एकदा तरी ‘धुमसून’ पड बाबा…!

It is rainy season now. It is a fact that it does not rain regularly. But when sudden rains fall on the soil heated by the sun, the aroma of the soil spreads everywhere. Even with body spray or perfume on your body, this earthy smell that penetrates your nose seals you in, eliminating this fake fragrance. No matter how much one is engrossed in reading the newspaper in the morning, the smell of crackling from the kitchen gives a hint of hunger, not the same feeling that this earthy aroma gives after the first rain.

सध्या पावसाळा आहे. नियमित पाऊस पडत नाही हे खरं ही आहे. पण उन्हामुळे तापलेल्या मातीवर अचानक आलेल्या पावसाच्या सरी कोसळल्या की मातीचा सुगंध सगळीकडे पसरतो. अंगावर बॉडीस्प्रे किंवा अत्तर जरी फवारलेले असले तरी देखील या नकली सुवासाला दूर सारून आपल्या नाकात घुसणारा हा मातीचा गंध आपल्याला मोहरून टाकतो. सकाळी वर्तमानपत्र वाचनात कितीही मग्न असलो तरी स्वयंपाक घरातून येणाऱ्या फोडणीच्या वासाने भुकेची एक शिरशिरी येते ना ! अगदी तीच अनुभूती पहिल्या पावसानंतर हा मातीचा सुगंध देत असतो.

पहिल्या पावसाची ही आठवण आता पावसाळा मध्यावर आल्या नंतर का बरं..? एव्हाना तर पाऊस म्हंटलं की बस्स झालं पाहिजे. त्या प्रशांत महासागरावरचा ‘अल निनो’ सगळ्या जगाला तीन वर्षातून एकदा सतावत असेल आमच्या कुंडलीत मात्र दरवर्षीचा त्या अल निनोच्या पूर्वजापासून खास जागा आरक्षित आहे. अवर्षणप्रवण भागात असाही पाऊस कमीच असतो. त्यात ‘अल निनो’ हे निमित्त. एकूणच दरवर्षी दुष्काळ सदृश्य स्थिती असते. त्यामुळे नेमका पावसाळा कधी सुरू होतो ? तर त्याचा आमच्याकडे मुहूर्त नसतो. तरी देखील संपूर्ण पावसाळ्यात एकतरी पाऊस असा पडतो ज्याला ‘पहिला पाऊस’ म्हणून अंगावर घ्यायला आसुसलेले असतो. अगदी आदल्या दिवशी मध्यरात्रीपासूनच ‘रातवा’ आपला जोर कायम ठेवतो. पहाट आणि सकाळ त्याच रिपरिपीत होते. सूर्यनारायण चक्क रजेवर गेलेला असतो. कधीतरी घालायला मिळावेत म्हणून टुंड्रा प्रदेशातील रेनडीअरच्या कातडीपासून बनवलेल्या पायघोळ कोटासारखे लेदरचे पावसाळी जॅकेट घालून दिवसभर भटकायला मजा येते. तेव्हढेच अतिवृष्टी होणाऱ्या ‘चेरापुंजी’मध्ये फिरल्या सारखं वाटतं.

आमच्याकडे ‘पाऊस’ नाही म्हणून आम्ही संवेदनशील ‘कवी’ नाहीत असा मात्र कृपया कुणी गैरसमज करून घेवू नकात. याउलट माझा तर दावा आहे की पावसावरच्या सर्वाधिक कविता ह्या अवर्षणग्रस्त भागातील कवीच करत असतील. त्यांच्या इतकी आतुरता, पावसाबद्दलची ओढ, आकर्षण अतिवृष्टी भागातील कवींजवळ थोडीच असणार ? ते तर सततच्या पावसाच्या रिपरिपीने वैतागत असणार. एकूण काय तर कवितेसाठी आवश्यक तेव्हढं स्वप्नाळू अन उबदार वातावरण निर्माण करणारा पाऊस या तीन-चार महिन्यात येऊन जातो अधून-मधून…..कफल्लक आजोबाला नाईलाजाने भेटायला नातवाने बळजबरी आजोळी यावे तसा. बुड टेकवलं की लगेचच माझी शाळा बुडेल..माझी ट्युशन बुडेल अशी कारणे सांगून आजी-आजोबाला तोंडदेखला नमस्कार घालून परत माघारी फिरणारा शहरी नातू अन पाऊस दोघेही सारखेच. आमच्याकडे पडणारा पाऊस हा ‘शहरी नातू’ आहे…’माहेरवाशिणी’सारखा धो-धो पडणारा पाऊस आमच्या तर नशिबी नाही. कायमच ‘लक्ष्मीचा दुष्काळ’ भोगणारे आम्ही पावसाची फिर्याद चांगली मांडतो….शहरी माणसं त्याला ‘रानातल्या कविता’ म्हणतात. काही असुदे बाबा…द्वाड, वांड असला तरी एकदा तरी आजोळी धुमसून येत जा…मरताना तुझा आज्जा शेती तुझ्या नावानेच करून जाणार आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)