महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडीचे राजकारण करीत सतत सत्तेत राहण्यासाठीच जन्मलेला राजकीय पक्ष हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख सर्वसामान्य मतदारांमध्ये ठसलेली आहे. श्रीमती सोनिया गांधी ह्या जन्माने परदेशी आहेत म्हणून त्या भारताच्या पंतप्रधानपदी नकोत हा उजव्यांशी मिळताजुळता विचार मांडत नव्या ‘राष्ट्रवादा’चा डांगोरा पिटत ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार यांनी काँग्रेसशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र स्थापनेनंतर सत्तेसाठीचा ‘सेक्युलर’वाद मांडत काँग्रेस बरोबर आघाडी (मांडवली) करीत कायम सत्तेत राहणाऱ्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला येनकेन प्रकारे सत्तेत राहणारा पक्ष म्हणूनच ओळख मिळालेली आहे. मात्र सत्तेसाठी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) सोबत पक्षाचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांनी केलेली हातमिळवणी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला….हायजॅक झाला की सत्तेत सामील होण्यासाठी केलेलं काका-पुतण्याचं हे केवळ नाटकच आहे का ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

१९९९ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजकीय प्रवास पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक आणि ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार यांच्या ‘सत्तेतून सत्तेकडे’ या मॅजिक विचारधारेवरच सुरू आहे. एकीकडे परदेशी व्यक्ती नको म्हणत पक्ष स्थापनेसाठी राष्ट्रवाद मांडणाऱ्या शरदचंद्र पवार यांचा सत्तेसाठीचा ‘सेक्युलर’वाद हा तेव्हढाच लवचिक असाच राहिला आहे. काहीही झाले तरी आपण सत्तेत राहिलो तरच आपल्या पक्षाचे अस्तित्व राहील हे माहीत असणाऱ्या पवार यांचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा नाही तर नेत्यांचा पक्ष म्हणूनही ओळखला जातो. मागे काँग्रेसला झटका देत ‘पुलोद’ आघाडीचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या पवार साहेबांना सत्तेतील ‘बारगेनिंग पॉवर’ची ताकद माहिती असल्यानेच त्यांनी ‘सत्तेतून सत्तेकडे’ जाणाऱ्या विचारधारेला त्यांनी सेक्युलॅरीझमचा ‘तडका’ दिला. त्यामुळे पवार साहेबांची कृपादृष्टी राहिली तर सत्तेची फळं चाखायला मिळतात याची खात्री पटल्यानेच इतर समविचारी पक्षातील असंतुष्ट पवारांच्या तंबूत डेरेदाखल होत गेले आणि मग राष्ट्रवादी हा नेत्यांचा पक्ष बनून गेला.

आपल्या बरोबरच बहुजन वर्गातील विशेषतः मराठा समाजातील नेत्यांना पाठबळ देत असताना पवारांनी पुतण्या अजितदादा आणि मुलगी सुप्रियाताई सुळे यांचे नेतृत्व प्रस्थापित केले. राज्यात अजितदादा तर केंद्रात सुप्रियाताई अशी नेतृत्वाची कार्यकक्षा आखल्याने सर्वकाही सुरळीत सुरू होते. याकाळात कुंडीतल्या बोन्साय सारखी इतर फोफावणाऱ्या नेतृत्वाची वेळोवेळी छाटणी होत असल्याने राष्ट्रवादीचा सत्तेचा फुलोरा कायमच डवरलेला दिसत होता. इतर राजकीय पक्षातील लाथाळ्यांच्या राजकीय नाट्यात मध्यस्थीची मल्लिनाथी करणाऱ्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी मध्ये नेतृत्वामध्ये डावपेचाचे राजकारण केंव्हा सुरू झाले याकडे बघायला देखील शरदचंद्र पवार यांना कधी उसंत मिळाली नाही. पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला भेदत २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मित्रपक्षांना सोबत घेत राज्यात युतीचे सरकार स्थापन केले. त्या पाच वर्षांच्या पूर्ण कालावधीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीला सत्तेपासून बाहेर व्हावे लागले. जन्मापासून कायम सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना फारकाळ सत्तेबाहेर राहता येत नसल्यानेच काहीही करून सत्तेत सहभागी होण्याची घाई राष्ट्रवादीच्या अस्वस्थ नेत्यांना झाली अन तिथेच सर्वकाही आलबेल असल्याचे सोंग उघड झाले. २०१४ ते २०१९ याकाळात भाजपच्या फडणवीस सरकारबरोबर हातमिळवणी करून सत्तेत न येता आल्याने पाचवर्षे सत्तेबाहेर तिष्ठत बसावे लागलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आगामी काळात भाजपा सोबत सत्तेसाठी मांडवली करायला काही हरकत नसावी हा नेमस्त विचार डोकवायला सुरुवात झाली होती. अनायासे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या वादावरून भाजपाची संगत सोडणाऱ्या शिवसेनेमुळे राष्ट्रवादीला ही संधी मिळाली. त्यातूनच अजितदादा पवार यांच्या ‘पहाटेच्या शपथविधी’चे बंडाळीचे नाट्य घडले होते. मात्र चारच दिवसात या बंडाळीच्या नाट्यावर पडदा टाकत शरदचंद्र पवार यांनी अजितदादा यांना माघारी बोलावत फडणवीस सरकार पाडले अन महाविकास आघाडी जन्माला घालत शिवसेनेबरोबर घरोबा करीत नव्या ‘चाणक्य’नीतीचा परिचय महाराष्ट्राला दिला. सगळा महाराष्ट्र ‘पवार इज पॉवर’चा जयघोष करीत राहिली. मात्र कोरोनाच्या कृपेवर वर्ष-दीड वर्षे तरलेल्या ठाकरे सरकारला देखील दुहीची दृष्ट लागली आणि एकनाथ शिंदे यांच्या रुपात बंडाळी होत पुन्हा शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपच्या युतीचे सरकार सत्तेत आले. सत्तेसाठीच्या या साठमारीच्या विरोधात एकीकडे पडसाद उमटत असतानाच राष्ट्रवादीत देखील नेतृत्वाच्या अहमिकेत बेदिली माजली होती. पहाटेच्या शपथविधी नंतर सत्तेच्या भरल्या ताटावरून हाताला धरून उठवत आणल्याने अपमानित नेतृत्वाचे धनी झालेल्या अजितदादांच्या मनात काका शरदचंद्र पवार यांच्या विरोधात जोरकस बंडाळीचा वणवा भडकलेला होताच, त्याला हवा मिळाली आणि अजितदादांनी २ जुलै २०२३ चा मुहूर्त साधत काकांच्या विरोधात पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकविले.

