Is ‘success’ and the ‘happiness’ derived from it mean happiness..? Or is there something else that goes beyond it ? So if achieving success is the path to happiness then what is the use of this happiness…? Because to achieve success every moment is to establish ‘dominance’ through struggle. So will it be possible to take the success that has been established throughout life as my own and take it with me after death ? Tell me what exactly is happiness..?
मिळालेलं ‘यश’ आणि त्यापासून मिळणारा ‘आनंद’ म्हणजेच सुख असतं का ? की त्याच्याही पुढे जाऊन वेगळं काही असतं ? मग जर यश मिळवणे हाच सुखाचा मार्ग असेल तर हे सुख काय कामाचं..? कारण प्रत्येक क्षणाला यश मिळवायचं म्हणजे संघर्षातून ‘वर्चस्व’ प्रस्थापित करायचं. मग आयुष्यभर माझं-माझं म्हणून वर्चस्व प्रस्थापित केलेलं यश मिळवून मृत्यूनंतर ते आपल्यासोबत घेवून जाता येणार आहे का ? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं..?

माणसाचं आयुष्यच दुःख, सुख, आनंद आणि समाधान या गोष्टींभोवतीच सारखं घुटमळत असतं. थोडक्यात आपण याला एका अर्थाने माणसांचे ‘विकार’ पण म्हणू शकतो. कारण या चारही गोष्टी वगळल्या तर माणूस निर्विकार, स्थितप्रज्ञ अवस्थेत पोहोचेल अन ही अवस्था तर एखाद्या तपस्वीलाच प्राप्त होवू शकते. आध्यात्मिक विचारांच्या माणसाला विरक्तीची ही स्थितप्रज्ञ अवस्था कदाचित ‘सुखदायी’ वाटू शकते. मुळातच सुख ही शोधण्याची गोष्ट नाही तर ती मानण्याची गोष्ट आहे. स्मशानात देखील सुख शोधणारे ‘मसणजोगी’ असतातच ना ! आपण हव्यासाच्या, मोहाच्या आधीन गेलो नाही तर नक्कीच आपण सुखी होवू शकतो….आता तुम्ही म्हणाल, हे तर आम्हाला कळतं… नवीन काय आहे का सांगण्यासारखं..? नाही हो..! मी तरी कुठं अध्यात्मिक गुरू, मेंटर आहे. नवीन काहीच नाही…तेच सगळं…आपल्याला कळतं, पण….वळत नाही. काय ‘गोची’ असते बघा.. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडीची आधीच ‘चाहूल’ लागलेली असते. त्याकडे तो दुर्लक्ष करत असतो, कारण त्यावेळी तो काही तरी मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचलेला असतो. हा हव्यासच त्याला घडू पाहणाऱ्या घडामोडीच्या चाहुलीकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत असतो. मग त्याला अशा गोष्टींची वारंवार आठवण करून द्यायला एका ‘अध्यात्मिक’ गुरुची गरज भासत असते. आपल्याला माहीत असलेलीच गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगणारा दुसरा कुणीतरी विश्वासू माणूस लागतोच. एकदा का आपल्याला चाहूल आणि तिचे संकेत कळायला लागले की मग दुःख बाजूला सारून सुख, आनंद आणि समाधानाला आपण कवटाळतो. मग यालाच सुख म्हणायचं का ? सुख म्हणजे नक्की काय असतं..?

माझा एक नाट्य कलावंत मित्र आहे, म्हणजे सहकारी कलावंत आहे असं समजा. स्पर्धेतून माझ्या बऱ्याच एकांकिका, दोन अंकी नाटके पठ्ठ्याने खणखणीत वाजविली आहेत, पारितोषिके पटकावली आहेत. व्यक्तिगत जीवनात दत्तउपासक म्हणून सदा समाधानी राहणारा, पण कलावंत आहे म्हणल्यावर भावनेचा अन भूमिकांचा भुकेला असणारच. तर गेल्या दोन-तीन वर्षात त्याच्यावर संकटांची अक्षरशः मालिकाच सुरू होती. आधी त्याचं हॉस्पिटलायझेशन झालं, मग कोरोना काळात दोनदा हॉस्पिटल, त्याच्या आईचा मृत्यूचे सगळं एका मागोमाग सुरूच. त्यातच त्याला एका छोट्याशा कारणावरून डावा पाय गुडघ्याच्या खालून गमवावा लागला. पण हा पठ्ठ्या तशाही अवस्थेत जगातला सगळा आनंदाचा ठेवा एकवटून संकटाशी मुकाबला करीत कृत्रिम पायाच्या मदतीने अवघ्या चार महिन्यात पुन्हा उभारला…पुन्हा माझ्या मानगुटावर बसून स्पर्धेसाठी नवीन नाटक लिहून घेतलं. याला म्हणायचं सुखाची दुर्दम्य इच्छाशक्ती..!

शेवटी काय ? तर यश मिळविण्याचे प्रयत्न आणि त्यातून मिळणारे सुख यासाठी एक निरंतर वाढत जाणारी आंतरिक ऊर्जा हवी अन ही ऊर्जा तयार होते ती एकाग्रतेतून….मनःशांती मधून. इंद्रियांना एका विशिष्ट बिंदूंवर आणून स्थितप्रज्ञ करायचं…मग शरीरात तयार होणाऱ्या निरव पोकळीत घुमतो तो फक्त तुमच्या ईप्सित ध्येयाचा हुंकार….हा हुंकारच तुम्हाला तुमच्या यशाकडे घेऊन जातो. ही एकाग्रता….हा हुंकार तुम्हाला अगदी काही क्षण का होईना ऐकायला मिळतो… त्यासाठी कुणी नदीत उठणाऱ्या पाण्याच्या तरंगाकडे एकटक पहात राहतो, कुणी समुद्राच्या लाटांच्या गाजामध्ये तो हुंकार शोधतो, कुणी मंदिराच्या गर्भगृहात, कुणी प्रार्थनास्थळात, कुणी चर्चच्या घंटानादात , कुणी सरोवर, जलाशय, तलावात उठणाऱ्या हलक्याशा तरंगातून हा सुखाचा हुंकार अनुभवत असतो. मग मला सांगा, तुम्हाला काय वाटतं..? सुख म्हणजे नक्की काय असतं. श्रीरंग गोडबोलेंच्या गीता सारखं आणि गायक-अभिनेता प्रशांत दामलेंच्या गळ्यातून निघणाऱ्या अवीट स्वरांसारखं…काय पुण्य असतं की ते घरबसल्या मिळतं… मला सांगा…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा