आज ‘आस्तिक-नास्तिक’चा विषय मांडावा म्हणतोय….माझ्या अल्पबुध्दीला झेपेल अशीच मांडणी असणार आहे. आजकाल आम्हा लेखक मंडळींची चांगलीच ‘गोची’ झालीय. धर्मसंस्काराला फाट्यावर मारताना विज्ञानवादाची ढाल पुढे करत आम्ही पुढारलेल्या (राजकीय विचारधारेला आधीन होत) विचारांचे आणि नवमतवादी म्हणून काहीकाळ मिरवतो. पण अर्ध्याअधिक वाटेपर्यंत गेल्यावर आमच्या लक्षात येते मूळ धर्मसंस्काराची पाळेमुळे आम्ही आमच्याच मनातून उखडून टाकू शकलेलो नाहीत. लौकिक अर्थाने हा आमचा ‘पराभव’ समजायला हरकत नाही. नाहीतरी वाचक म्हणून तुमची फसगत करीतच आम्ही आमचे लेखन तुमच्यासमोर मांडलेले असते. तर मुळात आस्तिक म्हणजे दैववाद मानणारा आणि नास्तिक म्हणजे दैववादाला झुगारून देणारा अशीच सर्वसाधारण वर्गवारी विपर्यासातून केली जाते. यातला ‘आस्तिक’वाद हा तुमच्या जन्मापासूनच तुमच्या गर्भनाळेला चिटकूनच आलेला असतो. वरकरणी आपण त्याला धर्मसंस्कार असं म्हणतो. या सृष्टीचा एक निर्माता आहे. तो सर्वशक्तिमान असा ‘ईश्वर’ आहे हा संस्कार तुमच्या आचरणात बिंबविणारा आस्तिकवाद अशी आपण सरळसोट समजेल अशी व्याख्या करू शकतो. मग आस्तिकवाद हा तुमच्या जन्मापासूनच तुमच्या सोबत तुमच्या मनात एक अवयव, इंद्रिय म्हणूनच आलेला आहे. नास्तिकवाद ही आस्तिकतेच्या विरोधातील बाह्य स्वरूपातील विचारधारा आहे. ती जन्मजातच तुमच्या सोबत येत नसते. म्हणूनच माणूस हा नास्तिक बनविला जातो….तो मुळात अस्तिकच असतो..! हे केलेले माझे विधान तुम्हाला पटू शकेल.

तर माझ्या सुधारणावादी विचारांना फाट्यावर मारत मीच आस्तिकवादी…. यात्रा म्हणता येणार नाही तर आधुनिक विचारानुसार ‘टूर’ करण्याला एक निमित्त घडले. तसं मी मागे खूप वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः १९९६-९७ साल असावे. माझे मित्र आता ते वकिली व्यवसायात आहेत. त्यांनी त्यावेळी नवीन मोटारसायकल खरेदी केली म्हणून राईड म्हणून आम्ही चक्क सोलापूर ते तिरुपती असे जवळपास १८०० किलोमीटरचे तीर्थाटन केवळ थ्रिल म्हणून केले होते. अर्थात त्यावेळी वकिलसाहेबांचा दैववादावर गाढा विश्वास होता. त्यावेळी नागार्जुनच्या जंगलात विरप्पनचा थयथयाट सुरू होता. त्यामुळे सुरसुरी सुटलेल्या माझ्यातल्या पत्रकाराला हे थ्रिल अनुभवायचे होते. तिरुपतीचे ते दर्शन माझ्यातल्या नास्तिकतेने केवळ थ्रिल म्हणूनच अनुभवले होते. त्यानंतर बऱ्याचशा मित्रांच्या आग्रहाखातर मी जवळपासच्या अनेक मंदिरांना भेटी दिल्यात. पण आस्तिक-नास्तिकचा प्रश्न माझ्या डोक्यात कधी आला नाही. आता मात्र वातावरण खूप बदलले आहे. तुमच्याच धर्मातील रूढी-परंपरांना तुम्ही विरोध केला की एक विचारधारा तुम्हाला ‘पुरोगामी’ समजते तर तुमचे समाजबांधव