यावेळीही मागच्या वेळेसारखी काकांची ही राजकीय खेळीच असावी या संभ्रमात असलेल्या महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात अजितदादांच्या या बंडाकडे दोन दिवस कुणीच गांभीर्याने पाहिले नाही. स्वतः शरदचंद्र पवार यांनादेखील आपल्या विरोधात आपलाच पुतण्या उभारल्याची जाणीव ४८ तास उलटून गेल्यावर झाली. मग काका परत पावसात चिंब भिजायच्या तयारीला लागले. एकनाथ शिंदे पॅटर्न तोंडपाठ झालेल्या अजितदादांनी थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरच अधिकार सांगत राष्ट्रवादी पक्ष फुटल्याची महाराष्ट्राला ग्वाही दिली. जे ठाकरेंच्या शिवसेनेचे झाले त्याच वाटेवर आता राष्ट्रवादी आली आहे. ८३ वर्षाचे काका घरभेदाने अस्वस्थपणे महाराष्ट्रात पक्षाला एकजूट करायला निघाले तर अजितदादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेवून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. सत्तेसाठी आसुसलेले राष्ट्रवादीतील एकतृतीयांश नेते अजितदादांच्या पाठीमागे असल्याचे चित्र दिसत आहे. तर ‘तेलही गेले, तूपही गेले’अशा केविलवाण्या स्थितीत स्वतः शरदचंद्र पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रियाताई पवार दिसत आहेत. दोन तुकडे झालेल्या पक्षाची पुन्हा मोट बांधण्यासाठी ८३ व्या वर्षी पवार साहेब महाराष्ट्रातून उठणाऱ्या पवारप्रेमी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊ पहात आहेत तर अजूनही हे पहाटे पडलेले दुस्वप्नच असल्याच्या भ्रमात शिल्लक राष्ट्रवादीतील शरदप्रेमी नेते अजितदादांच्या घरवापसीची प्रार्थना ट्विटर, समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमातून करत आहेत.

आता राष्ट्रवादी पार्टी खरंच फुटली का ? की पुतण्या अजितदादांनी काका शरदचंद्र पवार यांच्या कडेकोट सुरक्षेतून ‘हायजॅक’ केली ? या प्रश्नांची उकल व्हायला राजकीय अभ्यासकांना वेळ द्यावा लागणार आहे. कारण ही देखील काकांची खेळी असू शकते असं मानणारे महाराष्ट्रात चौका-चौकात गप्पांचे फड जमवत आहेत. पुन्हा एकदा फडणवीसला सायेबांनी येड्यात काढले बगा…. दादा शेवटी सायबांचेच. राष्ट्रवादी एकच हाय. फुटल्यासारखी दिसलं तरी ते एकच हायत ….कारण सायबच खरे चाणक्य हायत…..या पारावरच्या अन चौका-चौकातील गप्पांनी रंग भरू लागलाय. कुणास ठाऊक हे सुद्धा खरं असू शकतं…. कारण सत्तेसाठीच जन्मलेला पक्ष आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to Priti उत्तर रद्द करा.