
मासे खायचे म्हंटलं तर समुद्र किनारपट्टी लाभलेला कोकण नजरेसमोर येतो. त्यातही मालवणी मच्छी म्हंटलं तर नुकताच पोटभर जेवलेला देखील पुन्हा ताटावर बसेल. जिथं पाण्याचा मोठा साठा तिथं मच्छीची बक्कळ पैदास…कोकण सोडून चांगल्या चवीची मच्छी कुठं मिळणार ? पण यालाही आता घाटीप्रदेशात उत्तर मिळालय…. ‘येरमाळा मच्छी’ हेच त्याचं उत्तर. जिथे पाण्याचा साठा नाही, जिथे जलाशय नाही, धरण नाही. सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या, पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाऱ्या मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा गावाची नवी ओळख निर्माण करणारी ‘येरमाळा मच्छी’. येडेश्वरीचे मंदिर आणि येरमाळा मच्छीची हॉटेल्स हीच येरमाळ्याची खास ओळख. या येरमाळा मच्छीच्या जीवावर फक्त येरमाळा गावाचे किंवा उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्थकारण चालत नाही, तर आता ब्रॅण्ड नेम बनलेल्या येरमाळा मच्छीने घाटावरचा संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. येरमाळ्यात हॉटेल मधून मच्छीचे विविध पदार्थ खवैय्यांना खिलवत ‘येरमाळा मच्छी’ या ब्रॅण्डला जन्माला घातले ते अब्बास मौला शेख (बाबूभाई) आणि त्यांचे बंधू गुलाब मौला शेख यांनी.

अब्बास मौला शेख उर्फ बाबूभाई यांचे पुत्र इम्रान अब्बास शेख यांनी सांगितलेल्या कहाणी प्रमाणे त्यांचे आजोबा म्हणजे बाबूभाई यांचे वडील मौला शेख हे मूळचे उपळाई या गावचे रहिवाशी. त्यांचा पशुधन (जनावरे) विक्रीचा व्यवसाय होता. सत्तरच्या दशकात मौला शेख यांना त्यांच्या व्यवसायात फार मोठे नुकसान झाले. डोक्यावर कर्जाचा बोजा चढला. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी स्वतःची पाच एकर जमीन विकली. त्यावेळी अब्बास उर्फ बाबूभाई यांनी चौथीत असतानाच शिक्षण सोडले. उपजीविकेसाठी हे कुटुंब उपळाईहून येरमाळ्याला स्थलांतरीत झाले.बाल वयापासूनच बाबूभाई यांनी पडेल ते काम स्वीकारत हॉटेलमध्ये काम सुरू केले. पुढे वडा-पावचा गाडा सुरू केला. काही दिवसानंतर येरमाळा येथील आर.एम.बारकुल (बप्पा) हा भला माणूस भेटला. बप्पा यांच्या भाड्याच्या जागेतच बाबूभाई यांनी पुरीभाजी नाश्त्याचे कॅन्टीन सुरू केले. तिथेच त्यांनी दालफ्राय, चपाती, भाजी अशी शाकाहारी भोजन व्यवस्थाही सुरू केली. कॅन्टीन उत्तमरीत्या सुरू होते. याच काळात बाबूभाई यांचे मेहुणे (बहिणीचे पती) बशीर शेख यांना शिराळा येथून बोलावून स्वतःकडे मदतीला घेतले. बशीर शेख हे दर आठवड्याला गावी शिराळा येथे जायचे व येताना शिराळा येथील तलावातील मच्छी घेवून यायचे. त्याकाळी म्हणजेच १९७७ च्या सुमारास येरमाळा परिसरातील सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू होती. एकदा बशीर शेख हे शिराळ्याहून आणलेल्या वाम्ब (मासा)चे खवले रस्त्यावरच काढत असताना रस्त्याच्या खडीकरण- डांबरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पाहिले. त्याने बाबूभाई यांना मच्छीचे कालवण करून मागितले. बाबूभाई यांनी तयार करून दिलेली मच्छी त्या ठेकेदाराला एव्हढी आवडली की त्याने अधिकारी वर्गाला देखील पार्टी म्हणून बाबूभाई यांनी तयार करून दिलेली मच्छी खाऊ घातली. बाबूभाई यांच्या हातून तयार झालेली मच्छी खाणारे खवैय्ये त्याला ‘येरमाळा मच्छी’ म्हणू लागले. १९८० च्या सुमारास बाबूभाई यांनी आपले बंधू गुलाब मौला शेख यांना सोबत घेत स्पेशल मच्छी डिश चे हॉटेल जरिया सुरू केले. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच आंध्र-कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या हमरस्त्यावर येरमाळा हे गाव येते. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या संख्येने नेहमीच वर्दळ असते. हे लक्षात घेऊन हमरस्त्यावर सुरू झालेल्या हॉटेल जरियाच्या मच्छी डिशने खवैय्यांची पसंती मिळविली. मग हळूहळू मच्छी डिश बनविणाऱ्या हॉटेल्सची संख्या वाढतच गेली.




अत्यंत चिकाटी, परिश्रम आणि ग्राहकांशी आपल्या मधुरवाणी आणि व्यवहाराने जोडलेले नाते टिकवीत बाबूभाई आणि गुलाबभाई यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. आता त्यांची मुले हा व्यवसाय सांभाळत आहेत. गेल्या चाळीस वर्षात पर्यटकांनी आपल्या प्रवासात जेवण आणि विश्रांतीचा टप्पा म्हणून येरमाळा स्टॉप जसा फेमस केला. तसा बाबूभाई यांच्या ‘येरमाळा मच्छी’ला ब्रॅण्ड बनवले. आपल्या कर्मभूमीच्या नावाला प्रसिद्धी मिळणाऱ्या या ब्रॅण्ड नेमवर बाबूभाई यांनी गेल्या चाळीस वर्षात कधीच हक्क सांगितला नाही की कुठल्या रजिस्ट्रेशनची उठाठेव देखील केली नाही. आजमितीस हमरस्त्यावरील ढाबा असो की हॉटेल ‘येरमाळा मच्छी’ असा फलक झळकताना दिसतो. उस्मानाबाद शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या येरमाळा गावाचे नाव येडेश्वरी देवस्थान आणि येरमाळा मच्छीमुळे पर्यटनाच्या नकाशावर आले आहे एव्हढे मात्र खरे !

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
:- 8806188375
Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.