‘वुमन सेफ्टी जॅकेट’चा अविष्कार करणारी सोलापूरची अंकिता रोटे

सोलापूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेली युवा संशोधक अंकिता दादाराव रोटे.

एकट्या महिलेला गाठून तिच्याशी असभ्य वर्तन करीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या घटना आपल्या ‘अवती-भवती’ नेहमीच घडत असतात. घटना घडून गेल्यानंतर अत्याचाराविरोधात मोर्चा, उपोषण, आंदोलन, कँडल मार्च काढून ‘त्या’ अत्याचारपीडित महिलेला अथवा मुलीला न्यायाची वाट पहावी लागते. आपल्या ‘अवती-भवती’ घडणाऱ्या या घटना ऐकून-बघून शाळकरी वयापासूनच व्यथित होणाऱ्या सोलापूरच्या युवा अभियंता संशोधक अंकिता दादाराव रोटे हिने जवळपास तीन-चार वर्षांच्या अथक प्रयत्नातून महिला किंवा तरुण मुलींसाठी अशा प्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘वुमन सेफ्टी जॅकेट’चा अविष्कार केला आहे. अतिप्रसंग किंवा मनाविरुद्ध स्पर्श करणाऱ्या नराधमाला ‘शॉक’ बसणारी तसेच नजीकच्या पोलीस स्टेशनला आणि पालकांना ‘अलर्ट मेसेज’ पाठविणारी सुविधा असलेले डिव्हाईस तयार करीत सोलापूरच्या युवा अभियंता संशोधक अंकिता रोटे हिने महिलांच्या सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यात नव्या आधुनिक तंत्राचा वापर करीत ‘सेफ्टी जॅकेट’ तयार केले आहे. प्रत्येक महिला आणि तरुण मुलीला सुरक्षा प्रदान करणारे हे ‘सेफ्टी जॅकेट’ परिधान करणे आजच्या असुरक्षित वातावरणात गरजेचे आहे. या जॅकेटचा बाह्य भागावर दोन्ही बाह्या आणि पाठीमागे कमरेच्यावर दोन बोटांच्या अंतराने बटण बसवलेले आहेत. यातून ५ व्होल्टेज चा प्रवाह ‘शॉक’ देतो. यामुळे अतिप्रसंग करणारा व्यक्ती काही अंतर दूर जाईल. यातून महिलेला स्वतःला सुरक्षित करायला वेळ आणि जागा मिळेल. याबरोबरच बीपच्या आवाजाने आजूबाजूचे मदतीला धावून येतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासमोर देखील अंकिताने याचा ‘डेमो’ दिला. त्यावेळी खा. सुप्रियाताई सुळे यांनी कौतुक करीत तिला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

अंकिता रोटे ही इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनची विद्यार्थिनी आहे. या विषयात डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक.च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या अंकिताला संस्थेचे संचालक संजय नवले आणि प्राचार्य डॉ. शंकर नवले यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते. अंकिताचे वडील दादाराव रोटे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. तर अंकिताची आई सौ. सुनीता रोटे ह्या नगरसेविका आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सोलापूर शहर अध्यक्षा आहेत. घरात सामाजिक आणि राजकीय कार्याचे वातावरण असल्यानेच महिला संरक्षणाच्या सामाजिक प्रश्नातूनच अंकिता हिला ‘सेफ्टी जॅकेट’ची कल्पना सुचली. ती वास्तवात उतरवताना रोजचा अभ्यास सांभाळून तिने जवळपास चार वर्षे खर्ची घातली. हे डिव्हाईस तयार करताना सहजपणे बाजारात उपलब्ध असणारेच साहित्य वापरले आहे. प्रायोगिक तत्त्वावर एक सेफ्टी जॅकेट बनवताना तिला जेव्हढा खर्च आला तो कदाचित सर्वसामान्यांना परवडणारा नसेलही, पण जेंव्हा हेच सेफ्टी जॅकेट अधिक संख्येने बनविल्या जातील तेंव्हा त्याचा उत्पादन खर्च आणि विक्रीची निर्धारित किंमत ही एखाद्या गरीब महिलेला अथवा तरुणीला परवडणारी नक्कीच असणार आहे. बाजाराचे अर्थकारण हा विषय अंकितासाठी नक्कीच नवा आहे. पण त्याहीपेक्षा तिचा महिला सुरक्षेविषयीचा सामाजिक दृष्टिकोन वेगळा आहे. एकीकडे कोरोना महामारीमुळे शाळा-महाविद्यालये गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत. क्लासरूम एज्युकेशनची सवय असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल एज्युकेशन ही प्रणाली जड जात असताना अंकिता रोटे ही विद्यार्थिनी ‘सेफ्टी जॅकेट’चा अविष्कार करते, ही बाब निश्चितच भूषणावह आहे. नव उद्योजक निर्माण व्हावेत, नवे संशोधक तयार व्हावेत ही प्रत्येक देशाची भूमिका असते. आता अंकिता सारख्या विद्यार्थीदशेत असणाऱ्या नव उद्योजक-संशोधकासमोर हे संशोधन सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचे आव्हान आहे. त्याचे ‘पेटंट’ मिळविण्यापासून प्रोत्साहन देणाऱ्या गुंतवणूकदारांची तिला खरी आवश्यकता आहे. महिला सुरक्षेविषयी जागृती आणि आस्था ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी तिच्या पाठीशी उभे रहावे म्हणून तर हा लेखनप्रपंच…!

20220130_172002

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)