‘थॅंक्यु’ म्हणणे ही संपर्क वाढविण्याची पहिली पायरी !

After a meeting with an acquaintance or a stranger, shake hands and say a heartfelt ‘thank you’ when saying good-bye, and that person will naturally look forward to the next meeting with you. The simple word ‘thank you’ makes many difficult tasks easy for you. Everyone has experienced this at one time or another. However, we fail to say ‘thank you’ in many places in the mess.

एखाद्या परिचित किंवा अपरिचिताबरोबर झालेल्या भेटीनंतर निरोप घेताना त्याच्याशी हस्तांदोलन करीत अगदी मनापासून त्याला ‘धन्यवाद’ म्हंटले तर ती व्यक्ती तुमच्या बरोबर पुढच्या भेटीसाठी स्वतःहून उत्सुक असते. अतिशय साधा वाटणारा ‘धन्यवाद’ हा शब्द तुमची न होणारी अनेक अवघड कामे देखील अतिशय सहजतेने पार पाडतो. याचा प्रत्येकाने कधी ना कधी अनुभव घेतलेला असतोच. तरी देखील आपण गडबडीत खूप ठिकाणी ‘धन्यवाद’ म्हणायचं राहून जातं.

परवा म्हणजे १३ ऑगस्टला आमच्या सोलापूर शहरातील बाशा पेठेत असलेल्या साने गुरुजी हॉल मध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या एका कार्यक्रमात वाहतुकी संदर्भात चालक-वाहक यांच्या अडीअडचणी संदर्भात उहापोह करण्यासाठी प्रमुख वक्ता म्हणून मला बोलण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी देखील वाहतूक करणाऱ्या चालक-मालकांनी सकाळी भेटणाऱ्या पहिल्या पॅसेंजरला ‘शुभ सकाळ’ म्हणून अभिवादन करीत त्याच्याशी संवाद सुरू करून त्याचा मोबाईल क्रमांक मिळवायचा आणि रात्री त्याला संपर्क करून आज तुमच्या भोवणीमुळे माझा व्यवसाय चांगला झाला म्हणून मनापासून ‘धन्यवाद’ जर मानले तर ती व्यक्ती प्रवासासाठी कायम तुमच्याशी संपर्क करेल. असा फंडा सांगितला. हा फंडा उपस्थित कार्यक्रमातील सर्व चालक-मालक जमावाला मनापासून आवडला. अर्थात त्याची सुरुवात केली की नाही हे या दोन-तीन दिवसात तरी माझ्या दृष्टीक्षेपात आलेले नाही. पण त्यांना माझा हा ‘फंडा’ मनापासून आवडला याबद्दल मी या आर्टिकलद्वारे त्यांचे मनापासून आभार मानतो. तर हा ताजा किस्सा सांगण्याचे कारण एव्हढेच की भेटीची सुरुवात अभिवादनाने आणि शेवट जर ‘धन्यवाद’ करून होणार असेल तर तुमचा कोणत्याही व्यक्तीशी सकारात्मक संपर्क वाढणार हे नक्की.

पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्याने बातम्यांच्या शोधार्थ माझे वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातून येणे-जाणे असायचे. (आता फ्री-लान्स रायटर म्हणून कार्यरत असल्याने बातमीदारी कायमची सुटली) तेंव्हाची म्हणजे २००४-०५ ची एक फार गमतीशीर घटना आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कार्यालयाच्या कथित भ्रष्टाचाराची बातमी मी ‘पुढारी’ दैनिकातून प्रसिद्ध केली होती. अर्थात शासकीय कार्यालयातील घोटाळे हे नेहमीच संबंधित विभागातील एखाद्या असंतुष्ट अधिकाऱ्याला गळाला लावूनच उजेडात आणता येतात. अर्थात त्या प्रकरणात त्याला काही मिळाले नसेल किंवा त्याचा तसा काही इंटरेस्ट नसेल तरच हे शक्य असायचे. तर एका दुसऱ्याच विभागातील अधिकाऱ्याकडून हे ‘इनपुट’ मला सेतू कार्यालयात बसून मिळाले होते. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकच गोंधळ उडाला. सर्वच वर्तमानपत्राचे प्रतिनिधी सावध झाले. या गडबडीत मला इनपुट पुरविणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचे आभार मानायचे राहूनच गेले होते. झालं…दुसऱ्या दिवशीपासून त्याने मला डिटेल्स द्यायला टाळाटाळ सुरू केली. त्याऐवजी त्याने दुसऱ्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना इनपुट पुरवायला सुरुवात केली. आपोआपच त्या कथित भ्रष्टाचाराचा सर्वात अगोदर भांडाफोड करणारा मी पुढच्या वार्तांकनात मागे पडायला लागलो. त्यामुळे नंतर अनेकांनी त्या घोटाळ्याच्या उघडकीस आणण्यावर आपले शिक्कामोर्तब केले. केवळ इनपुट देणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याला थॅंक्यु म्हणायचे राहून गेल्याचा हा फटका मला करिअरमध्ये खूप काही शिकवून गेला.

ज्या कामाला अधिक रक्कम मोजावी लागते किंवा समोरच्याची मखलाशी करावी लागते अशी कामे सुद्धा नुसत्या ‘थॅंक्यु’ने होवून जातात. म्हणाल तर हा नुसता ‘शिष्टाचार’ समजा किंवा तुम्ही याबाबत फारच गंभीर असाल तर तुम्ही याला तुमचा पी.आर.(public relation) वाढविण्याचा जालीम उपाय समजा. पण ‘आभार’ किंवा ‘थॅंक्यु’ म्हणायला अजिबात विसरू नकात. हवं तर सवय होईपर्यंत शाळकरी मुलांसारखं घोकंपट्टी करून चक्क मुखोद्गत करा. जो कोणी भेटेल मग तो महत्वाचा नसला तरीही त्याचे आभार माना. कारण हा शब्द तुमच्या जिभेवर रुळल्याने भविष्यात तुमचा संपर्क वाढल्याचे तुमच्या लक्षात येईल. अर्थात आता मोबाईलचा जमाना आहे. अगदी मध्यरात्री उशिरा दुसऱ्या दिवशीची गुड मॉर्निंगची पोस्ट व्हायरल करणारे सोशल मीडियावर अनेक बहाद्दर आहेत. पण कोणत्याही गोष्टीत वेळेला महत्व आहे. योग्यवेळी योग्य कृती झाली तरच ती फायद्याची असते. वेळेपूर्वी किंवा वेळेनंतर उशिरा त्याची प्रतिक्रिया किंवा आभार मानणे म्हणजे तुम्ही तुमचा उथळपणा दाखविल्या सारखेच असते. एकदम मध्यरात्री किंवा सकाळी दहा वाजता ‘गुड मॉर्निंग’ ची पोस्ट व्हायरल केल्यावर त्याला व्ह्यूज मिळायच्या ऐवजी दुर्लक्ष केल्या जाईल किंवा तुम्हाला ब्लॉक देखील केल्या जावू शकते. शेवटी दुसऱ्याला त्रासदायक ठरणारा ‘शिष्टाचार’ दाखविणे म्हणजे स्वतःलाच ‘आयसोलेट’ केल्यासारखं होईल. बाकी हे आर्टिकल शेवटच्या ओळीपर्यंत वाचल्याबद्दल आणि लाईक व कमेंट केल्याबद्दल तुम्हाला खूप दिलसे ‘थॅंक्यु’ बरं का…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

6

)

  1. gosavimanik123

    ” धन्यवाद ” ✍️✍️👌👌

    Liked by 1 person

  2. Rupali

    Lahan watnari mothi goshta. hi goshta khare tar lahan vaya pasoon shikvayla havi.

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      आपण स्वतःला इतकं आकसून घेतोय की, जगण्यासाठी सोबतीची पण गरज भासू नये. तिथं लोकसंपर्क वाढविणे ही कला आपल्याला शिकावीच लागणार आहे. पाश्चात्यांना आकर्षित करणारे भारतीय संस्कार आता पुन्हा रुजविण्याची हीच तर वेळ आहे.

      Liked by 1 person

      1. Rupali

        “पाश्चात्यांना आकर्षित करणारे भारतीय संस्कार “?

        Like

  3. jnzende

    मस्त लीहलय, thank you!

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      🙏🏼🙏🏼🙏🏼

      Like