It’s been almost a decade since we fell so in love with the ‘corporate’ culture that we are now trying to bring this culture that has proven it’s usefulness in the work place in to our personal lives as well. But if we leave this ‘corporate’ culture that exposes our hidden qualities, our efficiency in front of us, can we alone achieve our goals ?
जवळपास एक दशक झालं असेल आपण ‘कार्पोरेट’ कल्चरच्या एव्हढे प्रेमात पडलो आहोत की, कामकाजाच्या ठिकाणी आपली उपयुक्तता सिद्ध करणारे हे कल्चर आपण आता आपल्या व्यक्तिगत जीवनातही आणू पहात आहोत. मात्र आपल्यातील सुप्त गुण, आपली कार्यक्षमता आपल्यासमोर उघड करणारे हे ‘कार्पोरेट’ कल्चर सोडून आपण बाहेर पडलो तर आपण एकट्याने आपली उद्दिष्ट्ये साध्य करू शकतो का ?

कंपनी ‘टार्गेट’ साठी खूप प्रेशराईज करते. आपल्या टीमकडून ठरलेले ‘टार्गेट’ पूर्ण करून घेण्यासाठी तेव्हढेच त्यांच्यावर कामाचे ‘प्रेशर’ ठेवावे लागते. हे कार्पोरेट कंपन्यांचे टेक्निक आहे. या स्थितीत जास्त काळ हा ‘ताण’ सहन न करू शकणारे सहकारी लवकर मानसिक तणावाखाली येतात. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या दैनंदिन कामातून दिसू लागतो. अर्थात त्यांना प्रोत्साहित (मोटिव्हेट) करण्यासाठी रोज सकाळी स्माईली मिटिंग घेणे, कधी गेटटूगेदर च्या माध्यमातून पार्टी देवून ‘रिलॅक्स’ करण्याचा देखील प्रयत्न केला जातो. सॅलरी व्यतिरिक्त इनसेंटिव्ह, गिफ्ट, बर्थ डे सेलिब्रेशन, प्रमोशन अशी उत्साहित करणारी आमिषे दिली जातात. पण टार्गेट अचिव्हमेंटच्या ग्राफमध्ये ते कुठंतरी मागे पडलेले दिसतात. अशावेळी अचिव्हमेंटच्या बडग्याखाली एखादा एम्प्लॉई चिरडला जावू शकतो. या शक्यतेचा विचार केल्याने बॉसवरील तणाव अधिक वाढतो. ही ‘व्यथा’ तशी म्हणाल तर ‘कॉमन’च आहे. कोणत्याही कार्पोरेट कंपनीतील ‘बॉस’ची ही व्यथा कमी-अधिक प्रमाणात सारखीच असते. आपण कितीही ‘वर्कोहोलिक’ असलो तरी आपल्याला असिस्ट करणारे आपले कलीग ‘वर्कोहोलिक’ असतीलच असे नाही. बरं ही गोष्ट कार्पोरेट सिस्टिममधील जो सुप्रीमो असतो त्याच्या लक्षात येत नसते का ? तर याचे उत्तर अर्थातच ‘होय’ असेच असते. पण तुमच्याकडून ‘दि बेस्ट’ असं कौशल्य बाहेर काढून त्याचा क्रयशक्ती म्हणून कंपनीसाठी उपयोग करून घ्यायचे काम सुप्रीमोचे असते. पदांच्या आणि कामाच्या उतरंडी प्रमाणे हे ‘प्रेशर’ वरपासून खालीपर्यंत वाढत जात असते.

आपल्या अगोदरच्या तीन पिढ्या ह्या मालकशाहीमध्ये आणि सहकारशाहीमध्ये काम करत होत्या. यामध्ये मालकशाही पेक्षा सहकारशाही जास्त आरामदायी आणि सुरक्षित वाटणारी अशीच आहे. किमान वेतन, सुट्ट्या, रजा, भत्ते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सेवेची हमी देणारी सहकारशाही लोकांना कामात देखील मुक्त स्वातंत्र्य देणारी ठरली. मग आता कार्पोरेटची एकाधिकारशाही का आवडू लागली ? एकतर गुणवत्ता मिळविणाऱ्या शिक्षित होतकरूंना नुसताच रोजगार मिळाला नाही तर अपेक्षेपेक्षा अधिक वेतन (पॅकेज), अन्य सुविधांसह आत्मसन्मान वाढविणारे कल्चर नव्या पिढीला खुणावू लागले. मालकशाही आणि सहकारशाही मध्ये उत्पादनाचे निश्चित ‘उद्दिष्ट्य’ आणि त्यासाठीचे व्यवस्थापन नसल्याने निवृत्तीपर्यंत नोकरी केल्यानंतरही आयुष्याच्या स्वप्नपूर्तीचा आनंद मिळविणे जरा कठीणच होते. कारण वेतनवाढीसाठी संप, आंदोलने केल्यानंतरही मिळणारी वेतनवाढ ही स्वप्नपूर्ती करणारी ठरत नव्हती. ‘सब घोडे बारा टके’ या न्यायामुळे गुणवत्ताधारकाची कुचंबणा होत होती. मात्र याच गुणवत्ताधारक वर्गाला कार्पोरेटशाहीमध्ये वाव मिळतोय हे नाकारता येत नाही. म्हणूनच कार्पोरेट कल्चरबद्दल आकर्षण वाढत गेले.

आता नोकरी करताना उंची राहणीमान, गतिमानता, ड्रेसकोड, पॅकेज म्हणजेच कार्पोरेट कल्चर आहे का ? तर याचे उत्तर नक्कीच ‘नाही’ असं आहे. तुमचे कौशल्य पणाला लावून जगाच्या बाजारपेठेत स्पर्धा करणारे कार्पोरेट कल्चर तुमच्यातील सुप्तगुण बाहेर काढून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतानाच आपल्या उत्पादनातून नफा कमावत असते. तुमचे सुप्तगुण फुलविताना ते ‘तणाव’ व्यवस्थापनाचा उष्मा देतात. याच देखील एक नैसर्गिक कारण आहे, समोर ‘उद्दिष्ट्य’ ठरवून पाठलाग केला नाही तर वाघाला देखील आपली ‘शिकार’ मिळत नसते. एकदा का तुम्हाला उद्दीष्ठांचा पाठलाग करायची सवय लागली की तुम्ही ‘वाघ’ बनलाच म्हणून समजा…हीच कार्पोरेट फिलॉसॉफी आहे. आता सर्वात महत्वाचे म्हणजे ही कार्पोरेट फिलॉसॉफी आत्मसात केल्यानंतर कॉर्पोरेट कल्चर सोडून बाहेर पडणारे यशस्वी होतात का ? तर त्याचे उत्तर बहुतांश लोक यशस्वी होत नाहीत असेच आहे. याचं कारण काय असावे…? कारण स्पष्ट आहे, उद्दीष्ठांचा पाठलाग करण्यासाठी सतत प्रवृत्त करणारी एक यंत्रणा कार्पोरेट कल्चरमध्ये अस्तित्वात असते. ती नुसतीच ‘प्रेशर’ देत नाही तर ती वेगवेगळ्या कन्सेप्ट पुरवीत असते. तीच या यशस्वितेचे ‘गमक’ आहे. जिला परवलीच्या भाषेत सतत ‘प्रेशर’ देणारी यंत्रणा असं आपण म्हणतो. घोड्याच्या तोंडाला ‘तोबरा’ बांधल्याशिवाय घोडा देखील पळत नसतो. अगदी तसेच कार्पोरेट कल्चरमधून बाहेर पडून प्रेशर शिवाय उद्दिष्ट्य गाठू पाहणाऱ्याची अवस्था ससा आणि कासवाच्या गोष्टीतील सश्या सारखी होते. कार्पोरेट कल्चरच्या लागलेल्या सवयीप्रमाणे तो अर्धे अंतर वेगाने पळतो पण पुढे निवांत होतो….कारण सर्वात पुढे सतत राहण्याचे ‘प्रेशर’ देणारी यंत्रणा आता त्याच्या पाठीशी नसते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा