What foods would you like to make?
आज नेहमीच्याच म्हणजे बेरोजगारी, महागाई, विषमता, आर्थिक शोषण, महिनाभर काम केल्यावरही मिळणारे तुटपुंजे वेतन, वाढत्या कुटुंबाच्या गरजा पुरवताना होणारी त्रेधातिरपीट या असल्या डोक्याला मुंग्या आणणाऱ्या विषयावर आपण लिहायचंच नाही असं ठरवूनच बसलोय. आज कुछ हटके हो जाये… म्हणून बहुसंख्य भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन पुरुषांचा नावडता असलेला विषय म्हणजे ‘तुम्हाला कोणता पदार्थ बनवायला आवडेल ?’ स्वयंपाक घराकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या पुरुषांना हा अधिक नावडता विषय असू शकतो. किंवा ज्यांना ‘कुकिंग’ हा विषय फार महत्वाचा किंवा आनंद देणारा वाटत नसेल अशांना हा विषय रटाळ, कंटाळवाणा वाटू शकतो. पाश्चात्य देशांपेक्षा भारतीय पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. कारण स्त्रियांनी करावयाची कामे ही पुरुषांनी करू नयेत. अन्न शिजवणे हे घरातल्या स्त्रियांचे आद्य कर्तव्य असते असं मानणारा भारतीय पुरुषवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ‘तुम्हाला कोणता पदार्थ बनवायला आवडेल ?’ असा प्रश्न विचारला तर ‘हे काय आता नवीन ?’ अशी प्रतिक्रिया उमटू शकते. अर्थात आता नव्या पिढीतील युवावर्ग याला अपवाद आहे. हॉटेल मॅनेजमेंट सारखा अभ्यासक्रम, कुकिंगचे वेगवेगळे कोर्स करून चांगल्या फाईव्हस्टार हॉटेलमध्ये शेफची नोकरी मिळू शकते म्हणून का होईना पाकशास्त्रकडे आपुलकीने बघतात. साधारणतः ४५ ते ५० वयोगटाकडे झुकलेल्या बहुतांश पुरुषांना मात्र घरात स्वतःपुरता चहा देखील करून घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. तर मूळ विषयाकडे येवू…. वर्षात असे काही दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, ज्यावेळी घरातील सुगरणींची अनुपस्थिती असते. अशावेळी तुम्हालाच तुमच्या दोनवेळेच्या खाण्याची व्यवस्था करावी लागते. बाहेर तयार खाद्यपदार्थ मिळण्याची, हॉटेल्सची गर्दी असली तरी महिना अखेर असेल आणि खिश्याचा सल्ला तुम्हाला हॉटेलिंग करू देणारा नसेल तर, अशावेळी शेजारी अथवा मित्रांकडे जेवायला जाणे देखील ऑकवर्ड वाटत असते. मग काय उपाशी राहणार का ?…..त्यासाठी कमी श्रमाच्या, सोप्या आणि चटकन करता येणाऱ्या एक-दोन रेसिपी जमायलाच हव्या ना. अंड्याचे ऑम्लेट-पाव हा सर्व्हाय करण्याचा प्रकार होवू शकतो. पण पोट भरण्याचा नाही. भाकरी-चपाती (पोळी) करता येत नाही तरी हरकत नाही. वेळ पडली तर ती स्टॉल वरून विकत आणता येते. पण भाजी ही आपल्याला जमलीच पाहिजे. आणि हा राडा नको असेल तर सुटसुटीत सोपा पदार्थ तरी जमलाच पाहिजे….तरच तुम्ही उपाशी राहणार नाहीत.



माझ्या समजुतीनुसार वांग्याचं भरीत, बेसन पिठलं, सोबत शेंगाची चटणी-दही आणि भजे हे पदार्थ आवडत नाहीत असा मराठी माणूस शोधूनही सापडणे अवघडच. बरं हे खाद्यपदार्थ बनवायला देखील अतिशय सोपे आहेत. वांगे भाजून देखील भरीत बनवता येतं फक्त त्यावरचे भाजून करपलेले साल काढावे लागते. त्यापेक्षा चमचाभर तेलात वांग्याच्या फोडी वाफवून घेतल्या मग त्यात कापलेला कांदा, कोथिंबीर, प्रमाणात तिखट-मीठ आणि वर तडकलेल्या मोहरीची फोडणी घातली आणि त्यावर चमचाभर दही घालून मॅश केलं की झालं चांगलं टेस्टी वांग्याचं भरीत.(मला स्वतःला हे जमतं बरं का !) बेसन (हरभऱ्याच्या डाळीचे पीठ) पिठलं देखील अतिशय सोपी रेसिपी आहे. डाळीचे पीठ प्रमाणशीर पाण्यात भिजवून गाठी होवू न देता घ्यावे (पातळ पिठले हवे असेल तर अधिक पाणी) त्यातच तिखट-मीठ प्रमाणात घालून एकजीव करावे. गॅसच्या मंद आचेवर पातेल्यात किंवा कढईत तेल गरम केल्यावर त्यात जिऱ्या-मोहरीची फोडणी करावी अन त्यात भिजवलेले डाळीचे पीठ टाकावे. झालं की पिठलं….क्रिया सोपी आहे पण आनंद देणारी आहे. बाकी भाकरी आणि पोळी बाहेरून विकत आणता येते. सहज उपलब्ध होते. आपण एकतरी पदार्थ बनवू शकतो हा कॉन्फिडन्सच मुळात तुम्हाला घरात कुणी नसताना एकाकी असल्याची जाणीव होवू देत नसतो. म्हणून घरातले सर्व सदस्य जरी बाहेरगावी गेले तरी तुम्ही एकटे येणारे रितेपण एन्जॉय करू शकता. मग काय घरी कुणी नसताना एखादा सोपा पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न कराल ना..? ट्राय करायला काय हरकत आहे ?


:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा