भारत जोडो यात्रेने राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य होईल का..?

२०१४ पासून नरेंद्र मोदी नावाच्या झंझावाती ‘भगव्या’ वादळामुळे ‘भुईसपाट’ होणाऱ्या भारतीय काँग्रेसची अस्तित्वाची लढाई आता आत्मघाताच्या टप्प्यावर येवून पोहोचली आहे की काय…? अशी भीती वाटावी इतकी भयावह स्थिती ज्येष्ठ काँग्रेसजन अनुभवत आहेत. तर तरुणाईला वाव या नावाखाली ‘राहुल गांधी’ यांचे कट्टर समर्थक म्हणवून घेत पक्षाला केवळ ‘सोशल मीडियावर’ दररोज पोस्टाळत ‘ऍक्टिव्ह’ ठेवणाऱ्या खोगीर भरतीने काँग्रेस पक्ष पुन्हा ‘फॉर्मात’ येईल का ? या प्रश्नापेक्षाही काँग्रेस पक्ष मोदी-शहांच्या ‘भाजपाशी’ २०२४ मध्ये दोन हात करीत केंद्रात सत्तेत येईल का ? हा प्रश्न कळीचा ठरत आहे. याचाच सरळ-सरळ अर्थ म्हणजे राहुल गांधी यांचे नेतृत्व निदान शिल्लक राहिलेल्या काँग्रेसला मान्य होईल का ? असाच काढावा लागेल. भारतीय राजकारणात आजवर काँग्रेसला कुणीच हरवू शकले नाही. काँग्रेसनेच काँग्रेसला आजवर हरवले आहे असाच अन्वयार्थ राजकीय अभ्यासकांनी लावला आहे. सत्तेवर असणाऱ्या मोदी-शहांच्या भाजपाने गेल्या १५ वर्षात राहुल गांधी यांचा ‘राजकीय पप्पू’ केल्याने राहुल गांधी हे नेतृत्व जनमाणसात कमालीचे ‘प्रभावहीन’ करण्यात सध्यातरी भाजपाची सरशी झाल्याचे दिसत आहे. याबरोबरच राहुल यांच्या वाढत्या हस्तक्षेपाने दुखावलेल्या जुन्या जेष्ठ काँग्रेस नेत्यांच्या पक्षापासून ‘अलिप्त’ होण्याच्या भूमिकेने दि. ७ सप्टेंबर पासून कन्याकुमारी येथून सुरू होणाऱ्या भारत जोडो यात्रेची परिणामकारता किती प्रमाणात असेल ? याचीही चर्चा राजकीय अभ्यासकांमध्ये सुरू आहे.

ऑगस्ट महिन्याचा शेवट आणि सप्टेंबर महिन्याची सुरुवात तसं बघायला गेलं तर काँग्रेससाठी विशेष नोंद ठेवणारा कालावधी म्हणायला हवा. ऑगस्टमध्येच आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मुहूर्त शोधणाऱ्या गुलाम नबी आझाद यांनी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोनिया-राहुल यांच्या नेतृत्वावर नाराजी दाखवत काँग्रेस बरोबर चार दशकाहून अधिक काळ चाललेला आपला संसार मोडत काडीमोड घेतली. ही घटना जशी क्षीण होत चाललेल्या काँग्रेसचा अवसान घात करणारी आहे. त्यापेक्षाही जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांना बोचणारी घटना म्हणजे एकेकाळी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वात प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा ‘राजकीय विजनवास’ सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच कार्यकर्त्यांसमोर प्रकर्षाने आला. दि. ४ सप्टेंबर हा सुशीलकुमार शिंदे यांचा जन्मदिवस. गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीकरांची मर्जी खप्पा झाल्याने ‘अलिप्तवादी’ बनलेल्या सुशीलकुमार यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा अत्यंत साधेपणात स्वीकारताना त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होणारा अलिप्तवाद स्पष्टपणे दिसून येत होता. कायम सुहास्यवदन अर्थात ‘हसमुखराय’ म्हणून जनमाणसात लोकप्रिय असणाऱ्या सुशीलकुमार यांचा ओढलेला अलिप्तवादी चेहरा कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारा असाच वाटत होता. एकतर काँग्रेस पक्षात कधी नव्हे एव्हढी धुसफूस पक्षनेतृत्वावरून दिसून येत आहे. अश्यातच गांधी घराण्याशी आपले ‘ईमान’ ठेवणाऱ्या गुलाम नबी आझाद आणि सुशीलकुमार शिंदे यांचे एकसारखे होणारे खच्चीकरण पक्षाला किती हिताचे ठरणार आहे. गुलाम नबी यांनी स्वतंत्र मार्ग निवडायचा निर्णय घेत स्वतःची राजकीय कोंडी फोडली आहे. मात्र सुशीलकुमार असा ‘धाडसी निर्णय’ कदापिही घेवू शकणार नाहीत. अतिशय नेमस्त स्वभावाचे असलेले सुशीलकुमार शिंदे आपली नाराजी देखील उघडपणाने व्यक्त करणारे राजकारणी नाहीत. मात्र वाढत्या वयोमानाचे ‘लंगडे घोडे’ पुढे करत अलिप्तवाद स्वीकारणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांच्या तटस्थपणाची जरा देखील ‘जाणीव’ जर काँग्रेसच्या गांधी नेतृत्वाला होणार नसेल तर सत्तेसाठीच्या बेरजेच्या राजकारणात एका दलित नेतृत्वाला दुर्लक्षित करण्याचे षडयंत्र पक्षांतर्गत कुरघोडीतून यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल. गुलाम नबी आणि सुशीलकुमार ही लक्ष वेधून घेणारी उदाहरणे आहेत. एकीकडे ‘भारत जोडो’ यात्रेची तयारी धडाक्यात सुरू असताना पक्षातील ‘गळती’ कशी थांबवणार ? की पक्ष नवा ‘गांधीवादी’ होता होता फक्त ‘ट्विटरवादी’ होणार का ? हाच खरा प्रश्न आहे.

भारतीय राजकारणात पदयात्रेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. पक्षाची भूमिका आणि नेतृत्वाची लोकप्रियता वाढविणाऱ्या या मोहिमेकडे अलीकडे मोठा राजकीय ‘इव्हेंट’ म्हणूनच बघितल्या जाते. याची पहिल्यांदा सुरुवात ही १२ मार्च १९३० मध्ये महात्मा गांधी यांच्या ‘दांडी यात्रे’च्या निमित्ताने झाली. साबरमती ते दांडी असा ३८५ किलोमीटर अंतराचा पायी प्रवास करीत महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला सुरुंग लावला होता. पुढे स्वातंत्र्यानंतर ‘पदयात्रा’ या अस्त्राचा वापर फक्त सत्ता हस्तगत करण्यासाठीच झालेला दिसतो. २९ मार्च १९८२ मध्ये एन टी रामाराव यांनी चैतन्य रथम यात्रा काढली. या यात्रेच्या जोरावर त्यांनी नव्यानेच स्थापन केलेल्या तेलगू देशम पार्टी (टीडीपी) या आपल्या पक्षाला आंध्रप्रदेशाच्या सत्तेवर विराजमान केले. पुढे सलग पाचवेळा हा पक्ष आंध्रच्या सत्तेवर राहिला. त्यानंतर २५ सप्टेंबर १९९० रोजी सोमनाथ मंदिरापासून अयोध्येपर्यंत ९ राज्यातून १० हजार किलोमीटर अंतर कापणारी रथयात्रा काढत लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपाचा प्रखर हिंदुत्ववादी चेहरा जनमाणसात ठसविला. त्याचा परिणाम म्हणजे दोन खासदारावरून सुरू झालेला भाजपाचा राजकीय प्रवास केंद्रात सत्ता मिळविण्यात झाला. त्यानंतर २००४ मध्ये वाय एस राजशेखर रेड्डी यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावर आंध्रात १५०० किलोमीटर अंतराची पदयात्रा काढत काँग्रेसला सत्तेत आणले. पुढे त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जगमोहन रेड्डी यांनी ६ नोव्हेंबर २०१७ मध्ये आंध्रातील कडाप्पा ते श्रीकाकुलम पर्यंत १३ जिल्ह्यातून जाणारी ‘प्रजा संकल्प यात्रा काढली. याचा परिणाम म्हणजे २०१९ च्या निवडणुकीतून काँग्रेस आंध्रात परत सत्तेत आली. आता केंद्रात सत्तेत परतण्यासाठीच राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत . मात्र या यात्रेतून काँग्रेस नेमके काय काय साध्य करणार आहे ? ते पक्षातील मरगळ झटकत पक्षातील ‘गळती’ थांबविण्यात यशस्वी होणार का ? दिल्ली तो बहूत दूर की बात…पक्षाची होत असलेली ‘ट्विटर’ प्रतिमा पुसत पुन्हा जनमाणसात काँग्रेसचे नवे रूप स्वीकाहार्य करणार का ? मुळात राहुल गांधी यांची ‘पप्पू’ प्रतिमा पुसून एक प्रगल्भ नेता म्हणून देशवासी त्यांना स्वीकारणार का ? यावरच काँग्रेसला काम करावे लागणार आहे.

भारत जोडो यात्रेसाठी सज्ज असलेले राहुल गांधी.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

2

)

  1. kekaderajesh

    काँग्रेस ची सद्यस्थिती ह्यावरील भाष्य उद्बोधक

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद राजेश 🙏🙏🙏

      Like