रशिया-युक्रेन संघर्ष आणि भारत

  • गेल्या दोन वर्षांपासून कोविड-19 मुळे संपूर्ण जग त्रस्त झालेले असताना संसर्गाची लाट आटोक्यात आणण्यासाठी जगभर जी मानवतावादाची ‘लाट’ उसळली होती, ती नेमकी कोणत्या उद्देशाने ? हाच खरा प्रश्न आहे.
  • कोविड-19 या व्हायरसला चीनने जन्माला घालून संपूर्ण जगाला संकटात टाकले. या नव्या वादातून संपूर्ण जग (एकटे पाकिस्तान सोडून) चीनच्या विरोधात गेल्याचे चित्र निर्माण झाले होते.
  • अमेरिकेने तर चीनच्या आर्थिक मुसक्या आवळण्याची भाषा केली होती. भारताचे चीनबरोबर सीमेवरून नेहमीच तणावपूर्ण संबंध राहिले आहेत. अश्यास्थितीत चीनविरोधात युद्ध छेडल्या गेले तर ते तिसरे महायुद्ध असेल अश्या वल्गना युद्धशास्त्र निपुण अभ्यासकांकडून केल्या गेल्या होत्या.
  • याच दरम्यान इस्रायलच्या गृहयुद्धाने मध्यआशिया आणि युरोप ढवळून निघाला होता. ‘इस्लाम खतरे में है’चा घासून गुळगुळीत झालेला नारा देत पाकिस्तानने सर्व मुस्लिम देशांना एकवटण्याचा प्रयत्न केला. मात्र सतत दुसऱ्या देशांना कर्ज मागून स्वतःचा देश चालविणाऱ्या पाकिस्तानची पत आता मुस्लिम राष्ट्रात देखील राहिली नाही हेच जगासमोर आले आहे.
  • इस्रायलचे गृहयुद्ध शमते न शमते तोवर तालिबानने अफगाणिस्तानात छेडलेल्या रक्तरंजित सत्तापालट नाट्याने पुन्हा एकदा अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला मान्यता द्यायची की नाही या मुद्यावरून अमेरिका आणि रशिया-चीन असे दोन गट पडले. अलीकडच्या वीस-पंचवीस वर्षांच्या काळात अमेरिकेची आशिया खंडातील वाढती दादागिरी हा देखील या दुफळीमागील अंतस्थ हेतू आहे.

आता यासर्व परिस्थितीचा विचार केला तर रशिया युक्रेनवर युद्ध लादत जगाच्या बाजारपेठेत युद्धज्वर का वाढवत असावा. एकतर युक्रेन २०१४ पासून ‘नाटो’ मध्ये सामील होण्यासाठी धडपडत आहे. अश्यास्थितीत अमेरिकेचे लष्कर सीमेवर येईल हीच रशियाची खरी भीती आहे. त्यामुळे युक्रेनने ‘नाटो’मध्ये सामील होण्याचा प्रयत्न थांबवावा. याबरोबरच नैसर्गिक वायूचा साठा हा देखील जगाच्या बाजारपेठेवर वर्चस्व ठेवण्याचे प्रमुख कारण ठरू शकते. अर्थात हे सर्व तर्क असले तरी रशियाला युरोप आणि आशिया खंडावर अमेरिकेचे वाढते वर्चस्व खटकते हेच युक्रेनवर युद्ध लादण्याचे सध्यातरी प्रमुख कारण मानता येईल. आता हे युद्ध तिसऱ्या महायुद्धात रुपांतरीत होवू नये यासाठीच जगातील शांतताप्रिय देश प्रयत्नशील राहतील या दृष्टिकोनातून विचार केला तर भारताचे महत्व आता प्रकर्षाने पुढे येते. इस्रायलचे गृहयुद्ध असो अथवा अफगाणिस्तानची यादवी असो भारताने घेतलेली भूमिका निश्चितच जगभर चर्चेचा विषय बनली. रशिया आणि अमेरिका या दोन्ही महासत्तांचे भारताबरोबर असलेले संबंध हे निश्चितच भारताच्या मध्यस्थीच्या भूमिकेला स्वीकारणारे ठरतील. त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतिक स्तरावरील प्रतिमेचा प्रभाव देखील संभाव्य तिसऱ्या महायुद्धापासून जगाला रोखू शकेल. असं म्हणतात की शेजारील राष्ट्राच्या संबंधांबाबत जसा भारत आणि पाकिस्तानचा संघर्ष आहे अगदी तसाच युक्रेन आणि रशियाचा संघर्ष आहे. भारत ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देत असला तरी युद्धाची भूमिका टाळतो अगदी त्याच पद्धतीने रशियाने युद्धाची भूमिका टाळावी. या दृष्टिकोनातून सुद्धा नरेंद्र मोदी यांची मध्यस्थी फलद्रुप होईल. सध्या मोदी (अर्थात भारत) यांच्याबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध रशियाला, युक्रेनला आणि अमेरिकेलादेखील हवे आहेत.

युक्रेनची राजधानी कीव शहरावर रशियन फौजांनी हल्ला चढविल्यानंतर युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. भारतीय दूतावास त्यासाठी सतर्क झाले असून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षितते बरोबरच त्यांना भारतात आणण्यासाठी सज्ज झाले आहे. युक्रेनमध्ये जवळपास वीस हजारावर भारतीय आहेत. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षात भारताने ठोस भूमिका घेण्यामागे हे अतिशय महत्वाचे कारण आहे. काल म्हणजे २४ फेब्रुवारी रोजी भारतातील बहुतांश ईमेल धारकांना युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांचे सुटकेची याचना करणारे मेल मिळाले आहेत. यात फेकमेल किती ? हा चर्चेचा विषय होवू शकतो. किंवा अशाप्रकारच्या आवाहनातून पैसे पाठवण्याची मागणी करणारे फसवे मेल देखील ठगांकडून पाठविले जाऊ शकतात. अश्या ईमेलची शहानिशा करूनच त्याला प्रतिसाद द्यावा. कारण जिथे माणुसकी दुबळी होते तिथे लूटमार करणाऱ्या टोळ्यांचे साम्राज्य निर्माण होते. या युद्धजन्य परिस्थितीत युक्रेनमध्ये आता लुटमारीला ऊत येईल. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारवर दबाव आणताना आपण लुबाडले जावू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी. विशेषतः माणुसकीच्या नावाने कंठशोष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी याचे भान ठेवणे गरजेचे आहे. नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणाने सरकारला धारेवर धरणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना आता युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय हा मुद्दा चघळण्यासाठी मिळाला हे मात्र खरे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)