचे आयोजन करून व्यक्तिगत पातळीवरचा आनंदोत्सव साजरा केला जातो. यात कुणालाच गैर वाटत नाही. किंवा राष्ट्रप्रेम, देशभक्ती वगैरे नेमकं काय असतं ? याची महती त्यांना कुणी सांगायला देखील जात नाही. नाही म्हणायला शाळांमधून झेंडावंदन, राष्ट्रगीत गायन, परेड होत असते. तेव्हढाच काय तो राष्ट्रभक्तीचा ‘जागर’ असतो. आमच्याकाळी असं नव्हतं….असं म्हणणाऱ्या ज्येष्ठपिढीचे तोंड आम्ही केंव्हाच बंद करून टाकले आहे.

याउलट ‘या देशाने आम्हाला काय दिले ?’ हा प्रश्न विचारणारी नवी मानसिकता आम्ही जन्माला घातली आहे. जेंव्हा एखादी मोठी आपत्ती येते. तिला नियंत्रणात आणणे स्वतःच्या मर्यादेबाहेर जाते. तेंव्हा सामूहिक प्रयत्नासाठी आपल्या राष्ट्र ऐक्य, देशप्रेम वगैरे आठवते. मग आपण सीमेवर आपल्या संरक्षणासाठी रात्रंदिवस मृत्यूच्या छायेखाली आपली ड्युटी बजावणारे जवान आपल्याला आठवतात….त्यांच्या प्राणांच्या आहुतीचे महत्व आपल्याला पटायला लागते. मग रक्षाबंधनाला सीमेवर तैनात जवानांसाठी आपण राख्या पाठवतो…दिवाळीचा फराळ, मिठाई पाठवतो….’शहिद तुझे सलाम’च्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करतो आणि लाईक-कमेंट्स मिळवीत आपली राष्ट्रभक्ती जगाला दाखवितो. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे लॉक डाऊनमध्ये घरात बसून आपण हेच तर केलंय ! तरी बरं या लॉक डाऊनच्या काळात माणुसकी, समूहाची ताकद, देश म्हणजे काय ? या गोष्टींची जाणीव आपत्ती म्हणून का होईना झाली. पण हा परिणाम किती दिवस राहणार ? माणूस विस्मृतींचं गोडावून असतो. या आपत्तीचा देखील हळूहळू आपल्याला विसर पडणार….नव्हे तो पडायला लागलाय. मुद्दामहूनच प्रजासत्ताक दिन झाल्यावर दोन दिवसांनी मी लिहितोय….कारण आता पुढच्या राष्ट्रीय दिनापर्यंत आम्ही एकमेकाला विचारणार….हे प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय असतं रे भाऊ…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to Rupali उत्तर रद्द करा.