युवा शेतकऱ्याच्या प्रयोगशील हंगामाची यशस्वी कहाणी…!

या देशातील पारंपारिक पध्दतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे जसे आजही अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत, त्याचप्रमाणे प्रयोगशील शेतकऱ्यांचे सकारात्मकता निर्माण करणारी अनेक उदाहरणे देखील आहेत. अर्थात अनुत्तरित प्रश्नांच्या तुलनेत ही उदाहरणे संख्यात्मक दृष्टीने कमी असल्याने आपण त्याकडे फार गांभीर्याने पहात नाही. विकासाच्या योजना जश्या माणसाच्या जगण्यामध्ये सुलभता आणि सुबत्ता आणतात. तश्याच त्या परंपरा, सभ्यता आणि संस्कृतीला बाधा निर्माण करणाऱ्या देखील ठरू शकतात. हा परिणाम लगेचच दिसून येत नाही, पण हा धोका गंभीर वळण घेवू शकतो. आता हेच बघा ना ! दळणवळणामध्ये अधिक सुलभता आणि गतिमानता आणण्यासाठी महामार्ग उपयुक्त ठरतात. त्यादृष्टीने सरकारने महामार्गाचे देशभर जाळे निर्माण करण्यास गती दिली आहे. यामुळे उद्योग – व्यापार आणि उत्पादकतेत गतिमानता निश्चित येत आहे. मात्र ग्रामीण सभ्यता, संस्कृती आणि परंपरांना बाधा निर्माण करणारा धोका हळूहळू आकाराला येतोय. ज्या गावामधून महामार्ग चाललेत त्या गावांच्या अर्ध्याहून अधिक बाजारपेठा ह्या उड्डाणपुलाच्या खाली आपले अस्तित्व हरवून बसल्या आहेत. त्यामुळे व्यवसायांचे स्थलांतर करावे लागत आहे. तर हाय वे मुळे ढाबा संस्कृती फोफावत आहे. याचा ग्रामीण सभ्यता आणि संस्कृतीला पुढे चालून मोठा धोका होणार आहे. शेती करणे हे कनिष्ठ दर्जाचे किंवा दर्जाहीन समजण्याचे दुष्ट चक्र आता पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मानगुटावर भूत होवून बसले आहे. ‘ इझी मनी ‘ च्या नादात शेतकऱ्यांची मुले हमरस्त्याच्या कडेला ढाबे टाकून आपली शेती ओसाड करू लागले आहेत. काहीजण हायवेच्या दुतर्फा वाढणारी लोकवस्ती ध्यानात घेत आपली शेतजमीन बिगरशेती परवाना काढत आयते बांधकाम व्यावसायिकांच्या घश्यात घालू लागले आहेत. हे असच सुरू राहिलं तर काही वर्षांत शेतजमिनीचे क्षेत्र कमी कमी होत शेती या ग्रामीण संस्कृतीला बाधा निर्माण करणारा धोका मोठा होईल. म्हणूनच संख्यात्मक दृष्टीने कमी असणारे प्रयोगशील शेतीचे प्रयत्न आज होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या शिक्षित पोरांनीच यासाठी पुढाकार घ्यायला हवा. हा सकारात्मकता निर्माण करणारा प्रयत्न बेगमपूरच्या (ता.- मंगळवेढा, जि.- सोलापूर) उच्च शिक्षित युवा शेतकरी उमाकांत उत्तम कावळे याने यशस्वीपणे राबविला आहे. त्याचीच ही कहाणी….

घोडेश्वर – बेगमपूरचा उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी उमाकांत कावळे.

अवघी तिशी पार केलेल्या उमाकांत कावळे या युवा शेतकऱ्याने बी. ए.,एमबीए,एल.एल.बी शिक्षण नुसतेच पूर्ण केले नाही तर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तीन – चार वर्षे कसून अभ्यास देखील केला होता. स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही हे लक्षात आल्यावर एम.एन.सी कंपनीत नोकरी सुरू केली. जस्ट डायल, दैनिक भास्करची सोलापूरची मराठी आवृत्ती दैनिक दिव्यमराठीमध्ये आपली सेवा बजावली. कोरोना महामारीमुळे पुकारलेल्या लॉक डाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम मध्ये कंपनीचे काम करत असतानाच वडिलोपार्जित शेतीमध्ये लक्ष घालायला उमाकांत याने सुरुवात केली. शेती करण्याचा कुठलाही अनुभव नसताना आपण शेती करायची या उमाकांतच्या निर्णयाला घरातूनच हळूहळू प्रोत्साहन मिळू लागले. बेगमपूरमध्ये कावळे घराणे प्रतिष्ठित आणि मोठे आहे. उमाकांतला १४ चुलते आणि ३० चुलत भावंडं आहेत. विभक्त असले तरी एकाच गावात एकविचाराने राहणारे कुटुंब म्हणून कावळे घराण्याकडे पाहिले जाते. उमाकांत याने शेती करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा सर्व भावंडं आणि गावातील मित्रांनी त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले. सुरू असलेली चांगल्या पगाराची नोकरी थांबवत उमाकांत याने शेतीत राबायला सुरुवात केली. अर्थात पारंपारिक पध्द्तीने शेती न करता आधुनिकतेची कास धरत शेती करण्याचा निश्चय केल्याने उमाकांत याने विविध कृषी तज्ज्ञांची आधुनिक शेती विषयक, विविध प्रयोगशील शेतीचे मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांची अक्षरशः पारायणे केली.

वडीलधाऱ्यांकडून आग्रहाने दोन एकर पडीक असलेली शेतजमीन स्वतः शेती करण्यासाठी घेत उमाकांतने अगोदर ती जमीन उपजावू करण्यासाठी मेहनत घेतली. शेतात पसरलेली झाडी – झुडुपे काढून नांगरून, दगडधोंडे बाजूला सारत मशागत केली. त्याच जमिनीत असलेल्या पडक्या विहिरीत नदीवरून पाईप द्वारे पाणी आणून पाणीसाठा केला. पहिल्यांदाच पपईची लागवड करण्याचे निश्चित केले. दोन एकरच्या प्लॉट मध्ये दोन हजार पपईची रोपे लावल्या नंतर पाण्याच्या वेळा, वेळेवर सेंद्रीय खते आणि औषध फवारणी करीत स्व अध्यायनातून काळजी घेत पपईची बाग फुलविली. पहिल्याच प्रयत्नात मोठ्या प्रमाणात पपईला फळे लगडल्याचे स्वप्न साकारले. प्रामाणिक प्रयत्नातून आणि मेहनतीतून उमाकांतला धरणीमातेने देखील कौल दिला. फळांचा आकार, गुणवत्ता पाहून विनासायास कोलकाता, मुंबई – पुण्याची बाजारपेठ मिळाली. पिकाच्या पहिल्या हप्त्यातच उमाकांत नफ्यात आला आहे. पपईची बाग उभी करायला, तिची निगा राखायला जेव्हढा खर्च झाला तो तर निघालाच आता नफ्याचे गणित सुरू झाले. साधारण वार्षिक ५ ते ६ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न देणारी ही दोन एकरातील पपईची लागवड किमान तीन वर्षे उत्पन्न देणार आहे. इथून पुढच्या काळात शेती मधील प्रयोगशीलताच शेतकरी आणि शेतीला वाचविणार आहे. उमाकांत कावळे यांच्या या प्रयोगशील शेतीचा यशस्वी प्रयत्न इतर शेतकऱ्यांच्या मुलांना नक्कीच प्रेरणा देणारा असाच आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या मुलांना शिकवून उच्च शिक्षित बनविल्यावर चाकरी करायला लावण्यापेक्षा आपल्याच शेतीत प्रयोगशील शेतकरी होण्यासाठी प्रेरित केले तर भारत हा कृषिप्रधान देश असल्याचे सार्थक होईल. कुणाला अधिक माहितीसाठी संपर्क साधायचा असेल तर उमाकांत कावळे , मोबाईल क्रमांक :- 9527929191 वर संपर्क साधावा. तूर्त इतकेच.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

3

)

  1. Umakant Kawale

    Thank you so much sir 🙏

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      एव्हढे काम करा की ते इतरांना प्रेरणादायी ठरेल. 🙏🙏

      Like

      1. Umakant Kawale

        हो नक्की 🙏

        Like