
भारतात अगदी बोटावर मोजण्याइतके गर्भश्रीमंत, अब्जोपती आहेत, ज्यांचा समाजमनावर आणि राजकारणावर ‘पगडा’ आहे. त्यातही काही अब्जोपती देशात मोठे घोटाळे करून देशाचे आर्थिक नुकसान करत देशातून पळून देखील गेले आहेत. तरीदेखील भारतीय उद्योग-व्यापारावर पगडा असणाऱ्या काही उद्योजक घराण्याचा भारतीय राजकारणावर प्रभाव आहे. त्यामुळे सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या भारतीय राजकारणात मात्र सत्तेत असणारे राजकीय नेते आणि पक्ष या बड्या उद्योजक घराण्यांशी जवळीकता ठेवतात. तर सत्तेतील विरोधीपक्ष हा नेहमी कोणत्याही विषयावर या बड्या उद्योजकांच्या नावाने लाखोली वहायला सज्ज असतो. एकूण नेहमीच चर्चेत असणाऱ्या या बड्या घराण्यातील व्यक्तींबद्दल भारतीयांच्या मनात कमालीचे आकर्षण बघायला मिळते. भल्या-बुऱ्या अगदी सवंग दर्जाच्या आरोप-प्रत्यारोपांमधून देखील देशात दररोज कुठे न कुठे त्यांच्याच नावाचा जप होत असल्याचे दिसते. टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी नवीन काय करत आहेत ? याची खबरबात ठेवणे हा आता ‘जनरल नॉलेज’चा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अदानी ग्रुप भारतीय माध्यम जगतात प्रवेश करत असल्याची कुणकुण अगदी शेअर मार्केटमध्ये देखील ‘उछलकुद’ करणारी ठरली. ज्याकाही आर्थिक घडामोडी घडतात त्याला अंबानी आणि अदानीच कारणीभूत असतात असा ‘समज’ बाळगणाऱ्या देशात अदानी ग्रुप ‘मीडिया’मध्ये प्रवेश करतोय म्हटल्यानंतर साधक-बाधक चर्चा ही अपेक्षितच आहे. मात्र विद्वान पत्रपंडितांकडून सध्या अशी चर्चा होताना दिसत नाहीय. कदाचित अदानी ग्रुपच्या कार्पोरेट कल्चरमध्ये आपल्याला देखील संधी मिळावी ह्या उद्देशाने हे तथाकथित पत्रपंडित ‘आभाळ कोसळल्याचा’ आकांत करत नसावेत. अन्यथा माध्यम ‘स्वातंत्र्यावर गदा’ आली म्हणून एकच गहजब एव्हाना व्हायला हवा होता.

गौतम अदानी सारखा नवकोट नारायण भारतीय माध्यम जगतात आपले स्थान निर्माण करू पहात आहे ही घटना माध्यम जगतासाठी निश्चितच मोठी आहे. सध्या भारतात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया बरोबरच जाहिरात क्षेत्रात एखाद्या बड्या गुंतवणूकदार कंपनीची खरी गरज आहे. स्वातंत्र्याचा मूलमंत्र देत समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या भारतीय वृत्तपत्रसृष्टीकडे ‘खानदानी बहू’ म्हणून बघणाऱ्या भारतीय जनमानसाला ती सध्याच्या बाजारू स्पर्धेतही ‘सतीसावित्री’च्या रुपात असावी असेच वाटते. तर तळागाळापर्यंत पोहोचलेल्या माध्यमापासून प्रसिद्धीच्या झोतातून करोडोंचे उत्पन्न मिळवू पाहणाऱ्या बाजाराला माध्यम मात्र ‘खानदानी’ असावे असेच वाटते. या संघर्षात तुटपुंज्या मिळकतीवर गुजराण करणारे, खुरटी दाढी वाढवून गळ्यात शबनम अडकवून फिरणारे माध्यम प्रतिनिधी भारतीय समाजाला पहायची सवय झाली आहे. त्यांचा आर्थिकस्तर उंचावला तर त्यांचे ‘चारित्र्यहनन’ झाले असे मानणारे घटक या समाजात आहेत. तर इतर क्षेत्रातील कार्पोरेट कल्चरप्रमाणे आपल्याही क्षेत्रात आर्थिकस्तर उंचावणारे कल्चर यावे असं मनापासून वाटणारा वर्ग माध्यम क्षेत्रात आहे. त्यांच्या दृष्टीने बड्या उद्योगपतींच्या माध्यम प्रवेशाने कार्पोरेट कल्चरमुळे माध्यमात काम करणाऱ्यांचे जीवनमान उंचावेल हे स्वप्न साकारणारी घटना म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. आता गौतम अदानी माध्यम सम्राट बनायला येतात की त्यांच्या येण्याने भारतीय माध्यमात आमूलाग्र बदल होतात हे येणारा काळच सांगेल. तोपर्यंत आपण अटकळ लावत बसायचं. अदानी मीडिया ग्रुप हा प्रकाशन, जाहिरात, प्रक्षेपण, वितरण यासर्वच क्षेत्रात आगामी