मोदी यांची व्होटबँक की हिंदुत्वाची व्होटबँक…?

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पक्षाला पंजाब सोडून इतर चार राज्यात म्हणजेच उत्तरप्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या चार राज्यात मिळालेल्या दणदणीत यशाचा अन्वयार्थ लावण्यात आता सर्व राजकीय निरीक्षक, वृत्तपत्रे, माध्यमे मश्गूल झाली आहेत. भारताबरोबरच भारतीय राजकारणाकडे डोळे लावून बसलेल्या इतर देशांमध्येही या निकालाचे पडसाद उमटू लागले आहेत. आजकाल भारतीय जनता पक्षाने कोणत्याही निवडणुकीत यश मिळवले की लगेचच आरएसएसचा हात असल्याची चर्चा सुरू होते. जिथे आरएसएसचा उल्लेख येतो तिथे त्यापाठीमागे हिंदुत्ववादाचा विषय येतो. म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा विजय म्हणजे हिंदुत्ववादाचा विजय हे समीकरण मांडल्या जाते. यात कितपत तथ्य आहे..? जर भाजपच्या मतांचा टक्का वाढला हे कबूल केले तर इतर राजकीय पक्षांच्या विचारधारेला जनतेने नाकारले असा त्याचा अर्थ निघू शकतो. या देशात निधर्मीवादाची व्याख्या आणि मांडणी राजकीय पटलावर प्रत्येक राजकीय पक्षांनी आपआपल्या सोयीप्रमाणे केलेली आहे. त्यातही काँग्रेसच्या सेक्युलॅरिझम बरोबर काहीप्रमाणात मिळतीजुळती निधर्मीवादाची व्याख्या कॉंग्रेसमधूनच फुटून जन्माला आलेले पक्ष करतात. त्यामुळेच पक्षपातळीवर यशपयशाची आकडेमोड करताना हिंदुत्ववादी आणि सेक्युलर अशी मांडणी करत पक्ष आणि नेतृत्वाच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जातो. आताही या पाच राज्यांच्या निकालानंतर हेच रडगाणे म्हंटले जाणार आहे. म्हणूनच या पाच राज्यांच्या निकालानंतर आता हा प्रश्न निर्माण होतोय की भाजपाला एव्हढे घवघवीत यश मिळवून देणारे मतदार हे मोदी यांची व्होटबँक आहे की हिंदुत्वाची व्होटबँक आहे ?

मुळातच १९२५ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘हिंदुत्वाची’ व्याख्या वेगळी अधिक व्यापक अशी आहे. भारतीय हेच हिंदुत्व मानणाऱ्या संघाला हिंदुधर्मातील विविधता मान्य आहे. पण याही अगोदर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पहिल्यांदा ‘हिंदुत्वाची’ व्यापक व्याख्या मांडली. राजकीय पटलावर बहुदा तीच हिंदुत्वाची पहिली ओळख असेल. त्या अगोदर स्वातंत्र्यलढ्यात उतरलेल्या काँग्रेसमध्ये मवाळ आणि जहाल असे दोन गट होते. पुढे कॉंग्रेसपासून दुरावताना या दोन्ही गटातील अनेकजण हिंदुत्व या विचारधारेला जोडले गेले. म्हणजेच राजकीय पटलावर आलेला हिंदुत्ववाद हा देखील आता शंभर वर्षे जुना आहे. १९७७ च्या आणीबाणीपर्यंत काँग्रेसला चालत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंदिरा काँग्रेसच्या नजरेत हिंदुत्ववादी बनला. तर काँग्रेसचा सेक्युलॅरिझम हा ८० च्या दशकात उसळी मारून वर आला. तेंव्हापासून राजकीय यशापयशाच्या मांडणीत हिंदुत्ववादी आणि सेक्युलर हे परवलीचे शब्द ठरले आहेत. मात्र १९८० मध्ये जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षाने पितृ संघटना असलेल्या आरएसएसचा हिंदुत्ववाद राजकारणात शंभरटक्के आणला आहे का ? सत्ता मिळवायची म्हणून जो निवडून येवू शकतो त्याला उमेदवारी देण्याची ‘बनिया’गिरी करणारा आजचा भाजपा हा आरएसएसच्या इशाऱ्यावर अथवा तत्वावर चालतो असं जर विरोधकांचे म्हणणे असेल तर या देशातील सर्व विरोधी राजकीय पक्षांपेक्षाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बलवान आहे हे विरोधकचं मान्य करत आहेत असा यातून अर्थ काढायचा का ? मुळात भारतात अगदी राजेशाही काळापासून वेगवेगळ्या धर्मातील राजघराण्याच्या सत्ता होत्या. हिंदू, जैन, बौद्ध, मुस्लिम धर्मीय राजवटींनी भारतावर राज्य केले आहे. भारतात कोणत्याही राजवटीत धर्मवाद नव्हता. हिंदू धर्मांतर्गत असलेल्या जाती-उपजातींमध्ये टोकाचा संघर्ष असल्याने भारतात जातीयवाद होता हे इतिहासाला देखील मान्य आहे. मात्र याच जातीयवादाला धर्मवादाचा मुलामा देत भारतीय राजकारणात राजकीय ‘हिंदुत्ववाद’ पोसल्या गेला. पाकिस्तान निर्मितीनंतर हिंदू-मुस्लिम संघर्ष झाला आणि होतोय तो केवळ याच पोसलेल्या राजकीय हिंदुत्ववादामुळेच. या देशात राहणाऱ्या सर्वच मुस्लिमांवर बहुसंख्य हिंदूंचा राग नाही. जे राष्ट्रीयत्वाला आव्हान देतात त्या मुस्लिमांच्याच नव्हे तर तो कोणत्याही धर्माचा अनुनय करणारा असो त्याच्या विरोधात भारतीय आपला संताप व्यक्त करतो.

