हुश्शss… सुरू झाली एकदाची ‘हिरक महोत्सवी’ राज्य नाट्य स्पर्धा…!

असं म्हणतात की, कोणत्याही देशाची, राज्याची, प्रदेशाची, विभागाची, जातीची अथवा धर्माची समृद्धी ही तिथल्या सांस्कृतिक प्रथा आणि परंपरांमध्ये गणली जाते. म्हणूनच जगात भारतीय संस्कृती आणि परंपरेला सर्वोच्च स्थान आहे. याच संस्कृती-परंपरेत ‘नाटक’ हे अभिजात समजले जाते. महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे ते केवळ तिथल्या विकासाच्या घडामोडींमुळे नव्हे तर या राज्याच्या पायाच मुळात भाषा आणि संस्कृतीमूल्यांवर आधारित आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेले हे राज्य नाट्य स्पर्धेचे ‘अग्निहोत्र’ हिरक महोत्सवाचा टप्पा पार करत आहे. देशातील राज्य सरकारांकडून अपवादात्मक स्थिती सोडता अव्याहतपणे सुरू असणारी महाराष्ट्र शासन आयोजित ही एकमेव नाट्य स्पर्धा आहे. नव्हे तर कलावंतांची जडणघडण करणारी त्यांना ‘व्यासपीठ’ मिळवून देणारी ही चळवळच आहे. स्पर्धा सुरू होवून दुसरा दिवस उजाडलाय… तेंव्हाच खात्रीने या विषयावर लिहितोय. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या भीतीचे भूत अजूनही मानगूट सोडत नाहीय, अश्या अवस्थेत स्पर्धा होतील की नाही ? हा संभ्रम गेल्या दोन वर्षांपासून अंगवळणी पडला होता. ‘जान सलामत तो स्पर्धा पचास’ असं म्हणत स्वतःचीच समजूत घालणाऱ्या कलंदर कलावंतांची ही कैफियत कोण ऐकणार हो…! एकवेळ लॉक डाऊनमुळे होणारी उपासमार कलावंत सहन करेल पण त्याच्या रंगमंचावरील वावराला देखील ‘सोशल डिस्टनसिंग’चा लगाम खेचत असेल तर….समोरून टाळ्या, शिट्यांचा आणि शाबासकीचा ‘शिधा’ त्याला मिळणार नसेल तर….? या ‘अग्निहोत्रा’साठी त्याने त्याचे आयुष्य तरी कुरवाळून का टाकायचे ?

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून पुकारलेल्या लॉक डाऊनमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. नाट्यगृहांची अवस्था त्यापेक्षा वेगळी नव्हती.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे दरवर्षी हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा, व्यावसायिक मराठी नाट्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, हिंदी नाट्यस्पर्धा, संगीत नाट्यस्पर्धा, संस्कृत नाट्यस्पर्धा, दिव्यांग बालनाट्य स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. हौशी मराठी नाट्यस्पर्धा ह्या महाराष्ट्रातील १९ आणि गोवा राज्यातील पणजी अश्या २० केंद्रांमधून आयोजित केल्या जातात. यंदा हौशी नाट्य स्पर्धांचे हे साठावे वर्ष आहे. यंदा या स्पर्धांसाठी एकूण ३५६ हौशी नाट्यसंघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. दरवर्षी साधारणतः ३१ ऑगस्टपासून प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करीत या स्पर्धांचा ‘बिगुल’ वाजविला जातो. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत हौशी मराठी नाट्यस्पर्धांची प्राथमिक फेरी पूर्ण होते. त्यानंतर प्रत्येक केंद्रांवर पात्र ठरलेल्या पहिल्या दोन क्रमांकांच्या नाटकांची अंतीमफेरी ही जानेवारी-फेब्रुवारी या दरम्यान घेतली जाते. या अंतीमफेरीतून विजेत्या नाट्यसंघांची, कलावंत आणि तंत्रज्ञाची निवड करण्यात येते. त्यानंतर प्रत्येक केंद्रांवरील प्राथमिक स्पर्धेतील विजेते संघ आणि कलावंत-तंत्रज्ञांचा विभागवार तसेच अंतीमफेरीतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा होत या स्पर्धेची सांगता होते ती पुन्हा पुढच्या वर्षीच्या ओढीनेच. हे नाट्य अग्निहोत्र गेली साठ वर्षे एखाददुसरा अपवाद वगळता अव्याहतपणे सुरूच आहे. यातून आजवर हजारो नाट्यसंहिता, कलावंत-तंत्रज्ञ मराठी व्यावसायिक रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपट, सिरियल्स, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मालिका, चित्रपट, वेबसिरीजला मिळाले आहेत….मिळत आहेत. राज्यसरकारकडून चालविली जाणारी ही अशी एकमेव उपक्रमशील स्पर्धा आहे. म्हणूनच राज्यनाट्य स्पर्धा हा फक्त हौशी कलावंतांचा नाही तर प्रत्येक मराठी माणसांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

भारताची गान कोकिळा, भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि कोरोनाकाळात दिवंगत झालेल्या रंगकर्मींना श्रध्दांजली अर्पण करीत सर्व केंद्रांवरून एकाचवेळी या स्पर्धांना सुरुवात झाली.

मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिर मध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दि. २१ फेब्रुवारी रोजी या ‘हिरक महोत्सवी’ हौशी मराठी नाट्य स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. हा उदघाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीने सर्व स्पर्धा केंद्रांवर स्क्रीनवर दाखविण्यात आला. त्यानंतर प्रत्येक केंद्रांवर औपचारिक उदघाटन करीत या स्पर्धांना सुरुवात झाली. रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या या उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख तर उदघाटक म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते. तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आणि अभिनेते नागेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री यांनीही ऑनलाईन पद्धतीने आपले मनोगत मांडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे खंडित झालेल्या स्पर्धा सुरळीत होत आहेत याचाच प्रत्येक केंद्रावरील स्पर्धेत सहभागी झालेल्या कलावंतांना आणि उपस्थित रसिकांना आनंद झालेला त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. उदघाटन सोहळ्यात मंत्रीमहोदय काय बोलले ? त्यापेक्षाही एकदाची स्पर्धा सुरू झाली याचेच समाधान जास्त दिसत होते. बाकी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख बोलत असताना वारंवार माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांची आठवण येत होती. स्व. विलासराव देशमुख देखील सांस्कृतिक कार्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी कलावंतांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची यावेळी प्रत्येक कलावंतांच्या मनात उजळणी झाली असावी. बाकी रंगमंचावर उभारल्यावर अभिनेत्यांचे संवाद हे ‘गोळीबंद’ होतात तर नेत्यांचे संवाद हे ‘टाळीबंद’ होतात….इतकेच !

कोरोना काळात कलावंतांची जी परवड झाली ती पाहता सरकारने आता कलावंतांसाठी ठोस योजना आणावी. कारण संस्कृतीचा जागर करणारी कला आणि कलावंत जगले तरच समृद्धी नांदतेय असं म्हणता येईल…… नाहीतर आहेच की, ‘नेमेची येतो मग पावसाळा’

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)