जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं…!

In the end, what destiny has in mind happens. We are just puppets in her hands. See how desperate and weak a man who thinks he is all powerful is. Just as birth is not in his hand, death is not in his hand, life in this age is also not in his hand. Despite all this, he considers himself as the guardian of this creation.

शेवटी नियतीच्या मनात जे आहे तेच घडते. आपण केवळ तिच्या हातचे बाहुले आहोत. सर्वशक्तिमान समजणारा माणूस किती हतबल आणि कमकुवत असतो बघा, जसा जन्म त्याच्या हातात नाही, मृत्यू देखील हातात नाही, याकाळातील जगणे देखील त्याच्या हातात नाही. एव्हढे सगळे असतानाही तो मात्र स्वतःला या सृष्टीचा पालनकर्ता समजत असतो.

माणसाच्या जागेपणी किंवा तो निद्रिस्त अवस्थेत असताना नियती मात्र तिच्या नियोजित वेळेप्रमाणे आपले ‘कार्य’ करीत असते. माणसाच्या फायद्याची घटना घडली तर हा ‘दैवी चमत्कार’ किंवा ‘निसर्गाची कृपा’ म्हणत मनुष्य नियतीकडून मिळणाऱ्या ‘त्या’ लाभाचे श्रेय देखील स्वतःकडेच ओढून घेण्याच्या ‘लटपटी’ करीत असतो. ‘ हे मी केलं, ते माझ्यामुळे झालं’ या असल्या वल्गना करत तो नियतीच्याच डोक्यावर बसू पहात असतो. शेवटी ‘वर्चस्वाची’ भूक आणि ती मिटवण्यासाठी बाळगलेली राक्षसी महत्वाकांक्षा हेच माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरत असते. एव्हढा वेदनादायी आणि मरेपर्यंत स्मरणात राहील असा ‘धक्का’ नियतीने दिल्यानंतरही जागेवर येईल तो मनुष्य कसला ? तो पुन्हा-पुन्हा, वारंवार त्याच चुका करत राहतो. मग एखाद्या अघटित वेळी, काळरात्री निसर्ग आपला ‘चमत्कार’ दाखवून माणसाला जागेवर आणण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी कुठे न कुठे येणारी प्रलयंकारी नैसर्गिक आपत्ती तर माणसांच्या मुर्खपणामुळे येणारी मानवनिर्मित आपत्ती हे कश्याचे द्योतक आहे. शेवटी हे रोखण्यासाठी माणूस हतबल ठरला की मग तो आपल्या ‘इष्ट देवतांचा’ धावा करायला लागतो. पण जिथे प्रत्यक्ष परमेश्वराने देखील आपले मस्तक झुकविले त्या नियतीपुढे शरणागती पत्करायला माणसाचा मेंदू काही केल्या तयार होत नाही.

प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षाही सर्वशक्तिमान अशी एक निर्गुण-निराकार, अमूर्त आणि अतर्क्य अशी एक शक्ती आहे. त्या शक्तीला आपण प्रारब्ध, नशीब किंवा नियती असंही म्हणतो. माणसाच्या भूत, वर्तमान आणि भविष्यकाळाचे भाकीत करताना बारा ग्रहांना स्थान देणारी त्याची जीवन कुंडली भविष्यवेत्ते तयार करतात. त्यातही अदृश्य स्वरूपात तेरावा ग्रह म्हणून ‘नियती’ प्रत्येकाच्या जीवन कुंडलीत ठाण मांडून बसलेली असते. त्यामुळे प्रत्येकाच्याच आयुष्यात घडणाऱ्या अनाकलनीय, अकल्पित घटना ह्या ‘नियती’द्वारेच घडलेल्या असतात. तुम्ही तुमच्या धर्माचे आचरण करणारे नसाल, दैववादी नसाल, नास्तिक म्हणून तुम्ही स्वतःला मिरवत असाल तरीही तुमच्या जीवन कुंडलीत ‘नियती’चे अढळस्थान असतेच असते. तुम्ही नास्तिक असण्याची योजना ही नियतीनेच केलेली असते. कदाचित तुमची धर्मविरोधी भावना अधिक तीव्र असेल तर तुम्ही ‘नियती’चे अस्तित्व अमान्य करतानाच एक सर्वश्रेष्ठ अशी अगम्य ताकद म्हणून नियतीचा तुम्ही ‘magnetic power’ म्हणून स्वीकार केलेला असतो. याचाच अर्थ प्रत्येकाच्या भाषेत ‘नियती’च्या अस्तित्वाला मान्यता ही आहेच. म्हणूनच ज्याच्यावर विजय प्राप्त करून सर्वशक्तिमान बनण्यासाठी माणूस कित्येक युगांपासून धडपडतोय ती शक्ती म्हणजेच ‘नियती’. माणूस नियतीलाच आपला प्रतिस्पर्धी मानतो.

अवकाशात लाखों ग्रहतारे आहेत. अनेक सूर्यमाला आहेत. त्यापैकी एका सूर्यमालेतील पृथ्वी या ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे असं सध्यातरी आपण म्हणू शकतो. कारण इतर ग्रहमालेतील जीवसृष्टी बद्दल अजूनतरी पृथ्वीवासीयांना माहिती मिळालेली नाही. तेंव्हा परमेश्वराने, निसर्गाने आणि नियतीने आपल्याला दिलेले हे चराचर, ही सृष्टी अधिक सुदृढ, निरोगी आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे आपल्या सोबत नियती जे काही खेळ मांडत आहे ते तिच्यापुढे नतमस्तक होत स्वीकारण्यातच मानवजातीचे कल्याण आहे. म्हणूनच आपल्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट ही चांगल्या साठीच घडत असते. कधी ती आपल्या चांगल्यासाठी घडत असते, तर कधी ती इतरांच्या चांगल्यासाठी घडत असते यावर ठाम विश्वास ठेवून आपल्या ‘अतिमहत्वाकांक्षेला’ वेळीच मुरड घाला. कारण हे जीवन सुंदर आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

4

)

  1. Randhir Abhyankar

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

    Liked by 1 person

  2. jnzende

    खूप छान लेख

    Liked by 1 person

  3. gosavimanik123

    ✍️✍️👌👌💐💐

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद माणिक 🙏🙏❤️❤️

      Like