काळात मुशाफिरी करणार असल्याने सध्या या क्षेत्रात आपली फौजदारकी मिरवणाऱ्या प्रादेशिक स्तरावरच्या अनेक माध्यम समूहांचे धाबे दणाणले असणार. मुळात अदानी ग्रुप नवे टायटल लॉन्च करणार की जुनेच टायटल टेक ओव्हर करणार ? हा प्रश्न अजून गुलदस्त्यात आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले देशव्यापी वृत्तपत्र आणि चॅनल टेक ओव्हर करीत अदानी मीडिया ग्रुप आपले हातपाय पसरायला सुरुवात करेल असा या क्षेत्रातील जाणकारांचा कयास आहे. सर्वाधिक वृत्तपत्रांची संख्या असणारा भारत हा जगात सर्वात वरच्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले वृत्तपत्र टेक ओव्हर करायला अदानी ग्रुपला फारसे अवघड नाही, एव्हाना त्यांनी ते केलेही असेल. तशीच अवस्था चॅनलची आहे. देशात एकूण ८०० चॅनल्स आहेत. त्यापैकी २०० ही निव्वळ न्यूज चॅनल्स आहेत. पण अदानी सारखा अब्जोपती जर माध्यमक्षेत्रात आपले पाय रोवत असेल तर त्याने वेगळा विचार करायला हरकत नाही.

धनाढ्य व्यक्ती अथवा उद्योगपतींच्या हातात माध्यम सापडले तर त्याचा उपयोग व्यापारीतत्वावर अधिक प्रमाणात होणार हे उघडच आहे. राजकीय विचारांचे मांडलिकत्व स्वीकारलेली माध्यमे त्यांचे ‘भाट’ बनतात अगदी तसेच हे आहे. त्यातल्या त्यात राजकीय विचारांचे भाट बनण्यापेक्षा व्यापारीतत्व अंगिकारत गलेलठ्ठ आकाराचे पॅकेज काखेत मारून आपली पत्रकारितेची आणि जमलीच तर समाजसेवेची खाज भागवून घेतलेली बरी असा समंजस विचार करणारे बोरुबहाद्दर आणि माध्यम प्रतिनिधी अनेक आहेत. ते आत्तापासूनच अदानी यांच्या बंगल्याच्या आसपास घुटमळत असतील. आता अदानी यांनी नेमकं काय ठरवलंय, यावरच सगळं काही अवलंबून असणार आहे. मुळात देशी माध्यमात असलेले धनाढ्य समूह पुरेसे नव्हते का ? मग ‘शेम्बडात पाय’ रोवण्याचा प्रयत्न गौतम अदानी कश्यासाठी करत असावेत ? हे समजून घ्यावे लागेल. आपल्या उद्योगांच्या जाहिरातीपोटी खूप मोठा निधी हा माध्यमांच्या घशात चाललाय तर आपणच माध्यमात का प्रवेश करू नये…असा ‘पोरकट’ विचार तर नक्कीच या पाठीमागे नाही. तर गौतम अदानी सारखा व्यापारी माणूस फक्त देशी माध्यमसमूहाचा विचार नक्कीच करणार नाही. एव्हढ्या संख्येची वृत्तपत्रे आणि चॅनल्स असतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची एकही माध्यमसंस्था कार्यरत नाही. ही उणीव भरून काढायचा प्रयत्न अदानी मीडिया ग्रुपकडून केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. सीएनएन, बीबीसी, अलजझिरा, टेलेसुर, सीसीटीव्ही या आंतरराष्ट्रीय वाहिन्यांप्रमाणे भारताची देखील स्वतंत्र आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असावी. आजही अनेक देशांमध्ये भारतीय वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी फिरकले देखील नाहीत. जगातल्या अनेक देशांना भारतीय बाजारपेठ खुणावत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंगमध्ये भारत खूप मागे पडत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी एक जाहिरात संस्था, एक वृत्तवाहिनी, माहिती आणि मनोरंजनाचे दालन जगासाठी खुले करणारी वितरण संस्था असावी याविचारातून जर अदानी ग्रुप माध्यम क्षेत्रात आपले पाय रोवणार असेल तर देशी माध्यम समूहांना देखील बळकट स्पर्धक मिळेल याबरोबरच माध्यमातील स्पर्धात्मक दारिद्र्य संपून गुणात्मक दर्जा वाढीस लागेल. माध्यमात काम करणाऱ्या वर्गाचा आर्थिकस्तर निश्चित उंचावेल त्याबरोबरच सर्वसामान्य भारतीय जगाच्या अधिक जवळ येईल. अर्थात माध्यमात व्यावसायिकता हवी असे मानणाऱ्या वर्गासाठी ह्या सकारात्मक बाबी असतील.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा