मायक्रो फायबर टॉवेलवर छापले वृत्तपत्राचे पहिले पान…!

भारतीय वृत्तपत्रसृष्टीत सर्वाधिक खपाचे पहिल्या क्रमांकाचे तर जागतिक वृत्तपत्रसृष्टीत तिसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भास्कर’च्या दैनिक दिव्यमराठी, सोलापूर आवृत्तीने आपल्या कल्पक आविष्कारातून दि. २३ एप्रिल २०२२ च्या अंकातून अद्वितीय असा नजराणा वाचकांसमोर ठेवला आहे. दैनिक दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीच्या दहाव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून जागतिक वृत्तपत्रसृष्टीत पहिला अद्वितीय असा प्रयोग यशस्वी केला आहे. नेहमीच निःपक्षपाती बातम्या वाचकांसमोर निर्भीडपणे मांडणाऱ्या दैनिक दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीने वाचकांसाठी आणि जाहिरातदारांसाठी अभिनव असे कल्पक प्रयोग यशस्वीपणे राबविलेले आहेत. वृत्तपत्राच्या वाटचालीमध्ये दहा वर्षाचा टप्पा ही फार मोठी झेप नक्कीच नाही. याही पेक्षा मोठा पल्ला गाठलेली वृत्तपत्रे महाराष्ट्रात आहेत. पण दिव्यमराठीने थोडक्या कालावधीमध्ये नजरेत भरेल अशी कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच वाचनात येणारा नाविन्यपूर्ण मजकूर, जाहिरातींचे वेगवेगळे आविष्कार, आकार आणि प्रकारातील नाविन्यपूर्ण छपाई असो की वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असो, नवीन प्रयोग करावा तो फक्त दिव्यमराठीनेच.


सोलापूर शहराची पूर्वीची ओळख ही ‘गिरणगाव’ अशीच आहे. वस्त्रोद्योग हाच इथला परंपरागत व्यवसाय आहे. हाच धागा पकडून दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीच्या दशकपूर्तीनिमित्त आवृत्तीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर आणि युनिट हेड नौशाद शेख यांनी अतिशय आगळा-वेगळा आणि फक्त मराठी वृत्तपत्र क्षेत्रात नव्हे, देशात नव्हे तर जगातल्या वृत्तपत्रसृष्टीतील पहिला अंक वाचकांच्या हाती दिला आहे ज्याचे पहिले पान मायक्रो फायबरने बनविलेल्या टॉवेलवर छापले आहे. असा विक्रमी अंक वाचकांच्या हाती देणारे ‘दिव्यमराठी’ हे पहिले वृत्तपत्र ठरले आहे. याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे टॉवेलवरील मुद्रित पानांची ही निर्मिती संपूर्णतः सोलापुरात झाली आहे. मायक्रो फायबर धाग्यांनी विणलेले टॉवेल पूर्वी चीनमधून सोलापुरात येत होते. पण आता त्याची शंभर टक्के निर्मिती सोलापुरातच होते. त्यामुळे अस्सल सोलापुरी नजराणा म्हंटले तर वावगे ठरणार नाही. वाचकांशी आणि दिव्यमराठीवर विश्वास दाखविणाऱ्या जाहिरातदारांची बांधिलकी मानणाऱ्या दैनिक दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीने आपल्या नाविन्यपूर्ण आविष्काराने जागतिक पातळीवर नवे रेकॉर्ड तयार केले आहे. आजवर खपाचे विक्रमी आकडेवारी मांडून व्यवसायात अग्रक्रमाने राहण्याची स्पर्धा करणाऱ्या वृत्तपत्र क्षेत्रात आता नाविन्यपूर्ण, कल्पक अविष्कारावर वाचकांच्या हृदयात स्थान मिळविणाऱ्या दैनिक दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीच्या दशकपूर्तीच्या या विशेषांकाचे वाचकांमधून स्वागत होत आहे. यानिमित्ताने मराठी वृत्तपत्रसृष्टी नुसतीच अत्याधुनिक होत नाही तर नावीन्य आणि कल्पक आविष्काराने जागतिक पातळीवर आपले वेगळेपण दाखवीत असल्याचेच सिद्ध होत आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा