
समाज जीवनामध्ये सामाजिक संतुलन रहावे, समाज सर्व विकारमुक्त व्हावा, भोळ्याभाबड्या माणसाला राज्यकर्त्यांचे संरक्षण मिळावे यासाठी दैवी शक्तीचे प्रकटीकरण होणे ही केवळ मध्ययुगीन कालखंडातीलच गरज नव्हती तर आजचीही गरज आहे. तेज, बल आणि बुद्धीचा समन्वय साधणाऱ्या विकारमुक्त निर्भय समाजाच्या निर्मितीसाठी आदिशक्ती दुर्गा देवीला आवाहन करताना संत एकनाथ महाराज म्हणाले होते…..
अलक्षपुर भवानी दार उघड,
कोल्हापूर लक्ष्मी दार उघड,
तेलंग लक्ष्मी दार उघड,
तुळजापूर भवानी दार उघड,
दार उघड बया आता दार उघड ।।
योगीराज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई यांना धर्मभ्रष्ट ठरवित गोदावरी नदीत जलसमाधी घ्यायला भाग पाडणाऱ्या दक्षिण काशीच्या अर्थात पैठणच्या धर्मपीठा समोर बरोबर अडीचशे वर्षांनी धर्मविकाराने ग्रस्त झालेल्या समाजाला जागे करण्यासाठी प्रत्यक्ष शतचंडी समोर आळवणी करणारे संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आम्ही भोई आहोत. आज पुन्हा एकदा विकारग्रस्त होऊ पाहणाऱ्या समाजाला ग्लानी मुक्त करण्यासाठी नाथांबाबाची आरोळी ठोकली पाहिजे….दार उघड बया आता दार उघड ।।


लोकशाही प्रणालीत राष्ट्रधर्म हाच समाजधर्म असतो. तिथे व्यक्तिगत धर्म बाजूला पडतो. मात्र स्वधर्माचे जाज्वल्य जागृत करणारे महापुरुष हे भलेही समाजाच्या जाती-पंथाच्या विविध गटात वर्गीकृत केले गेले असले तरी ते त्या-त्या गटा-तटाचे ‘अस्मिते’चे प्रतीक असतात. म्हणूनच सत्ताकारण अस्थिर करायचे असेल तर वेळोवेळी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून समाज ढवळून काढण्याचे प्रकार केले जातात. खरं म्हणजे अश्या प्रवृत्तींना राक्षसी खल प्रवृत्ती म्हंटल पाहिजे. अगदी रामायण-महाभारताच्या काळापासून ते मध्ययुगीन कालखंडापर्यंत राक्षस, दैत्य, असुर या कल्पना भारतीय समाजमनात रूजवल्या गेल्या त्या कदाचित मानवी खलप्रवृत्ती सूचक म्हणूनच. मग आता जे कुणी सामाजिक आरोग्य दूषित करू पहात आहेत त्यांना राक्षस, दैत्य, असुर वर्गातले मानले तर पुन्हा एकदा त्यांचे निर्दालन करण्यासाठी आदिशक्तीकडे जसे नाथ महाराजांनी आपल्या भारुडातून गाऱ्हाणे मांडले. तसे गाऱ्हाणे आता भाबड्या समाजाने कुणा समोर मांडावे ? मुळातच आपण अजूनही राष्ट्रधर्म हाच स्वधर्म मानायला तयार नाही. मग महापुरुषांची विभागणी अन त्यातून निर्माण होणारी अवहेलना ही समाज मनाला कैफ चढविणारी ठरत आहे. ही धुंदीच आता राजकीय डावपेचांचा एक भाग बनली आहे. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांची यथेच्छ बदनामी करणारी वाचाळवीरांची बकवास सावरकरप्रेमी समाजाला दुखावणारी ठरली लगेचच त्यापाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना करणारी वाचाळता त्या-त्या समाज गटांना अस्वस्थ करतानाचे चित्र दिसत आहे. एकूणच समाजमन कलुषित करत राजसत्ता अस्थिर करण्याची खल प्रवृत्ती जोर धरू लागली आहे असेच म्हणावे लागेल. मग या राक्षसांचा बिमोड सत्ता सावरणाऱ्या सरकारने करायचा की आपआपल्या गटा-तटाचे महात्म्य जपणाऱ्या समाजतुकड्यांनी करायचा….? म्हणूनच आदिशक्ती भवानी मातेकडे गाऱ्हाणे मांडूयात…. दार उघड बये दार…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा