एक मोदी विरुद्ध छत्तीस प्रतिमोदी

भारतीय चॅनल्सवर फॉग परफ्यूम आणि बॉडिस्प्रे उत्पादनांची एक लोकप्रिय ठरलेली जाहिरात सतत दाखविण्यात येते. या जाहिरातीत एक बुचकळ्यात पडलेला व्यक्ती वेगवेगळ्या दुकानदारांना विचारतो…’क्या चल रहा है ?’ त्यावर तो दुकानदार म्हणतो…’फॉग चल रहा है’ त्या व्यक्तीकडून वेगवेगळ्या पद्धतीने हाच प्रश्न विचारला तरी उत्तर एकच येते….’फॉग चल रहा है’. सध्या भारतीय राजकारणात देखील असंच सुरू आहे. भारतीय राजकारणात ‘क्या चल रहा है?’ म्हणून तुम्ही कुणालाही विचारलात, अगदी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत…उत्तर एकच मिळेल…’मोदी का विरोध चल रहा है’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध म्हणजेच भारतीय जनता पक्षाला विरोध या विचारातून अगदी गल्लीतल्या कार्यकर्त्यापासून ते दिल्लीतल्या नेत्यांपर्यंत सध्या हेच ‘केमिकल इक्वेशन’ मांडले जात आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून भाजपा सत्तेवर आली. म्हणून आता २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्याच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून मोदींना म्हणजेच भाजपाला पराभूत करायचे हा चंग बांधून दिवसरात्र सोशल मीडियातून ‘मोदी विरोधी’ वातावरण निर्माण करायचा प्रयत्न भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील असे एकूण ३६ प्रतिमोदी आणि त्यांचे ‘थिंक टॅंक’ असलेले समर्थक करीत असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही घटक राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात जावून ‘क्या चल रहा है ?’ म्हणून कुणालाही विचारलात तर उत्तर एकच येईल..’मोदी का विरोध चल रहा है’.

‘काट्याने काटा काढायचा’ या डावपेचानुसार मोदींनी २०१४ मध्ये ज्या सोशल मीडियाचा प्रमुख अस्त्र म्हणून वापर केला त्याच सोशल मीडियाचा आधार घेत मोदींवर एकसारखा हल्ला करून त्यांना जेरीस आणायचे. म्हणजे २०२४मध्ये सत्तापालट अटळ होईल ही त्यामागची अटकळ आहे. जनतेला मोदींचा खरा चेहरा दाखवायचा. एकदा का मोदी वजा झाले की उर्वरित भाजपा शून्य होईल. मग सत्तांतर होणे अशक्य नाही ही ‘स्ट्रेटर्जी’ मोदींविरोधी थिंक टँक रोज इमानेइतबारे सोशल मीडियातून मांडत असते. मात्र अजूनतरी या ‘केमिकल इक्वेशन’चा रिझल्ट दिसून येत नाहीय, त्यामुळे सर्व प्रतिमोदी अस्वस्थ आहेत. बेमालूमपणे सोशल मीडियावरून आपला ‘प्रपोगंडा’ चालविण्यात मोदीग्रुपचा हातखंडा असल्याचे मान्य करणाऱ्या मोदी विरोधकांना अजूनही सोशल मीडियावर हा हातखंडा आजमाविता येत नसल्याने सोशल मीडियावरून मोदी विरोध करण्यात त्यांचा ‘केमिकल लोचा’ होतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी राबवित असलेल्या भाजपाच्या धोरणात्मक भूमिकेला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या विचारधारेच्या मोदी विरोधकांकडे हिंदू बहुल समाजाला आकर्षित करणारे मुद्दे नाहीत. बहुसंख्य हिंदूंना केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखणाऱ्या भाजपाचे जर भारतीय जनतेला आकर्षण वाटत असेल तर विरोधकांची ‘सेक्युलर’ भूमिका तितकासा प्रभाव टाकू शकणार नाही हेच २०१४ आणि २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांमधून सिद्ध झालंय. या दहा वर्षांच्या काळात भाजपाच्या हातूनही काही राज्ये गेली आहेत. मात्र ती राज्यातील नेतृत्वाच्या अकार्यक्षमतेमुळे किंवा गृहीत धरण्याच्या अतिउत्साही धोरणांमुळे गेली आहेत. यात विरोधकांनी फार मोठी बाजी मारली असे नक्कीच नाही. तरी देखील सत्तेसाठी तहानलेल्या विरोधकांना ह्या दोन-चार राज्यातील विजयाने ‘ओएसीस’ सापडल्याचा नक्कीच आनंद झाला आहे. बहुसंख्य हिंदू या विचारधारेला कडाडून विरोध करणे हे जन्माने हिंदू असणाऱ्या तथाकथित ‘सेक्युलर’ मंडळींना पचनी पडत नसल्यानेच सतराशेसाठ पक्षांची मोळी बांधूनही विरोधक मोदींना पराभूत करू शकले नाहीत. याउलट मोदींना विरोध करता-करता प्रत्येक घटक राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेशाचे हे विरोधक आता प्रतिमोदी बनू लागले आहेत. त्यामुळेच भारतीय लोकशाहीत सत्तेच्या सारीपाटाची लढाई ही सरळ-सरळ मोदी विरुद्ध प्रतिमोदी अशी होवू पहात आहे.

मोदींच्या विरोधात युपीएची मोट बांधून काँग्रेस फारकाही प्रभाव पाडू शकली नाही. मुळातच नेतृत्व निष्प्रभ ठरत असताना आलेल्या मोदीलाटेने काँग्रेसचे अस्तित्वच पणाला लागले. गेल्या दहा वर्षांत कॉग्रेस नेतृत्वाच्या प्रभावहीनतेमुळे अस्तित्वासाठी धडपडताना दिसत आहे. आपोआपच शक्तिपात झालेल्या काँग्रेसला इतर प्रादेशिक पक्षांची मोदीविरोधी मोट बांधावी लागली. या प्रादेशिक पक्षांना फक्त आपल्या राज्यात मोदींचा भाजपा सत्तेवर नकोय. केंद्रात सत्तेवर असला तरी चालेल. त्यामुळेच त्यांचा मोदीविरोध हा तकलादू ठरतोय. रोज उठून त्यांच्या समर्थकांचा सोशल मीडियावर सुरू असलेला मोदी विरोध हा केवळ राज्यातील सत्तेभोवती केंद्रित झालेला दिसून येतो. या धडपडीत कधी-कधी त्यांचे देखील हिंदुप्रेम उफाळून येते. मग ‘जानवे’घालून देवदर्शनापासून ते अग्निहोत्राच्या विधीत सामील होत हिंदू मतदारांना ‘आम्ही तुमचेच आहोत’ हे सांगण्याचा खटाटोप केला जातो. मुळात सत्तालोलुप कॉंग्रेसमुळेच या देशात धर्मनिरपेक्षता वादाची सगळ्यात जास्त खिल्ली उडाली. प्रादेशिक पक्षांनी आपल्या सोयीच्या जाती समूहाचे प्रतिनिधित्व करण्याचे धोरण त्यामुळेच राबविले. आता हेच प्रादेशिक पक्ष सोबत घेऊन काँग्रेसला जर मोदींच्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर बहुसंख्य हिंदू मतांचे विभाजन हिंदुत्वाच्या विचारांना सन्मानित करतच शक्य होणार आहे. धर्मनिरपेक्ष भारताचे राजकारण हे धर्म सुरक्षिततेकडे झुकू लागलेले असताना प्रमुख विरोधी म्हणून काँग्रेसने आता बहुसंख्य हिंदू केंद्रित आणि अल्पसंख्य सुरक्षिततेचे समांतर धोरण स्वीकारले तरच आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमधून भाजपाचा अश्वमेध रोखणे शक्य होईल. अन्यथा केंद्रात भाजपा आणि राज्यात प्रादेशिक पक्ष हा ‘केमिकल लोचा’ धर्मनिरपेक्ष लोकशाही म्हणविणाऱ्या भारताला ‘हिंदुराष्ट्र’ बनविण्याच्या मार्गाकडे घेऊन जाईल. भाजपाचे तेच स्वप्न आहे. हे ते उघडपणे बोलून दाखवितात. केवळ प्रतिमोदी उभे करून रोज सोशल मीडियावर गरळ ओकल्याने नरेंद्र मोदीला हरविता येणार नाही.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)