Every time what we see in the truth or the falsehood that creates the illusion of truth….If the real ‘truth’ comes in front of us in this confusion and if we fail to recognize it, we become the puppets of the falsehood. We go in to a different virtual world thinking that what he is saying is the ‘truth’. Although life there is dreamlike, very warm and beautiful, one has to wake up from the dream sometimes. Then it is beyond our power to accept the truth openly.
प्रत्येकवेळी आपल्याला जे दिसते तेच सत्य असते की सत्याचा आभास निर्माण करणारे ते मिथ्य असते …या गोंधळात खरेच ‘सत्य’ जर आपल्या समोर आले आणि त्याला ओळखण्यात जर आपली गल्लत झाली तर आपण असत्याच्या हातचे बाहुले बनून जातो. तो जे सांगतोय तेच ‘सत्य’ असल्याचे समजून आपण वेगळ्याच आभासी दुनियेत जातो. तिथलं जगणं स्वप्नवत असते, खूप उबदार आणि सुंदर असले तरी देखील स्वप्नातून कधीतरी जागे व्हावेच लागते. तेंव्हा उघडे-नागडे सत्य स्वीकारणे आपल्या शक्तीबाहेर असते.

सत्य-असत्याच्या या भ्रमित करणाऱ्या खेळावर भाष्य करणारी फ्रेंच तत्वज्ञ, चित्रकार जीन-लिओन गेराम याची एक लघुकथा खूप प्रसिद्ध आहे…..एकदा सत्य आणि असत्य गावाबाहेर अचानक भेटतात. दोघेही गप्पा मारत गावाबाहेरच्या विहिरीजवळ पोहोचतात. विहिरीतील शांत-नितळ पाणी पाहून दोघांनाही पोहण्याची इच्छा होते. गावाबाहेरची विहीर असल्याने आजूबाजूला माणसांची फारशी वर्दळ नसल्याने दोघांनीही नग्न होवून विहिरीत उड्या मारल्या. पोहण्याचा मनमुराद आनंद घेत असतानाच ‘असत्य’ने अचानक उडी मारून विहिरी बाहेर येत ‘सत्य’चे कपडे स्वतः घातले आणि तिथून पोबारा केला. पोहण्यात गुंग असलेल्या ‘सत्याच्या’ ही गोष्ट लक्षात आली. त्याने संतापाच्या भरात विहिरीबाहेर येत आरडाओरडा करीत नग्नावस्थेतच असत्याचा पाठलाग सुरू केला. आरडाओरडा ऐकून गावकरी पळत आले. त्यांना सत्याचे ‘नागडे’ रूप बघवले नाही. त्यांनी सत्यालाच दगड मारून गावाबाहेर माघारी पिटाळले. लोकलज्जेसाठी ‘सत्य’ विहिरीत परत उतरले आणि विहिरीतच कायमचे गडप झाले. तेंव्हापासून सत्याचे कपडे घालून असत्य राजरोसपणे फिरतो आहे. गावकरीही असत्यालाच सत्य समजून गुण्यागोविंदाने रहात आहेत. किती साधी पण दृष्टांत देणारी ही लघुकथा आहे.

आपल्यावर लहानपणापासूनच आधी आई-वडील मग गुरुजन, मार्गदर्शक, हितसंबंधी नेहमी सत्याची बाजू धरण्याचे संस्कार करतात. या संस्कारातूनच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण जग बदलण्याची भाषा करू लागतो. जगाने आपल्या सारखाच विचार केला पाहिजे त्यासाठी त्यांची विचारधारा बदलण्याची धडपड आपण सुरू करतो. पण जगाला बदलण्यात आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा आपल्यात बदल करण्याची प्रक्रिया आपण कधीच करत नाही. कारण आपण सत्याचा पेहराव घालून आलेल्या असत्यालाच आपला सोबती बनवलेले असते. त्याच्या भ्रमित जगात आपण पुरते भ्रमिष्ट झालेलो असतो. आपल्याला मनुष्य जन्म मिळाल्याचा अहंभाव असतो. त्यातच हा जन्म सार्थकी लागायचा असेल तर आपण जे काम करतोय त्यात उत्तुंग असे ‘यश’ मिळायला हवे हा हव्यास आपल्याला असत्याच्या मोहपाशात पार गुरफटून टाकत असतो. आपण असत्याच्या या मोहपाशात अडकलेले असतानाच कोणत्या तरी एका क्षणी ‘सत्य’ आपल्या समोर येवून उभे रहात असते. पण आपण त्याला स्वीकारत नाही, कारण सत्य हे नेहमी ‘नागडे’ असते…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा