सारखा काळ चालला पुढे…

विश्वचक्र हे अविरत फिरते

मरणामधूनी जीवन उरते

अश्रू आजचे उद्या हासती, नवलं असे केवढे !

सारखा काळ चालला पुढे

कुणाचे कोणावाचून अडे ?

मराठी चित्रपट ‘दोन घडीचा डाव’ मधील कवयत्री शांता शेळके यांनी लिहिलेलं हे गाणं….. माझ्या पिढीच्या अगोदरच्या पिढीच्या ओठावर रुंजी घालणारे हे गाणे आणि हा चित्रपट १९५८ मध्ये पडद्यावर झळकला होता. मोठ्यांच्या तोंडून ऐकलेले हे गाणे आपोआपच आमच्या पिढीच्या परिचयाचे झाले होते. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे घरात भिंतीवर लटकलेल्या घड्याळावर हमखास लिहिलेलं असायचं….सारखा काळ चालला पुढे ! भिंतीवर लटकवलेल जुनं घड्याळ बघितलं की हे गाणं हमखास आठवतं. जणू हे गाणं खास भिंतीवर लटकलेल्या घड्याळासाठीच लिहिले असावे.

काल – परवाचीच गोष्ट आहे, माझे सहृदयी पत्रकारमित्र विनोद कामतकर यांच्या गावाकडच्या (मंद्रूप) घरी जाण्याचा योग आला. त्यांच्या वाड्यात तीन खोल्यांमध्ये भिंतीवर लटकलेले तीन घड्याळे दिसली. तीनही घड्याळे आपले शंभर वर्षांचे आयुष्य पूर्ण करीत शतकोत्तर संपूर्ण निरोगी आयुष्य जगताना दिसली. म्हणजेच तीनही घड्याळे उत्तम स्थितीत आपले कार्य अविरतपणे बजावताना दिसली. मी घड्याळाला कधीच निर्जीव वस्तू समजत नाही. कारण त्याच्या हृदयाची ‘ टिक टिक ‘ कायम सुरू असते. जेंव्हा हृदयाची टिकटिक कायमचीच बंद होईल तेंव्हाच ते घड्याळ मृत झाले असे निदान माझं तरी स्पष्ट मत आहे. माणसासारखेच घड्याळाचे पण जगणं असतं. हे सांगण्याचे कारण म्हणजे घड्याळाला सजीव समजणाऱ्याच्या घरात अगदी शतकोत्तर आयुष्य जगणारे घड्याळे देखील आपल्याला पहायला मिळतात. मित्रवर्य विनोद कामतकर यांच्या गावाकडच्या घरी सर्व शतकोत्तर आरोग्यदायी आयुष्य जगणाऱ्या तीन घड्याळांचा कदाचित आपण ‘ अँटिक पीस ‘ म्हणून गौरवाने उल्लेख करू. पण ज्या कुटुंबाच्या चार पिढ्यांना साथ दिली अश्या वस्तूंना ‘ अँटीक पीस ‘ कसं म्हणायचं…? कामतकर कुटुंबीय या तीनही घडाळ्यांना घरातील सदस्यच समजतात.

मेड इन जर्मनी, मेड इन इंग्लंड अशी ओळख असणाऱ्या या ‘ चावीबाज ‘ घड्याळांची दुरुस्ती देखील आत्ताच्या काळात सहजगत्या होणे जिकिरीचे आहे. एकतर त्याचे ओरिजनल पार्ट्स जगात कुठे मिळणे केवळ अशक्यच. त्यामुळे जुन्या बाजारात जावून भंगारात टाकलेल्या जुन्या घड्याळांचे पार्टस हुडकून आणून या घड्याळांना अचूक बसतील या पध्दतीने घासून कट करून ‘ कारागिरी ‘ दाखविणारा घड्याळजी शोधावा लागतो. कामतकर कुटुंबाने ‘ घेतला वसा टाकणार नाही ‘ हे ब्रीद अंगिकारून आपणच घड्याळाच्या आजाराचे निदान करून उपचार करण्याचे तंत्र चार पिढ्या सांभाळले आहे. म्हणूनच शतकोत्तर वयोमान असणारी ही घड्याळे आजही नव्या तरुणाईने काळाबरोबर धावत आहेत. तुमच्याकडे देखील असे जिवंत ‘ अँटीक पीस ‘ असेल तर तुमची देखील हीच संवेदना असणार…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

5

)

  1. Nilesh Pandit

    CHAN LIHILAY APPA

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद निलेश 🙏🙏

      Like

  2. aaliya sayyad

    Nice 👍👍👍

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद आलिया 🙏🙏

      Like

  3. Dinanath Jadhav

    खुप सुन्दर शब्दात मांडणी केलीय

    Like