आमच्या गल्लीत गव्हर्नर यायले बेss…!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

साधुसंत येति घरा,तोचि दिवाळी-दसरा असं पूर्वी म्हंटलं जायचं. आता राजकारणी येता दारा, सुविधांसाठी हातपाय पसरा’ असं म्हणायची पाळी आली आहे. तसं आम्हाला पण राजकारणी लोक कधी आमच्या भागात येतात याची आम्ही वाटच पहात असतो. त्यातही गल्लीत येणार म्हणल्यावर अपेक्षांची भलीमोठी यादीच तयार असते. तेव्हढेच त्यांच्या निमित्ताने का होईना थोड्याफार सुविधांची कामे होतात. ते ज्या मार्गावरून जाणार असतात त्या मार्गाची रात्रीतून दुरुस्ती होत असते.(एरव्ही खड्ड्यातून रस्ते शोधावे लागतात) त्यादिवशी पाणीपुरवठा वेळेवर होतो, वीज खंडित केली जात नाही. प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी लोक नागरिकांशी अतिशय आत्मीयतेने बोलतात. मंत्र्यांच्या दौऱ्यात थोडं वेगळं असतं… तिथं त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमधून मंत्री महोदयांना भेटणं मुश्किल असते. शिवाय मागण्यांच्या निवेदनांचे ‘लोणचे’ पीएच्या ताटात वाढले जाते. मग मंत्र्यांना भेटून काय फायदा ? नमस्कार देवाला अन प्रसाद पुजाऱ्याला…असं असतंय. तरीपण कोणतरी पाहुणा आपल्या गल्लीत यावा असं सगळ्यांनाच वाटत असतं. त्यातही राज्यपाल पाहुणा असेल तर…..! लय ‘दबदबा’ असतो म्हणे. राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या दौऱ्यावेळी लई मोठा विकासनिधी मंजूर होतो म्हणे (आमचं ज्ञान एव्हढंच आहे). मागं २००८ मध्ये आमच्या शहरात राष्ट्रपती आले होते. विमानतळापासूनचा रस्ता एकदम ‘टकाटक’ केला होता. तेंव्हापासून आम्ही त्याला व्हीआयपी रोड म्हणतो. आता कोश्यारी अण्णा आमच्या गल्लीतच येणार म्हणल्यावर गल्लीतले रस्तेबी टकाटक होतील.

राज्यपालांच्या स्वागतासाठी रस्त्याची डागडुजी सुरू…..

सगळे निर्बंध आता शिथिल होत असताना गव्हर्नर साहेब आमच्या गल्लीत येणार म्हणल्यावर तयारी जोरात होणारच की. पण परवा दिवशी (२७ फेब्रुवारी) औरंगाबादेत राज्यपाल कोश्यारी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या श्री समर्थ साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधी दाखला देताना जे काय बोलले त्यावरून चांगलाच धुरळा उडलाय राव….”चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल ? गुरुंचे आपल्या समाजात मोठे स्थान असते. छत्रपतींनी समर्थांना म्हंटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरूला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ही राज्याची चावी मी तुम्हाला देतो. त्यावर समर्थ म्हणाले की, ही राज्याची चावी मला कुठे देता ? तुम्हीच याचे ट्रस्टी आहात.” या कोश्यारी अण्णांच्या वक्तव्याने वादळ उठलं. इथं आम्ही थंडगारच पडलो की हो…!

जुळेसोलापुरातील प्रणवनगरी मधील विवेकानंद केंद्राच्या नूतन इमारतीच्या वास्तुपुजन कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू...

जुळेसोलापुरातील प्रणवनगरी मधील विवेकानंद केंद्राच्या नूतन इमारतीच्या वास्तुपुजनासाठी दि. ४ मार्च रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते, स्वामी विवेकानंद यांच्या अध्यात्मिक विचारांना मानणारा वर्ग आणि शहर आणि जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या जय्यत तयारीत गुंतले आहेत. हा कार्यक्रम अधिक देखणा आणि नेटका व्हावा यासाठी झटत आहेत. राज्यपाल आमच्या गल्लीत येणार म्हणून जुळेसोलापूर परिसरातील नागरिक यानिमित्ताने का होईना आमच्याकडे कुणाचे तरी लक्ष जाईल म्हणून सरसावून बसलेले असताना आता राज्यपालांच्या औरंगाबादच्या कार्यक्रमातील ‘त्या’ विधानाचे पडसाद पाहून ते आता इथं काय बोलतील ? अन मग आम्हाला काय मिळेल ? याचा विचार करत बसले आहेत. कोश्यारी अण्णा हे तुम्ही काय बोललात..? राज्याची चावी….ट्रस्टी…इतिहासात किंवा बखरीत अशी कुठं समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संवादाची नोंद आहे का ? कोणताही आधार नसताना बोलायला तुम्ही काय सक्रिय राजकारणी आहात की इतिहास संशोधक ? असलं कायपण बोलायचा अधिकार महाराष्ट्रात ज्या कुणाला दिला आहे ते रोज मुक्ताफळे उधळत असतात. तुम्ही त्यांच्या रांगेत जावून का बसत आहात ? चार दिवस अगोदर असा शाब्दिक बॉम्ब तुम्ही फोडलात…. ‘तुम्ही जोमात अन आम्ही कोमात’ अशी अवस्था झाली ना राव…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)