What do you enjoy most about writing?
लिखाणाला सुरुवात करून जवळपास तीस वर्षांचा काळ लोटलाय. वृत्तपत्र क्षेत्रात बातमीदार म्हणून सुरुवात करण्यापूर्वीही महाविद्यालयीन जीवनात अगदी निबंधलेखन, भित्तीपत्रकाचे लेखन करत हळूहळू वयाचा परिणाम म्हणून कवितांची बुंदी (आत्ता मी त्याला सुमार दर्जाच्या असं म्हणू शकतो) पाडणारा ‘शीघ्र कवी’ बनण्यासाठी धडपडणारा अस्मादिक (म्हणजे मीच हो!) मित्रांसाठी एकांकिका लिहायला लागलो. मला वाटतं युवा अवस्थेतील भारावलेल्या ‘नाट्य प्रेमा’मुळेच मी लिहिता झालो. आता तीस वर्षानंतर रोज ब्लॉगवरचे लिखाण, सोशल मीडियावर केलेले लिखाण, वृत्तपत्रातील लिखाण वाचले की कुणी ना कुणी विचारतोच… “तुम्हाला लिखाणात सर्वात जास्त काय आवडते ?” तरी बरं प्रकट मुलाखत वगैरे देण्या इतपत ‘बन चुका’ झालो नाही…..पण पत्रकारितेमुळे सतत माणसात मिसळण्याचा योग येत असल्याने कदाचित कळत नकळत होणाऱ्या सलगी पोटी मला विचारत असतील. प्रत्येकवेळी वेगवेगळी उत्तरे देत स्वतःची सुटका करून घ्यायचो. कारण मलाच अजून कळलं नव्हतं….मला लिखाणात सर्वात जास्त काय आवडतं ?

वृत्तपत्राची नोकरी सुरु केली तेंव्हापासून बातमीच्या स्वरूपात लेखनाचा एक वेगळा प्रकार शिकायला मिळाला. त्या अगोदर साधारण पाच एक वर्षे अगोदरच एकांकिका लेखन सुरू केलेलं होतं. १९८५-८६ च्या सुमारास. नाट्यबीज असेल असं कथानक तयार करायचं, मग त्या कथानकाला संवादाच्या साखळीत गुंफत जायचं. पुढे पहिल्यांदा १९९५ मध्ये दोन अंकी नाटक लिहिले. पण परकाया प्रवेश करणारे ‘नाटक’ हे माध्यम तोपर्यंत अंगात चांगलेच भिनलेले होते. केवळ लेखन काम करायला मिळते म्हणून ‘पोटार्थी’ पत्रकार झालो होतो. पण तिथेही आवडीने मुशाफिरी केली. कारण ‘घटना तिथं नाट्य’ हे सूत्र घेऊन लिहिणारा…त्यात घटना सांगणे म्हणजेच बातमी…त्यामुळे तर या क्षेत्रात आलो. दिवसभर बातम्यांच्या शोधात फिरताना निरनिराळ्या क्षेत्रातील, स्तरातील, वेगवेगळ्या स्वभावाची, लकबीची माणसं भेटत गेली. पत्रकारिता करताना मला काय मिळालं…? तर नाट्य बीजांचा खजिना…’कहानी में ट्विस्ट’ हा तर बातमीचा गर्भ….बातमीच्या गर्भातच मला नाट्य बीज मिळायला लागले…त्यामुळे इथेच रमलो. पगार किती मिळतोय यापेक्षा आवडीचे काम मिळतंय हाच अव्यवहारी नाट्यधर्म नोकरीतही जपला. आपल्या बरोबरीचे सहकारी तसेच काही मागाहून पुढे जाणारे कधी ‘वरिष्ठ पत्रकार’ झाले कळलेच नाही. मी मात्र एकाच ठिकाणी वयोमान परत्वे नुसताच ‘ज्येष्ठ’ झालो.

रोज मिळणारे नवे विषय अन त्यावर लिहायला मिळणारी नवी संधी, हेच माझे उद्दिष्ट्य बनले. संपर्कात येणारे सगळे नवागत कुतूहलापोटी विचारतात… कोणत्याही विषयावर एव्हढं लिहायला कसं जमतं हो तुम्हाला ? पोटाची क्षुधाशांती करण्याची बेगमी झाली की मग उरतं काय ? फक्त लेखन अन लेखन. जश्या बातम्या, स्फुट, लेख हे प्रकार वेगवेगळ्या ‘जॉनर’चे तसेच एकांकिका अन नाट्य लेखनाचे. जेंव्हा हातातला पेन गळून पडेल….थरथरते वय विस्मरणाचे नाटक सुरू करेल कदाचित त्यावेळी माझे लेखन थांबेल. आता तर ऐन भरात आहे. वर्चस्वाचा दर्प असणाऱ्या माणसांच्या, अन्यायाने पिचलेल्या माणसांच्या गोष्टी मांडत आलोय….आत्तापर्यंत संघर्षाची कथानके लिहिली…थोडे सुखांतही लिहू…एक आयुष्य थोडीच पुरणार आहे….तो ही बसलाय आकाशात एकटक पहात…. त्यालाही जन्मा-जन्माचे अंक पहायचे असतात ना ! तोच रंगमंचावर ‘मायावी दुनिया’ उभारण्याची बुद्धी देतोय….आपण त्याच्या हातचे कळसूत्री बाहुले…..बोरूबहाद्दर !!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा