आशिया खंडात प्रसिद्ध पावलेल्या गिरणगावाचे भग्नावशेष..!

सव्वाशे वर्षे धडाडत वस्त्रे उत्पादित करणाऱ्या सोलापूरच्या नरसिंग गिरजी मिलचे आता ‘खंडहर’ बनले आहे. सोलापूरच्या वैभवाची साक्ष देणारे मिलचे प्रवेशद्वार आणि मुख्य इमारतीचे भग्नावशेष फक्त शिल्लक आहेत…. कुणीतरी एक जोराचा धक्का देवून जमीनदोस्त करेल याची वाट पहात आहेत.

ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तेंव्हा नुकतेच औद्योगिक युग सुरू झाले होते. भारतातील पिकणारा उत्तम प्रतीचा कापूस जहाजांनी भरभरून नेत इंग्रजांनी इंग्लंडमधील मँचेस्टर सिटीला वस्त्रोद्योगाचे वैभव प्राप्त करून दिले. भारता सारख्या देशाला गुलाम देश बनविणाऱ्या इंग्रजांचा हा सर्वात मोठा फायदा ठरला होता. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपीय देश आर्थिक मंदीच्या तडाख्यात सापडले, तेंव्हा तेथील अनेक वस्त्रोद्योग बंद पडले. या संधीचा फायदा घेत राष्ट्रीय भावना आणि व्यापार डोळ्यासमोर ठेवून गुलाम भारतातील धनिक व्यापाऱ्यांनी युरोपातील बंद पडलेल्या वस्त्रनिर्मितीच्या कारखान्यातील यंत्रसामुग्री घेवून भारतात वस्त्रनिर्मितीच्या उद्योगाला सुरुवात केली. १८५४ मध्ये मुंबईत पहिली सूतगिरणी सुरू झाली. त्यानंतर वीस वर्षांनी म्हणजेच १८७४ मध्ये शेठ गोकुळदास मोरारका यांनी सोलापुरात मिल सुरू केली. तिला ‘जुनी मिल’ म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर चोवीस वर्षांनी म्हणजेच १८९८ मध्ये सोलापुरात नरसिंग गिरजी मिल सुरू झाली. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक व आंध्रप्रदेश या भागात पिकणाऱ्या उत्तम प्रतीच्या कापसामुळे सोलापुरातील या दोन्ही सूतगिरण्या अल्पावधीत तेजीत आल्या. पुढे आशियाखंडात सोलापूरला ‘गिरणगाव’ म्हणून ओळख मिळाली. आजमितीस जुनी मिलच्या प्रवेशद्वाराशिवाय एक वीजनिर्मिती करणारी इमारत शिल्लक आहे. जिथे सध्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. बाकी भूखंडावर नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. तर २००२ मध्ये बंद पडलेल्या नरसिंग गिरजी मिलच्या भव्य देखण्या इमारतींनी गेल्या वीस वर्षांपासून उद्धारकर्त्याची प्रतीक्षा केली. मात्र आता पुनर्वसनाची शक्यताच उरली नसल्याने झाडाझुडुपांनी वेढलेल्या नरसिंग गिरजी मिलच्या इमारती खचू लागल्या आहेत. कुणीतरी येवून बुलडोझरच्या एका धक्क्याने जमीनदोस्त करण्याची वाट पहात हे भग्नावशेष उभे आहेत. आताचे सोलापूरकर देखील आपली गिरणगावाची ओळख पुसू पहात आहे. त्यामुळे या पडक्या भग्न इमारतींचा ढिगारा नकोसा झालाय. शहराच्या मध्यवर्ती भागात सोन्याच्या दरात मिळणाऱ्या भूखंडावर त्याचा डोळा आहे. इतिहासाला डावलले तर भूगोल बिघडतो. असंच काहीसं होवू पहात आहे.

सोलापूरला गिरणगाव ही ओळख मिळवून देणारी मिल म्हणून जुनी मिल बरोबरच नरसिंग गिरजी मिलचे नाव घेतले जाते. हैदराबादच्या निझामाच्या दरबारात मानाचे स्थान मिळविलेल्या गिरजी कुटुंबातील नरसिंग गिरजी व धनराज गिरजी या बंधूंनी सोलापुरातील त्याकाळचे नामांकित व्यापारी, लिंगायत समाजाचे पुढारी आणि प्रगतिशील शेतकरी आप्पासाहेब वारद यांनी मिळून ही मिल १८९८ मध्ये सुरू केली. सोलापूर रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर भैय्या चौकालगत भव्य प्रवेशद्वार असलेल्या ३३ एकर जागेत मिलच्या अनेक इमारती उभ्या आहेत. त्यातील बऱ्याच इमारती मिल बंद पडल्या पासून गेल्या वीस वर्षांत देखभाली अभावी जमीनदोस्त झाल्या आहेत. सुबक नक्षीकाम आणि युरोपीय पद्धतीच्या बांधकामाचा सुरेख मिलाफ असलेल्या ह्या इमारती म्हणजे ऐतिहासिक ठेवा आहेत. पारतंत्र्यात असतानाही औद्योगिक विकास साधून आशिया खंडात नावलौकिक मिळवून देण्याचे औद्योगिक कार्य या आणि जुनी मिलच्या इमारतींमधून झाले. १९६२ दरम्यान जुनी मिल बंद पडली. त्यानंतर तिच्या वास्तूंची निष्काळजीपणाने विल्हेवाट लागली. आज तीच अवस्था २००२ मध्ये बंद पडलेल्या नरसिंग गिरजी मिलच्या इमारती बाबत होत आहे. जुनी मिल बंद पडली तेंव्हा दहा हजार कामगार देशोधडीला लागले होते. तर नरसिंग गिरजी मिल बंद पडली तेंव्हा पाच हजारावर कामगार बेरोजगार झाले. लक्ष्मी-विष्णू मिल बंद पडल्याने हजारो कामगार बेरोजगार झाले. त्यापाठोपाठ सोलापूर सूत मिल, यशवंत सूत मिल, जामश्री सूत मिल अश्या मोठ्या मिल बंद पडत गेल्याने हजारो कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. गिरणगाव म्हणून ओळख मिळवलेले सोलापूर एक बकाल शहर बनले. नव्या तंत्रासह औद्योगिक बदलाची चाहूल नसणारे व्यवस्थापन तर आर्थिक कचाट्यात सापडलेल्या मिलला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने सोलापूरच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचे तीनतेरा वाजले.

कधीकाळी सोलापूर हे गिरणगाव म्हणून ओळखले जात होते हे सांगणाऱ्या खुणा म्हणून लक्ष्मी-विष्णू मिल, नरसिंग गिरजी मिलचे तीन धुरांडे (चिमणी) दूरवरून दिसतात. बाकी मिलची देणी फेडण्यासाठी मालमत्ता आणि भूखंडाची विल्हेवाट लावत सर्वच पाऊलखुणा नष्ट करण्याकडेच तथाकथित मध्यस्थांनी रस दाखविल्याने सोलापूरच्या औद्योगिक इतिहासाच्या खुणाच नष्ट होत आहेत. भारत पारतंत्र्यात असताना तीन दिवस स्वातंत्र्य भोगणाऱ्या सोलापूरचा जाज्वल्य रणसंग्राम जसा राजकीय अनास्थेमुळे देशाला परिचित होवू शकला नाही अगदी त्याचपद्धतीने औद्योगिक इतिहासाचे देखील शिरकाण होत आहे. भूखंड लाटण्यासाठी आसुसलेले बिल्डर, व्यवहारातून ‘मलिदा’ मिळावा या आशेपोटी दबा धरून बसलेली राजकीय मंडळी, तर मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या उद्योगांना शेवटचे आचके द्यायला भाग पाडणाऱ्या कामगार संघटना यामुळेच सोलापूरच्या औद्योगिक क्षेत्राची पार वाट लागली आहे. सर्वसामान्य लोकांना याविषयी काहीच माहिती नसते. ‘परवानगी शिवाय प्रवेश निषिद्ध’चा बोर्ड लागला की आपोआपच लोकांचा वावर थांबतो. मग नासधूस आणि लूटमार सुरू होते. अगदी दगड-मातीची देखील चोरी होते. नरसिंग गिरजी मिलच्या आवारात जागृत हनुमानाचे मंदिर आहे. त्यामुळे हनुमान जयंतीच्या निमित्ताने का होईना वर्षातून एक दिवस सर्वसामान्य लोकांसाठी मिलचे प्रवेशद्वार उघडले जाते. देखभाली अभावी इमारतींची होत असलेली दुरवस्था, वाढलेले जंगल, सरपटणाऱ्या जनावरांचा वावर हे सगळं भयावह दृश्य पाहून कुणाचेही मन हेलावल्या शिवाय राहणार नाही. खासगी मालकीच्या उद्योगांचा ऱ्हास झाला तर उद्योजकाला दोषी धरता येते. पण सरकारच्या अंगीकृत असलेल्या उद्योगाचा ऱ्हास झाला तर दोष कुणाला देणार ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)