खुपते तिथे दुखते….!

What bothers you and why?

कालपरवाच चांद्रयानाचे यशस्वी उड्डाण करून भारत देश बोटावर मोजण्या इतक्या बलाढ्य देशांच्या पंक्तीत जावून बसला आहे. अर्थात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या काळात ही एव्हढीच एकमेव उपलब्धी नाही. या सातही दशकांच्या प्रवासात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना वेळोवेळी समर्थपणे तोंड देत कासवगतीने का होईना पण प्रगतीचा प्रवास सुरु आहे. ही झाली देश नावाच्या प्रदेशाची सामाजिक,आर्थिक प्रगती. पण व्यक्तिगत पातळीवर कुटुंब आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य यांच्या आयुष्यात होणारे बदल हे सुखावह आहेत का ? व्यक्तिगत प्रगतीच्या नावाखाली समाजाचा कणा समजली जाणारी एकत्र कुटुंबपद्धती, संस्कार, सभ्यता कुठेतरी हरवत चाललीय. १९६०-७० च्या दशकात जन्मलेल्या पिढीने जे सर्व अनुभवलंय ते आता कुठेतरी हरवत चाललंय हीच त्या पिढीची खंत आहे…..सल आहे. मराठीत एक चांगला वाक्यप्रचार वापरला जातो. खुपते तिथे दुखते. होय हेच कुटुंबप्रमुखाचं खुपणं आणि दुखणं आहे.

कांदा चिरावा अगदी तशीच नाती उभ्याने चिरली जात आहेत.

सार्वजनिकरित्या एखाद्या जातसमूहाला ‘वाळीत’ टाकण्याचा विकृत जल्लोषी उत्सव आजकाल बंद झाला असला, उचनीचता, भेदभावाचे सार्वजनिक प्रकटीकरण बंद झाले असले तरी यासर्व निषिद्ध मानल्या जाणाऱ्या खलप्रवृत्ती आता व्यक्तिगत पातळीवर नात्यांमधून डोकावू लागल्या आहेत. नुसत्याच डोकावत नाहीत तर खानदानी वैरभाव निर्माण करू लागल्या आहेत. त्यामुळं नात्यांचा एकजिनसी विस्तार खुंटू लागला आहे. अलीकडे एक नेहमीची ओरड सार्वत्रिक झाली आहे की, घरातल्या लहानांना त्यांच्या आजोबाच्या आधीच्या पिढीतील आपल्या कुलपुरुषांची नावे किंवा नाती देखील सांगता येत नाहीत. पण गोची ही आहे की आपण तरी कुठं नाती जपतोय हा ओरड करणाऱ्या महानुभवांना कधी प्रश्न पडतो का ? कांदा उभा चिरावा तशी मनाला न भावणारी नाती चिरल्या जात आहेत. अपार्टमेंटच्या लिफ्टमधून बाहेर पडत पटापट आपल्या खोलीत शिरण्यासारखं नात्याचं झालंय. लिफ्टमध्ये काही सेकंद का होईना त्या अपार्टमेंटमधील रहिवासी एकमेकांच्या नजीक येतात पण अपरिचिता सारखे. कुटुंबाच्या लिफ्टची हीच गत झालीय. कामापूरते दोन शब्द बोलणे किंवा चेहऱ्यावर एक किंचितसे उमटणारे स्माईल देखील आताशा नाहीसे झालेले दिसते. कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यावर बंदी आली ती विषाणूचा संसर्ग फैलावू नये म्हणून पण नात्यांमध्ये असा कोणता ‘विषाणू’ पसरू पाहतोय जो नात्यांच्या घट्ट विणीचा पार गुंता करून टाकणार आहे…..मग नात्यांमध्ये ही अस्पृश्यता…. हे कोरोन्टाईन होणे का असावे…? मी अन माझे कुटुंब हा आपमतलबीपणा एकत्र कुटुंबपद्धतीला जसा घातक ठरला त्याहीपेक्षा आता त्यातही सूक्ष्म भेदाभेद सुरूच आहेत. तुकड्यात विभागलेल्या कुटुंबातही आपल्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणून कुटुंबसदस्याला बहिष्कृत करणे, मग त्यानेही स्वतंत्र अस्तित्व जपत नवा घरोबा पुढे नेणे हे प्रकार आता सर्वमान्य होत चालले आहेत. मग विस्कळीत कुटुंबाचा गाडा अडखळत का होईना पुढे घेवून जाण्याचा अट्टाहास म्हातारपणी आमची काळजी करणारे जवळचे कुणीच नाहीत या आक्रोशापर्यंत घेवून जातो. परवा माझा एक धनिक मित्र मला म्हणाला, म्हातारपणी काहीतरी चाळा हवा म्हणून गावाबाहेर पडीक शेतजमिनीवर ‘वृद्धाश्रमाचा’ प्रोजेक्ट करतोय….समाजात म्हाताऱ्या आई-वडिलांना हाकलून देणाऱ्या मुलांची संख्या खूप वाढतेय असं त्याचं म्हणणं आहे. पण मुळात म्हातारपणी रिकामावेळ घालविण्यासाठी चाळा म्हणून जर तुम्ही वृद्धाश्रम उभारणार असाल तर ती समाजसेवा कशी ठरेल. बरं ठिकठिकाणी उभारले जाणारे वृद्धाश्रम हा त्यावरचा तोडगा असणार आहे का ? तरुणांचा असलेला देश कधीतरी म्हातारा होणार आहेच ना…! मग सगळा देशच वृद्धाश्रमात नेवून ठेवणार की काय….? चांद्रयान काही दिवसांनी चांद्रभूमीवर यशस्वीपणे उतरेल देखील पण तुझ्यासाठी चंद्र-तारे जमिनीवर आणेन अशी आयुष्यभर स्वप्ने जोजवणाऱ्या म्हाताऱ्यांचं काय होणार ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to Sunita Patil उत्तर रद्द करा.

Comments (

3

)

  1. Randhir Abhyankar

    खुपच छान व वैचारिक लेख आहे….असेच वैचारिक खाद्य आम्हाला पुरवत जावे…..धन्यवाद सर👌👌💐💐

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद रणधीर 🙏🏼🙏🏼 आपल्या सारख्या संवेदनशील वाचकांपर्यंत पोहोचणे हाच या ब्लॉगचा उद्देश आहे.

      Liked by 1 person

  2. Sunita Patil

    छान मार्मिक लेख आहे…….

    Liked by 1 person