
रायगडाच्या पायऱ्या चढून चांगली पाच वर्षे पूर्ण झालीत. वयाच्या आठव्या वर्षी शाळेच्या सहलीतून रायगड चढून गेल्यावर आता बावन्नव्या वर्षी पुन्हा तोच विक्रम केला म्हणून मित्रांनी कौतुक देखील केलं होतं. या पाच वर्षात नुसतंच घोकल्या गेलं पण रायगडाची माती काही मस्तकी लावण्याचा योग जुळून आला नाही. आजही (वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी) मी रोज न थकता वीस ते बावीस किलोमीटरची पायपीट करू शकतो याचं माझ्या मित्रमंडळींना कौतुक आणि आश्चर्य देखील वाटतं. वाढत्या वयानुसार वाढणारे वजन आणि पोटाचा घेर वाढत असताना हा माणूस गड चढू कसं काय शकतो ? पण महाराजांच्या भेटीच्या ओढीने हे दिव्य पार पडत असावे यावर माझी श्रद्धा आहे. अलीकडे खूप वर्षे झालीत असं अवखळ वागणं घडलंच नाही. कदाचित त्यामुळं नॉस्टॅल्जिक होत असावं. जसं इयत्ता चौथीत असताना पहिल्यांदा रायगड चढल्याची आठवण आहे. अगदी तशीच आठवीत असताना बालाघाटाच्या डोंगरातून चांगली दहा-बारा किलोमीटर पायपीट करत मुगाव (ता.-पाटोदा, जि.-बीड) यागावी मावशीला भेटायला गेल्याची आठवण मनावर कायमची कोरली गेली आहे. तेंव्हा भटकंती, ट्रेकिंग असले काही प्रकार असतात हे कळायचं देखील वय नव्हतं. आम्हा सख्खे, मावस आणि मामे भावंडात सर्वात मोठा असणारा दासाभाऊ (देविदास कुलकर्णी) हा मावसभाऊ बालपणी मला फार प्रिय होता. कारण तो शिक्षक होता आणि त्याला भाऊ या नात्याने ‘अरे-तुरे’ करता यायचे. एका शिक्षकाला ‘अरे-तुरे’ करून बोलता येतं हे पण अप्रुपच असायचं.

मुगाव हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चारशे-पाचशे घरांचं गाव. साधारणतः १९७९-८० चा काळ डोळ्यासमोर जश्याचा तसा लख्खपणे आजही येतो. दासाभाऊकडे आग्रह धरला म्हणून मला गावी घेऊन जायला तो तयार झाला होता. मधुकरराव हिंगण्यांची (आस्मादिकांचे वडील) परवानगी काढण्यासाठी मातोश्रींचे क्रेडिट कार्ड मी अगोदरच वापरले होते. चंदा मावशीला (चंद्रकला मावशी) भेटायला जायचं. जाताना वाटेत मोठमोठे डोंगर लागतात. पुस्तकातील डोंगर प्रत्यक्षात तुडवायला मिळणार ह्याचं जास्त आकर्षण आणि मावशीच्या भेटीची ओढ बहुतेक मला त्यावेळी दासाभाऊ बरोबर जायला उद्युक्त करत असावी…नक्की सांगता येत नाही, पण असंच काहीसं असणार ! माझ्यातील ‘भटकंती’चा अवगुण बहुदा अश्याच काही घटनांमुळे आतल्या आत ‘डेव्हलप’ होत गेला असावा. तेंव्हा मुगावला पक्का रस्ता नव्हता. एसटी जात नव्हती. चांगलं पंधरा किलोमीटर अंतर बालाघाटाचे दोन-तीन डोंगर चढ-उतार करून पायवाटेने मुगावला पोहोचावे लागायचे. दासाभाऊंच्या पायाखालची वाट असल्याने वाट चुकण्याची भीती नव्हतीच. शिवाय तो शिक्षक असल्याने वाटेत डोंगरावरील झाडांची, पशुपक्षांची, फळांची खडा न खडा माहिती मिळत होती. बहुदा ‘भटकंती’ कशी करावी ? याचं ट्रेनिंगच कळत नकळतपणे मला त्यावेळी मिळालं. पुढे पत्रकारितेत मला याचा सफाईदारपणे वापर करता आला. बालाघाटाच्या भूगर्भातील खनिजे यावर मी वृत्तपत्रातून जे लेखन केले होते कदाचित त्याची बीजे या दासाभाऊंच्या सोबत केलेल्या भटकंतीतूनच रुजली असावीत. बेचाळीस-त्रेचाळीस वर्षांपूर्वीची मुगावच्या चंदा मावशीच्या भेटीसाठीचा प्रवास माझ्या लक्षात एव्हढा ठळकपणे का रहावा ? तसा सग्या-सोयऱ्यांमध्ये रमणारा मी नक्कीच नाही. गेल्या चाळीस वर्षात पुन्हा दासाभाऊंची अन माझी भेट देखील झालेली नाही. आता आईच्या बहिणींपैकी एकच नलू मावशी आहे. तिची पण भेट नाही. नातेवाईकांची खबरबात ठेवण्याचा स्वभाव नसल्याने कदाचित हे असं काहीतरी होऊन बसलं असावं. पण बहीण-भावंडं सगळ्यांच्या संपर्कात असल्याने कधीतरी कळतं. परवा आईचं माहेर अनाळा (ता.परांडा, जि.- उस्मानाबाद) तिथंही उगीचच भेट द्यायची उर्मी उसळली होती. रिपोर्टिंगच्या कामानिमित्त सोनारीपर्यंत जावून आलो. आता मामालोकं अनाळ्यात रहात नसल्याने पुढे गेलोच नाही. पण आई गेल्यानंतर तिचा गोतावळा बघायची इच्छा मात्र पार ‘नॉस्टॅल्जिक’ करीत राहिली. असो. फारच पर्सनल होतंय.

तर सांगायचा मुद्दा म्हणजे ‘भटकंती’ हा नुसता प्रवास नसतो. तर तो तुम्हाला जन्मतः चिकटलेला तुमचा स्वभावगुण असतो. मी तर म्हणतो प्रत्येक माणूस भटक्याच असतो. त्याच्या भटकंती मधूनच तो घडत असतो. कस्तुरीमृगाच्या नाभीतच ‘सुगंध’ असतो. तो आयुष्यभर उगीचच इकडं-तिकडं सैरावैरा भटकत असतो. माझ्या पत्रकारितेतील गुरूने मला सांगितलं होतं….मुकुंद तुझ्या बोटात ‘मॅग्नेटिक पॉवर’ आहे. ही बोटेच तुझी ओळख निर्माण करतील. मला हे ओळखायला निम्मं आयुष्य खर्ची घालावं लागलं. आता मात्र मी मान्य केलंय, तुम्हाला तुमच्या आयुष्यात ‘भटकंती’च घडवत असते. सोबत तुमची ‘मॅग्नेटिक पॉवर’ असतेच. चोच दिलीय तर दाणा तोच देणार ना….! एव्हढी साधी सोपी फिलॉसॉफी कळायला किती वर्षे वाया जातात ना..? दासाभाऊला देखील अजून कळलं नसावं का बरं त्यावेळी याला आपण मुगावला घेवून गेलो ? तेव्हढ्या लहान वयात मी काही पूर्ण अंतर चाललो नव्हतोच. निम्मं अंतर तर त्याच्या खांद्यावर बसून पार केलं होतं. पण साऱ्या पायवाटेने त्याच्याशी झालेला तो संवाद कळत-नकळत माझ्या भटकंती स्वभावावर संस्कार करून गेला. भटकंती माणसाला ‘समृद्ध’ करते म्हणतात ना ते अगदी खरंय. अजूनही मी भटकंती करत असतो. पत्रकारितेतील, नाट्यक्षेत्रातील नव्या शिलेदारांना सोबत घेवून. माझ्या जवळच्या शिदोरीतील चार घास त्यांनाही देत असतो. पण ही समृद्ध झालेली ‘शिदोरी’ संपतच नाही. कदाचित माझे डोळे मिटतील तेंव्हा अनेक मुकुंद ही शिदोरी घेवून भटकंती करायला सज्ज असतील……!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा