
आमच्या लहानपणी कॉलनीतील मुलं-मुली उन्हाळ्याच्या सुट्टीत झिम्मा-फुगडी, चोर-पोलीस, काच-कवड्या, पाच-तीन-दोन, बदाम सात, लॅडिस, डब्बा गुल, धप्पाकुट्टी असले खेळ खेळायचो. आमच्या मामाच्या गावाला रेल्वे जात नव्हती. तरी पण ‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी’ हे गाणं जसं आम्हाला प्रिय होते. तेव्हढंच ‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो’ हे झिम्मा गाणे पण प्रिय होते. त्या गाण्यासाठी मुलींच्या घोळक्यात ‘लांबोडा’ होवून खेळायला आवडायचे. कारण या गाण्यातला कोकणचा राजा म्हणजे ‘हापूस आंबा’ याचं विलक्षण आकर्षण होतं. तसं ते प्रत्येकाला असतंच. हापूस आंब्याचं आकर्षण नाही असा मराठी माणूस सापडणे केवळ अशक्यच. बहुदा यामुळेच मिळेल त्या आंब्याला ‘हापूस’ समजून खाण्याचा रिवाज रूढ झाला असावा. आता वाढत्या महागाईत बाजारात मिळणाऱ्या गावठी आंब्यापासून वेगवेगळ्या जातीच्या आंब्याचे दर पाहून खिश्याचा सल्ला घेत घरातील मोठी मंडळी जो आंबा आणतील तो ‘हापूस’ समजून फडशा पाडणारे आम्ही आता मोठे झाल्यावर बाजारात ‘हापूस’ म्हणून विकल्या जाणाऱ्या कोणत्याही आंब्याचा स्वीकार करतो. असली हापूस आणि नकली हापूस हा बाजारातला वाद हा आंबा विक्रेत्यांचा व्यावसायिक विषय होवू शकतो. पण सर्वसामान्य ग्राहकाचा ‘परवडणाऱ्या दरातील हापूस’ हा एव्हढाच विषय असतो.


पूर्वी कोकणातला आंबा म्हंटलं की ‘हापूस’ असं साधं समीकरण होतं. पुढं मग रत्नांगिरीचा हापूस, अलिबागचा हापूस, देवगडचा हापूस असे प्रकार बाजारात आले. आंब्याच्या आकारातील न जाणवणारा बदल आणि चवीतील सूक्ष्म बदल एव्हढी वैशिष्ट्ये सोडली. तर आंबा तो आंबाच अन हापूस तो हापुसचं. आता तर गुजरात अन कर्नाटकचा आंबा सुद्धा ‘हापूस’ म्हणून बाजारात हातोहात खपविला जातो. आंबा गोड लागला, रसदार असला की झालं. ग्राहक वर्षानुवर्षे ‘हापूस’ खाल्याच्या समजा मधून बाहेर येत नसतो. हापुसचं गारुडच असं काही बसतंय प्रत्येकाच्या मेंदूत. सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने खायचे आंबे आणि रसाचे आंबे हे जसे दोन प्रकार आहेत. तसेच रसाच्या आंब्यात देखील दोन प्रकार असतात. खिशाला परवडणारे रसाचे आंबे आणि महाग रसाचे आंबे हेच ते दोन प्रकार आहेत. त्यामुळे स्वस्तात देवगड हापूस म्हणून कर्नाटकी आंबा जरी विक्रेत्याने गळ्यात मारला तरी वाटीभर जास्त साखर टाकून ‘आम्ही आज हापूस खाल्ला’ असं शेजारपाजारी सांगायला आम्ही मोकळे होतो.

ओरिजिनल हापूस आंबा ओळखण्याच्या नादात आंबे विक्रेत्याशी हुज्जत घालणे, आंबा पेटीच्या आतमधील वर्तमानपत्राचे वेष्टन तपासणे, पिकलेल्या आंब्याचा रंग, त्याचा आकार उगीचच तज्ज्ञ असल्यासारखे तपासणे हे सगळे उद्योग आपण कश्यासाठी करतो ? तर ओरिजिनल हापूस खायला मिळावा म्हणून नाही. तर आपण फसविले जावू नये यासाठीच. आंब्याच्या गोडीपेक्षाही फसवल्या गेल्याची ‘सल’ जास्त कडवट असते म्हणून. अक्षयतृतीये पासून आंब्याचा सिझन सुरू होतो. पण सर्वसामान्य माणसांचा परवडणाऱ्या दरात आंबा बाजारात मिळायला लागतो तेंव्हापासून खरा सिझन सुरू होतो. म्हणजे साधारणतः एक अवकाळी पाऊस येवून गेला की पिकलेले आंबे खराब होण्याची शक्यता निर्माण होते. तेंव्हा मग विक्रेता देखील आंब्याचे विक्रीचे भाव उतरवतो. मग चढ्या भावाने विकला जाणारा हापूस देखील सर्वसामान्यांच्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतो. म्हणजेच साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्या पर्यंतचा कालावधी हा सर्वसामान्यांचा आंबे खाण्याचा ‘मोसम’ म्हंटला पाहिजे. बाकी गर्भश्रीमंतांना बारा महिने प्रिझर्व्ह केलेले आंबे मॉल मध्ये मिळू शकतात. काहीही असले तरी आंबा खाणे हा मराठी माणसाचा परंपरागत रिवाज आहे, हे मात्र तितकेच खरे आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे आंबा मनसोक्त खाता न आल्याने यंदाचा सिझन मात्र चुकवायचा नाही. हापूस खायचा म्हणजे खायचाच…!!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to Vallabh Sanjekar उत्तर रद्द करा.