मध्यमवर्गीयांचे आजचे उद्दिष्ट्य म्हणजे उद्याची बचत

‘Goal day’ means nothing but tomorrow’s ‘Saving day’. Because in the paralance of the middle-class, savings means money leftover after spending everything. So today was happy but what about tomorrow ? This question is bothering me everyday.

थोडक्यात काय तर…’बचतीचा दिवस’ म्हणजे दुसरं काही नसतं, तर तो असतो उद्याचा ‘उद्दीष्ठांचा दिवस’. कारण मध्यमवर्गीयांच्या भाषेत बचत म्हणजे सर्व खर्च करून शिल्लक राहिलेले धन. त्यामुळे आजचा दिवस आनंदात गेला पण उद्याचे काय ? हा प्रश्न रोजच सतावत राहतो.

कोणत्याही लोकशाहीवादी देशाचं अर्थकारण आणि अर्थनीती ही आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीयांच्या विकासासाठी आखलेली असते. दरवर्षी सरकारचा सादर होणारा अर्थसंकल्प हा मध्यम आणि दुर्बल घटकांना केंद्रस्थानी ठेवूनच तयार केलेला दिसतो. मात्र तो अंमलात आणताना त्यांचा नसतो. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात गरीब आणि मध्यम वर्ग आजवर तरी श्रीमंत झालेला दिसत नाही. त्यामुळे ‘बचत’ करणारा वर्ग म्हणून त्याच्याकडे पाहणे चुकीचे आहे. मुळातच ‘बचती’ची व्याख्या लोकशाहीवादी देशातील अर्थतज्ज्ञांनी आपल्या सोयीप्रमाणे बदलली आहे. ‘शिलकीत राहणारे धन’ हीच जर बचतीची खरी व्याख्या असेल तर रोजच्या जगण्याला पुरेल एव्हढेही धन न कमावणारा गरीब आणि मध्यमवर्गीय नोकरदार वर्ग या व्याख्येत कसा काय बसू शकेल ? बरं जो नोकरदारवर्ग किमान वेतन कमावत असेल त्याची रोजच्या खर्चाचा ताळमेळ घालताना ‘शिल्लक’ बाजूला पडत नाही. त्याला जर बचत करावीशी वाटत असेल तर त्याला रोजच्या खर्चाला कात्री लावूनच ‘बचत’ करता येते. रोजच्या खर्चाला कात्री न लावता ‘बचत’ करायची असेल तर उद्याच्या कमाईचे त्याला नवे ‘target’ ठेवावे लागेल. म्हणजेच त्याला आजचा ‘saving day’ साजरा करणे म्हणजे त्याच्यासाठी तो उद्याचा ‘goal day’ असणार आहे. आज स्वप्नांना मुरड घालून वाचविलेला पैसा जर ‘बचत’ असेल तर उद्या पुन्हा हेच करावे लागणार..…हा क्रम जर तुम्हाला सुस्थितीत आणायचा असेल तर निश्चितच तुमच्या जीवनपद्धतीतून बदल करावे लागतील किंवा तुमचे रोजचे उत्पन्न वाढविण्यासाठी तुम्हाला तुमचे उद्याचे कमाईचे उद्दिष्ट्य वाढवावे लागेल.

तुम्ही बऱ्यापैकी कमाई करत असाल म्हणजेच ‘खाऊन-पिऊन’ सुखी असाल तर तुम्ही नियोजनबद्ध ‘चैन’ करू शकाल. त्यातही ऐनवेळी परिस्थितीनुसार चैनीत कपात करत उद्याची बचत म्हणून तुम्ही नियोजित खर्चात कपात झाल्याचा आनंद मिळवू शकाल. समजा तुम्ही आणि तुमचे मित्र खूप दिवसांनी भेटलात म्हणून सहभोजनाला जात असाल तर निश्चितच हॉटेलच्या होणाऱ्या बिलाबद्दल तुम्ही सतर्क असता. ताबडतोब मनात तयार होणाऱ्या ‘बजेट’ नुसारच तुम्ही सहभोजनातील पदार्थ तुम्ही ठरवाल. खावू वाटणाऱ्या पदार्थांपेक्षा एकतर तुम्ही बजेटमध्ये येणाऱ्या पदार्थांचीच तुम्ही ऑर्डर कराल. त्यातूनही शिल्लक राहिलेले पदार्थ तुम्ही पार्सल बांधून द्यायला वेटरला सांगाल.. यामध्ये पदार्थांची नासाडी हा विषय वरकरणी असतो. खरे तर आपल्याला भराव्या लागणाऱ्या बिलावर सवलत न मिळाल्याने खर्चाची पुरती वसुली या नियमाखाली आपण ते पार्सल आपल्या सोबत नेत असतो. म्हणजेच आपण काटकसरीने नियोजनबद्ध चैन करत असतो. आजच हा अर्थ नियोजनाचा विषय कश्यासाठी ? असा तुमच्या मनात प्रश्न चमकून गेला असेल. कारण कालच म्हणजे १५ ऑगस्टरोजी ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्षे पूर्ण झालीत तरीही आपण अजून किमानवेतन या प्रश्नाची सोडवणूक करू शकलेलो नाहीत.

गरीब-मध्यमवर्गीय नोकरदाराची महागाई ही सकाळी भाजीमंडई पासूनच सुरू होत असते. भाजीविक्रेत्याला पाच रुपये कमी देवून भाजीची पेंढी बळजबरीने पिशवीत कोंबण्यामध्ये त्याला ‘बचती’चे सोल्युशन दिसत असते. त्याच्यासाठी भाजीविक्रेत्याने सांगितलेला भाजीचा भाव हीच रोज वाढणारी ‘महागाई’ असते. दुकानात कोणत्याही वस्तूची खरेदी करताना दुकानदाराला ‘देने का भाव बोलो’ असं विचारणारा मध्यमवर्गीय नोकरदार हा त्याच्या गोतावळ्यात ‘अर्थतज्ज्ञ’ समजल्या जात असतो. रोज महागाईवरून सरकारला घरात बसून शिव्या घालणारा आणि उद्याची तजवीज करण्यासाठी ऑफिसमधून येताना मित्रांकडे शे-पाचशेची उधारी करणारा नोकरदार स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी झगडणारा ‘फ्रीडम फायटर’ समजल्या जात असतो. कारण ज्यांच्या हातात गाडीचे ‘स्टेअरिंग’ नसते असे प्रवासी खिडकीतून वेगाने मागे पडणाऱ्या झाडांची संख्या मोजत डोळ्यावर पेंग येईपर्यंत स्वप्नरंजन करीत असतात. त्यांच्याजवळ प्रवासाचे अंतर कापण्याचे तेव्हढेच साधन असते. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या ‘Saving day’ आणि ‘Goal day’ चे शास्त्र हेच तर सांगते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

2

)

  1. gosavimanik123

    👌👌🙏🙏

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      🙏🙏🙏

      Like