
कालच्या ११ एप्रिलला ५७ वे वर्ष लागले. मोठ्या लोकांचे जन्मदिवस अगदी आठवणीने सर्वसमाज साजरा करत असतो. अगदी त्यांच्या पश्चात देखील ‘जयंती’ म्हणून उत्सव साजरा केला जातो. राजकीय लोकांचे वाढदिवसाचे सोहळे कार्यकर्ता नावाच्या प्राण्यामार्फत घडवून आणले जातात. आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांचे वाढदिवस मात्र घरातली आपली माणसे, मित्रमंडळी, हितचिंतकांच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे साजरे होतात. आजकाल माणसे कमावणे याचं गणित हे तुमच्या अशा कार्यक्रमांना कितीजण प्रतिसाद देतात यावर ठरते. सोशल मीडियाच्या आभासी जगात याला फार महत्व आहे. वाढदिवसाचा तुमचा आनंद हा दिवसभर तुमच्या मोबाईलवर ‘अभिष्टचिंतन’ करणारे किती मेसेजेस येऊन थडकतात यावरच अवलंबून असतो. लहानपणी वाढदिवसाच्या एक आठवडा अगोदरपासून ‘अमुक तारखेला माझा वाढदिवस आहे, घरी यायचं बरं का’ याची घोकंपट्टी चालायची. मग आईकडे हट्ट करून मित्रमंडळींसाठी ‘भेळ भत्त्याची’ तजवीज करावी लागायची. फुटपट्टी, पेन, पेन्सिल, वह्या, खोड रबर, कंपासपेटी, चॉकलेट्स अश्या भेटवस्तूंचा किती ‘नजराणा’ मिळतो यावरच आपली श्रीमंती ठरायची. अर्थात लहानपणी एव्हढं समजत नसलं तरी समान ऐपतीचेच ‘जिगरी’ दोस्त असायचे. मला वाटतं नकळत्या वयापासूनच आपल्या मनावर हे बिंबविल्या जात असावे. समाजातील ही वर्गवारी अगदी पहिल्या वाढदिवसापासून सुरू होते. जेंव्हा तुमच्यापेक्षा मोठ्या आर्थिकस्तरावरचे लोक तुम्हाला वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला जमू लागतात, तेंव्हा तुमचा आर्थिकस्तर बदलला असं समजायला हरकत नाही. मी सत्तावन्न वर्षांचा झालो पण अजूनही माझा हा स्तर काही बदलला नाही. त्यामुळेच कदाचित माझे नुसतेच ‘वय’ वाढत चाललेय याचा मला देखील अलीकडे साक्षात्कार होतोय. बरं यात तुमचे काही स्तर बदललेले ‘जवळचे’ देखील तुम्हाला पदोपदी नांगी मारून अपमानित करण्याची, तुमच्या आयुष्याचा त्यांच्या नजरेतील ‘हिशोब’ मांडण्याची संधी सोडत नसतात. अगदी तुमच्या आनंदाच्या क्षणी सुद्धा तुमच्यावर ‘तोंडसुख’ घेण्याची संधी सोडत नसतात. म्हणून तर माझ्यासारखे सर्वसामान्य आणि आयुष्यात सदा ‘धडपडीचा’चा शिक्का माथी मारून घेतलेले आपला आनंदोत्सव आपल्याच कोषात साजरा करतात. न जाणो शुभेच्छा देण्याचे निमित्त साधून कुणी ‘नांगी’ तर मारणार नाही ना..? या भीतीने शुभेच्छा देणारे मेसेजेस देखील उघडून पाहण्याचे धारिष्ट्य दाखवत नसतात. कारण विंचवांना कुणी आमंत्रण देत नसतं. ते सांदी-कपारीतून तुमच्या आयुष्यात घुसत असतात.

जाऊ द्या हे पुराण तर पाचवीला पुजलेले असते. प्रत्येकाचा कमी-अधिक प्रमाणात असाच अनुभव असतो. कालचा सत्तावन्नव्या वर्षात पदार्पण करणारा क्षण नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतकांनी दिवसभरात प्रत्यक्ष भेटून, फोन करून, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या समाज माध्यमातून मला शुभेच्छा व्यक्त करीत अगदी आपल्या प्रेमाचा ‘ऋणको’ करून टाकले. त्यात दै. दिव्यमराठीचे युनिट हेड नौशाद शेख, जुळेसोलापूर भागातील भाजपाचे युवानेते विशाल गायकवाड, विजय-प्रताप युवा मंचचे सोलापूर कार्यालय प्रमुख दीनानाथ जाधव, उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेचे संजय पौळ, हॉटेल व्यावसायिक राजेंद्र उर्फ पम्पूसेठ गांधी, पत्रकार प्रशांत संगवे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य आनंद खरबस, प्रा.डॉ. रणजित गायकवाड, डॉ. रवी गायकवाड, सुमित फुलमामडी आदी अनेकांनी स्वतंत्र पोस्ट डकवून शुभेच्छा शेअर केल्या. अनेक परिचित, जिगरी दोस्त, सहकारी, ओळखीचे, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त करीत जणू माझी श्रीमंतीच वाढविली. पत्रकारिता आणि नाट्यक्षेत्र हे तर माझे आंगणच. किती जणांची नावे घेवू उलट चुकून एखादे नाव घ्यायचे राहून गेले तर त्याच्या भावनेचा उपमर्द केल्या सारखे होईल. तुम्हां सर्वांनी मिळून आईबापाविना पोरक्या झालेल्या माझ्या सारख्या निष्कांचन कलम बहाद्दराला शुभेच्छा देवून श्रीमंत बनविले. आभार हा केवळ औपचारिक भाग झाला पण तुमच्या ऋणात राहणेच योग्य.

विश्वचक्र हे अविरत फिरते मरणामधुनी जीवन सरते अश्रू आजचे उद्या हासती नवल असे केव्हढे सारखा काळ चालला पुढे कुणाचे कुणा वाचून अडे ।। कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेच्या या ओळी वाढत्या वयाला आणि आयुष्यात येणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांना अनुसरून अगदी योग्य वाटतात. खरंच आपण जिवंत आहोत तोवरच वाढदिवसाचे कौतुक ‘याची देही याची डोळा’ अनुभवावे. मृत्यू नंतर आपली जयंती करायला आपण काय महात्मा आहोत का ? गेल्या दोन वर्षात परिचित, जवळचे दुरावण्याचे दुःख आपण सर्वांनीच भोगले आहे. जन्म सांगून येतो पण मृत्यू….तो थोडाच सांगून येतो. मग आपल्याला ओळखणारी हितचिंतक मंडळी आभासी जगातल्या भिंतीवर जर आपल्यासाठी शुभेच्छांचा चार चांगल्या ओळी लिहीत असतील तर त्याचा ‘उत्सव’ करण्याचा कलंदरपणा आपण करायलाच हवा. बाकी कुणी नाही तरी आपली सहचारिणी आपल्या पाठोपाठ अनंताकडे जाणारी वाट मूकपणे चालत असतेच की….हॅपी बर्थडे म्हणणारा तिचा एक हुंकार तुमचं एक वर्षाचं आयुष्य नक्कीच वाढवितो. बाकी साठीच्या जवळ यायला लागलोय….विसराळूपणा वाढू नये एव्हढीच इच्छा.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा