
मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेंव्हाच कोणत्या विषयावर लिहायचं नाही, हे पहिल्यांदाच ठरवून टाकले होते. त्यात पाकिस्तान आणि इस्लामीकरण हा विषय अगदी पहिल्या क्रमांकावर होता व आहे. पण शांतता आणि समाधानाने जगण्याच्या व्याख्येत जसं तुमच्या कुटुंबासोबतच तुमचा ‘शेजारी’ महत्वाचा असतो. अगदी तसंच. तुम्ही जसं तुमच्या शेजाऱ्याला वगळून शांतपणे आणि सुख-समाधानाने जगू शकत नाहीत अगदी त्याच नियमाने पाकिस्तानला वगळून भारत देश शांततेने आणि सुख-समाधानाने राहू शकत नाही. हीच वस्तुस्थिती आहे. गेल्या ७५ वर्षांपासून भारतीय तोच तर प्रयत्न करीत आहेत. आमच्या मनातल्या जगाच्या नकाशावरून भलेही आम्ही पाकिस्तान नावाच्या देशाला वगळून स्वातंत्र्यानंतर प्रगतीच्या दिशेने वेगाने निघालेलो असलो तरी आम्ही भारतीय समाधानाने जगू शकत नाहीत. कारण दुर्दैवाने आमचा ‘लचका’ तोडून बनलेला पाकिस्तान नावाचा देश आमचा शेजारी आहे. केवळ ‘इस्लाम’धर्माच्या नावाखाली दंगली, कत्तली आणि जाळपोळीचा आधार घेत आमच्याच भूभागाचा लचका तोडून निर्माण झालेला पाकिस्तान आज स्वतः कर्जबाजारी तर झालाच आहे याबरोबरच धर्मवेडाच्या नादात दहशतवादी देखील झाला आहे. हे सगळ्या जगाने मान्य केले आहे. जागतिक बँकेचे कर्ज हा काही एकट्या पाकिस्तानच्या कडेलोटाचा विषय नाही. जगातील सत्तरहून अधिक देश असे आहेत ज्यांची अर्थव्यवस्था जागतिक बँकेच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. त्यात प्रगतशील देश देखील आहेत. महासत्ता म्हणविणाऱ्या अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, इटली, जपानसह प्रगतीपथावर असलेल्या भारताचा देखील या यादीत समावेश आहे. पण मग या कर्जदार देशांना सोडून फक्त पाकिस्तानलाच ‘भिकारी’ देश का म्हणायचं ? तुम्ही भारतीय आहात म्हणून हाडवैरी बनलेल्या पाकिस्तानला ‘भिकारी’ देश म्हणत असाल हे एकवेळ समजून येते. पण सगळे जगच म्हणजे जगातले अस्तित्वात असलेले २५२ (पाकिस्तान वगळून) देश जर पाकिस्तानला ‘भिकारी’ समजत असतील तर शेजारचा भिकारी देश म्हणून भारताला हा नक्कीच तापदायक विषय आहे. एकतर भारताने गेल्या ७५ वर्षात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे खूपकाही सोसलं आहे. कधीही भरून न येणाऱ्या जखमा झेलल्या आहेत. पण आता महासत्ता बनण्याच्या वाटेवर असताना भारताला आपलेच अंग तोडून वेगळे झालेल्या पाकिस्तानचे सध्याचे ‘भिकारी’ असणे बाधक ठरणारे असेच आहे.

परवा माझ्या व्हॉट्सअप वर ‘रिलेटिव्ह ग्रुप’वरून एक फॉर्व्हडेड व्हायरल पोस्ट वाचायला मिळाली. कर्जबाजारी होवून आर्थिक संकटात सापडलेल्या, आपला शेजारी असलेल्या ‘श्रीलंका’ देशाचे सेंट्रल बँकेचे गव्हर्नर पी. नंदलाल विरसिंघे यांची मुक्त भाषांतरित केलेली पोस्ट असावी ती. श्रीलंकेच्या कर्जबाजारी होण्यामागची कारणे स्पष्ट करताना विरसिंघे म्हणतात की, आमच्याकडे असलेले डॉलर्स का संपले ? आमच्यावर रुपया आणि डॉलर्सचे प्रचंड कर्ज का आहे ? आम्ही सतत कर्ज का घेतोय ? एक कर्ज फेडल्यानंतरही आम्ही कर्ज देणाऱ्यांच्या दारात पुन्हा-पुन्हा का जात आहोत ? आणखी कर्जाची ‘भीक’ का मागत आहोत ? कारण आम्ही ग्राहकांचे राष्ट्र आहोत, उत्पादकांचे राष्ट्र नाही. आम्ही जे काही उत्पादित करत आहोत त्यापेक्षा जास्त वापरत आहोत. साहजिकच तुम्ही कमावण्यापेक्षा जास्त खर्च करीत असाल तर तो खर्च भागविण्यासाठी तुम्ही कर्ज काढता ? एका कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तुम्ही दुसरे कर्ज घेता. श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीत निघण्याचे हे कारण फारसे वेगळे नाही. जगातील बहुतेक जे देश दिवाळखोरीत निघालेत किंवा उंबरठ्यावर आहेत त्यांच्या व्यवस्थेतील अनेक कारणांपैकी हे एक प्रमुख कारण आहे. आता श्रीलंकेच्या आर्थिक दिवाळखोरीचे हे प्रमुख कारण पाकिस्तानला देखील लागू आहे. मुळात भूभाग आणि त्यावर अनिर्बंध वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या धर्मांध झुंडी मिळून देश बनत नसतो. जर उत्पादकशून्य मानसिकता आणि धर्मांधता पोसणारी यंत्रणा समूहांचे नेतृत्व करणारी असेल तर अश्या देश म्हणविणाऱ्या भूभागाला भविष्य नसते. ज्या समाजाला आपली सभ्यता, संस्कृती आणि इतिहासाचे सत्य ज्ञान अवगत नसते त्या समाजाचा देशाभिमान हा निव्वळ वर्चस्ववादी अहंकार असतो. पाकिस्तानच्या बाबतीत हेच आहे. त्यामुळेच हा देश आणि त्या देशातील जनता उत्पादक बनू शकत नाहीत. पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तिथं जन्म घेतलेल्या पिढ्यांना धार्मिक अहंकाराव्यतिरिक्त काय शिकविल्या जाते ? सभ्यता, संस्कृतीच्या नावावर धार्मिक अहंकार आणि मोडतोड केलेला धर्माभिमानी इतिहास शिकून मोठी झालेली पाकिस्तानची पिढी फक्त दहशतवादाचे उत्पादन घेवू शकते. हाच दहशतवाद विकण्यासाठी ते नवनव्या दहशतवादी संघटना जन्माला घालतात अन त्यावर अब्जावधी रुपये खर्ची घालतात. स्वतःचा देश चालविण्यासाठी कर्जे घ्यायची, कर्जाचा हप्ता चुकविण्यासाठी पुन्हा नवी कर्जे घ्यायची यातूनच पाकिस्तान ‘भिकारी’ देश बनला आहे. दरवर्षी नवे कर्ज मागणे त्यासाठी नवा देश हुडकणे हेच पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण आहे. त्यामुळेच जगात पाकिस्तानला ‘भिकारी’ देश म्हणून नवी ओळख मिळालेली आहे.

देशाचा आकारमान जसा तशी त्या देशातील सत्ताधीशांची वृत्ती असते असं म्हणतात. पाकिस्तानच्या नकाशाकडे एक नजर टाकली तर दारात आशाळभूतपणे भाकरीच्या तुकड्याची वाट पहात बसलेल्या लुब्र्या कुत्र्यासारखा आकार वाटतो. यातला गंमतीचा भाग सोडला तर पाकिस्तानचे आजवरचे राज्यकर्ते हे ‘भाकरी’च्या तुकड्यासाठीच दुसऱ्या देशांच्या सत्ताधीशांपूढे ‘लाळ’ गाळत उभे असतात, याचेच दाखले मिळतात. कर्जासाठी ते काहीही करायला तयार असतात. हाच भारतासाठी प्रमुख धोका आहे. आजवर पाकिस्तानला अमेरिकेसहीत ज्या देशांनी कर्जे दिलीत त्यांच्याशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने भारताला दहशतवादी कारवाया व्यतिरिक्त दुसरा कुठला धोका नव्हता. पण कर्जे घेवून चीनच्या जाळ्यात पुरता फसलेला पाकिस्तान आता इथून पुढे भारताची डोकेदुखी ठरणार आहे. विस्तारवादी चीन हळूहळू पाकिस्तानच्या भूमीवर आपले पाय घट्ट रोवून भारताची तीनही बाजूंनी कोंडी करण्याचे मनसुबे आखत आहे. श्रीलंकेला कर्जाच्या जाळ्यात अडकवून चीनने आपला इरादा या अगोदरच स्पष्ट केला आहे. म्हणूनच ‘भिकारी’ पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची तयारी आता भारताने केली पाहिजे. जर ‘नाटो’चा धोका नको म्हणून रशिया युक्रेनवर हल्ला करून जरब बसविण्याचा प्रयत्न करत असेल तर भारताने स्वतःच्या हितरक्षणासाठी हे पाऊल उचलणे गैर ठरणार नाही. भारताशी वैरभाव ठेवणे हेच जर पाकिस्तानी सत्तेचे तत्व असेल तर मानवाधिकार आणि शेजारधर्म म्हणून भारताने कोणतीही मदत पुरविण्यापेक्षा कायमचा बंदोबस्त करणेच योग्य ठरणार आहे. भारतविरोधी कारवायांसाठी दहशतवाद पोसणारी सत्ता उलथवून तिथे मैत्रीपूर्ण संबंध जपणारी व्यवस्था उभी करण्यासाठी भारताने लष्करी कारवाई केली तरी अनेक देश भारताचे समर्थन करतील.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to smitahingne उत्तर रद्द करा.