आता मूळ विषयावर येवू यात, १९८० मध्ये जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्ता स्थापन करायला १६-१७ वर्षे वाट पहावी लागली. अर्थात राजकीय पक्षाच्या दृष्टीने हा कालावधी देखील खूप कमी असाच आहे. मात्र एव्हढ्या वेगाने सत्तेपर्यंत पोहोचायला त्यावेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेसचा नाकर्तेपणाच कारणीभूत होता. स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या रूपाने सत्तेवर आलेल्या भाजपाने अल्पमतात आलेले सरकार कोसळण्याचा अनुभव देखील घेतलेला होता. त्यामुळे निवडून येणाऱ्याला उमेदवारी हा निकष भाजपाने देखील स्वीकारला आहे. निवडून येण्यासाठीच निवडणूक लढवायची असते हा तर्क जर प्रमाण असेल तर भाजपा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष कसा काय होतो ? कारण भारत हा बहुधर्मीय देश आहे. राहता राहिला इथल्या जातीय अस्मितेचा प्रश्न. तर भारतातील सर्वच राजकीय पक्ष जातीय तोंडवळा घेऊन जन्माला आले आहेत. तसेच त्यांनी बेरजेचे राजकारण करीत इतर जातींना चुचकारत नवे मुखवटे धारण केलेले आहेत. पूर्वी ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा भाजपा आता बहुजनांचा पक्ष म्हणून ओळखला जातोय. आता सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीय राजकारणात विचारधारेपेक्षाही व्यक्तिकेंद्रित राजकारणाला महत्व दिले जाते हेच वास्तव आहे. काँग्रेसची सत्ता असुदेत अथवा इतर पक्षांची सत्ता असुदेत. डाव्यांची असुदेत अथवा उजव्यांची. सत्तेचे आणि मतांचे राजकारण हे व्यक्तिनिष्ठच राहते. जोपर्यंत पक्षाचे नेतृत्व आपला प्रभाव टिकवून असते तोपर्यंत त्या पक्षाला वाढता जनाधार मिळतो. नेतृत्वाचा प्रभाव निवळला की जनाधार कोसळायला सुरुवात होते. काँग्रेस सध्या याच फेजमधून जात आहे. यासर्व बाजूंचा बारकाईने अभ्यास केला तर पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालावरून हेच सिद्ध होते की भाजपाला मिळालेला जनाधार ही मोदी यांची व्होटबँक आहे. कारण भारतीय हेच राष्ट्रीयत्व आणि हेच हिंदुत्व असेल तर हिंदुत्ववादी ही व्होटबँक होवू शकत नाही.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)