तुम्हाला ‘नास्तिक’ समजतात. तर माझ्या पिढीतील अनेक पत्रकार-लेखक मंडळींची हीच खरी ‘गोची’ झाली आहे. सध्या अधिकमास (धोंड्याचा महिना) सुरू आहे. या पुण्यपर्वाचे निमित्त साधून शनिवारी कमला एकादशी असल्याने मित्रवर्य रणधीर अभ्यंकर आणि जुळे सोलापुरातील दत्त मंदिराचे पुजारी अनंत पुजारी, मलकारप्पा हंजगी या सहकाऱ्यांनी गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती स्थापित दत्तात्रेयाच्या ‘निर्गुण’ पादुकांच्या दर्शनाचा योग जुळवून आणला. पुन्हा तेच….सध्या पाऊस धुमशान पडतोय…अशा वातावरणात घराबाहेर पडायला मिळतेय, शिवाय अमरजा-भीमा नदीच्या संगमावर जायला मिळतंय म्हंटल्यावर माझ्यात दडलेल्या ‘आस्तिकतेने’ उसळी मारली. कर्नाटक राज्यात असलेले गाणगापूर हे सोलापूर पासून अवघ्या शंभर-सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. आता दळणवळणाची एव्हढी साधने असतानाही माझ्यासारखा मुशाफिरी करणारा माणूस गेल्या २८ वर्षात दुसऱ्यांदा जात आहे ही नवलाई माझ्या चेहऱ्यावर उसळी मारत होती.


भल्या पहाटे उठून स्नानादी विधी उरकून कारने निर्विघ्नपणे गाणगापूरला पोहोचताच ‘ही तर दत्त महाराजांची कृपा’ अशी भावना सहकारी व्यक्त करीत होते. त्यावेळी माझ्यातला आस्तिकवाद जरासा देखील चाळवला नव्हता. त्यांचं जे काही चाललंय ते चालू द्या….आपल्याला काय त्याचे..? असाच अविर्भाव माझ्या चेहऱ्यावर होता. निर्गुण पादुकांचे दर्शन घेतल्यावर रुद्राभिषेकाचा विधी पूर्ण केला. मंदिरात उसळलेल्या गर्दीच्या चेहऱ्यावरून उसळणारा भक्तिभाव देखील माझ्यातील आस्तिकतेला जाग आणू शकला नाही. मात्र अमरजा-भीमा नदीच्या संगमावर हजारोच्या संख्येने दत्तभक्त पारायण-सप्ताह करताना दिसली तेंव्हा मात्र माझ्यातील आस्तिकता चाळवली. अशी कोणती तरी द्वैत-अद्वैत शक्ती आहे जी या लोकांना तहान-भूक विसरायला लावून नामस्मरणासाठी संगमावर एकत्रित ठेवतेय याची पहिल्यांदा जाणीव झाली. प्रवासावरून परतताना साऱ्या रस्त्याने याच विचाराने माझ्या डोक्यात थैमान घातले. अश्या शक्तीचे अस्तित्व मान्य करणे म्हणजेच आस्तिकता असावी का ? मग ती तर माझ्यात जन्मापासून आहे. मग तिचे प्रकटीकरण व्हायला एव्हढी वर्षे गेली का ? मग मी कोण आहे …..आस्तिक की नास्तिक..? मग माझ्यातल्या सुधारणावादी पुरोगामी विचारधारेचं काय करायचं ? की मी दैववादाला शरण गेलो असं समजायचं ? कारण माझ्याच धर्मातल्या भोंदूगिरीवर मी लिखाण केले तर मी माझ्या समाजबांधवांच्या नजरेत ‘नास्तिक’ आणि इतर समाजाच्या नजरेत ‘पुरोगामी’ असतो. शेवटी आस्तिकतेला विरोध करणारी नास्तिकता बुद्धिभ्रंश होईपर्यंत जपणे म्हणजे पण आस्तिकताच आहे ना…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा