
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संतप्त शिवप्रेमींचा रोष ओढवून घेतलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा शुक्रवार दि. ४ मार्चचा सोलापूर दौरा हा तणाव, बंदोबस्त आणि निदर्शनाच्या गदारोळात झाला. दि. २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींनी राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. सोलापुरातील शिवप्रेमी विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीतील समाविष्ट राजकीय पक्षांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या सोलापूर दौऱ्यात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. दि. ४ मार्चरोजी विवेकानंद केंद्राच्या जुळेसोलापूर येथील प्रणवनगरी येथे उभारण्यात आलेल्या विवेकानंद केंद्र वेदांतिक अप्लिकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट या प्रकल्पाच्या वास्तूचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोलापूर दौऱ्यावर येण्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून औरंगाबाद येथील कार्यक्रमातील ‘कथित’ विधानाबद्दल खुलासा माध्यमातून देण्यात आला होता. मात्र संतप्त शिवप्रेमींनी राज्यपाल कोश्यारी यांनी रायगडावरील शिवरायांच्या समाधीवर नतमस्तक होत माफी मागावी ही मागणी करीत सोलापूरचा राज्यपालांचा दौरा हाणून पाडण्याचा चंग बांधला होता. त्यामुळेच राज्यपालांच्या सोलापूर दौरा महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

सोलापूर विमानतळ परिसर, मजरेवाडी, आसरा चौक आणि जुळेसोलापूर परिसरात सकाळपासूनच शिवप्रेमी कार्यकर्ते गनिमी काव्याने एकवटू लागले होते. याची पूर्वकल्पना असल्याने शहर पोलीस आयुक्तांनी बंदोबस्त वाढविला होता. एसआरपी पोलीस बलासह उस्मानाबाद पोलिसांचीही जादा कुमक दिसून आली. सकाळी राज्यपाल आपल्या ताफ्यासह विमानतळावरून निघाल्यानंतर आसरा चौकात सर्व शिवप्रेमींनी रस्ता दुभाजकाच्या एका बाजूला उभे राहून निदर्शने करीत राज्यपालांच्या निषेधाच्या घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. तर दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने राज्यपालांच्या ताफ्याला मार्ग देत पोलिसांनी आंदोलकांना थोपवून धरले. यावेळी या निदर्शन आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी उपमहापौर पद्माकर काळे, काँग्रेसचे पालिका गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, सकल मराठा समाज संघटनेचे समन्वयक माऊली पवार, दास शेळके, प्रताप चव्हाण, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये महिलांचा देखील सहभाग होता. कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सकाळपासून ते राज्यपाल परत जाईपर्यंत या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. शिवप्रेमी आंदोलकांनी रीतसर निदर्शने करीत आपले आंदोलन यशस्वी केले. कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला.

यासगळ्या प्रकारात विवेकानंद केंद्राच्या देखण्या कार्यक्रमावर तणावाचे मळभ पसरले होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमुळे बंदिस्त जीवन जगण्याची पाळी आली होती. आत्ताशी कुठे मोकळीक मिळू लागल्याने सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त लोकांना बाहेर पडायला संधी मिळू लागलीय. पण शे-पाचशे निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्याची वेळ आयोजकांवर आली. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहास पुरुष नाहीत तर ते महाराष्ट्राचे दैवत आहे. मुद्दामहून तर नाहीच नाही, पण अनावधानाने देखील त्यांच्याविषयी अनादर व्यक्त होईल अशी वक्तव्ये कुणीच खपवून घेणार नाही हेच यावरून सिद्ध झाले. देशात, राज्यात, शहरात, गावात, समाजा-समाजात राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत. पण श्रध्देला ठेच बसेल अशी विधाने कुणी करू नयेत. एरवी सोलापूर हे आदरातिथ्य करणारे गाव म्हणून ओळखल्या जाते. पाहुणा कुणीही असो त्याचा आदरसत्कार करणे, त्याला तृप्त करणे ही सोलापूरची संस्कृती आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हा दौरा केवळ ‘त्या’ एका वादग्रस्त विधानाने काळवंडला. इथून पुढे तरी अश्या प्रमुख पदावरील व्यक्तींनी त्यांना भाषणासाठी लिहून दिलेली ‘स्क्रिप्ट’ चार अभ्यासकांकडून तपासून घ्यावी. एवढं करूनही वादग्रस्त मुद्दे मांडायचे असतील तर त्याची जबाबदारी देखील स्वीकारावी. अश्या प्रकारातून निर्माण होणाऱ्या तणावाची झळ सर्व समाजाला सोसावी लागते. मागे याची आठवण असू द्या….तूर्त इतकेच..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा