How are you feeling right now?
In the past, a question that was rarely asked was ‘How are you feeling right now ?’ It seemed like a tender, intimate question. His reply was equally loving…..’Now I feel better’. But nowadays, he is asked the question everyday. But the warmth and warmth in it seems to be lost somewhere. Who knows why, the questioner seems to be asking only as a formality and the answerer is only answering as a formality. Why should it be like this…?
पूर्वी अभावाने कधीतरी विचारला जाणारा एक प्रश्न ‘आता कसं वाटतंय तुला ?’ हा ममत्व दर्शविणारा, जिव्हाळ्याचा प्रश्न वाटायचा. तितक्याच प्रेमभराने त्याचं प्रत्युत्तर देखील मिळायचं….’आता मला बरं वाटतंय’. हल्ली मात्र भेटेल त्याला रोज विचारल्या जातो हा प्रश्न. मात्र त्यातलं ममत्व आणि जिव्हाळा कुठंतरी हरवल्यासारखा वाटतो. का कुणास ठावूक, विचारणारा केवळ औपचारिकता म्हणून विचारतोय आणि उत्तर देणारा पण केवळ औपचारिकता म्हणूनच उत्तर देतोय असं वाटत राहतं. हे असं का बरं व्हावं..?

आपल्या रक्ताच्या नात्याचा नसला, फारशी जवळीकता साधलेला नसला, अगदीच तोंड ओळखीचा असला तरी भेटल्यावर चेहऱ्यावर छानसं हसू आणत आपण त्याला विचारतोच ‘कसे आहात ?’ हे विचारण्यामागे तुमची तब्येत कशी आहे ? एव्हढीच माहिती आपल्याला पुरेशी नसते. तर त्याच्या संबंधी आपल्याला अधिक जाणून घ्यायचे असते. तो देखील उत्तरादाखल आपल्याला हवी असणारी त्याच्याबद्दलची सगळी माहिती एका दमात सांगून मोकळा होत असतो. हा संवाद नेमका याच दिशेने का जात असतो..? कारण त्याला आणि आपल्याला दोघांनाही एकमेकांतील सदभावाचे नाते अधिक घट्ट करायचे असते. म्हणूनच कोणत्याही भाषेत, कोणत्याही ठिकाणी सकारात्मक संवादाची सुरुवात ‘कसे आहात ?’ याच प्रश्नाने होत असावी. एकमेकांची काळजी करणारी भावना आणि जवळीकता साधणारे संवाद असले की ‘नाती’ अधिक वेगाने घट्ट होत जातात. त्यामुळेच या सदभावनेच्या वाटेने पुढे जात असताना वेळोवेळी-क्षणोक्षणी त्या अनामिक शक्तीचे आभार मानले पाहिजे, ज्या शक्तीमुळे नात्याची वीण अधिक घट्ट होत जात असते. याबरोबरच परमेश्वराची आपण प्रार्थना देखील केली पाहिजे…..इथवरचा प्रवास तुझ्याच कृपाशीर्वादाने झाला आहे आणि आता पुढचा प्रवास देखील विनासायास घडू दे, याबरोबरच माझ्यासारखे असंख्य परिचित-अपरिचित प्रवासी यामार्गाने आपला जीवनप्रवास करीत आहेत. त्यांना तू आंतरिक सामर्थ्य दे ! स्वतःसाठी तर आपण क्षणोक्षणी प्रार्थना करत असतो. दुसऱ्यासाठी निरपेक्ष भावनेने जर आपण प्रार्थना करत असुत तर आपल्या जीवनात आनंदाची अधिक प्रमाणात उधळण परमेश्वर करणार यात शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे आपल्या प्रार्थनेत इतरांना जागा द्या.

‘नाते’ टिकविण्याची जबाबदारी ही फक्त तुमच्या एकट्याची जबाबदारी नसते. दोघांनी एकमेकाला ‘आनंद’ मिळवून देण्यासाठीच ‘नाते’ जोडलेलं असतं. त्यामुळे ते टिकविण्याची जबाबदारी दोघांची असते. स्वभाव गुणदोषामुळे जर हे नाते फारकाळ टिकणार नसेल ! तर अशा ‘बंधपाशातून’ मुक्त झालेलं केंव्हाही चांगलेच असते. उगीचच स्वाभिमान आणि स्वतःच्या आयुष्याची फरफट करण्यापेक्षा ‘त्या’ नात्याचा एकदाचा ‘सोक्षमोक्ष’ लावलेला चांगला. प्रत्येकाच्या आयुष्यात असं चुकलेलं आणि आयुष्याला चुकविणारं एखादं तरी ‘नातं’ निर्माण झालेलं असतंच. अशा नात्याला जपण्यासाठी इतर चांगल्या नात्यांना दुखावू नकात. कारण काही ‘नाती’ ही खिश्यात खुळखुळणाऱ्या ‘चिल्लर’सारखी असतात. ओझं खूप झालं की खिशाला भोक पाडून घरंगळत पडतात. तुमच्याच जवळ राहण्याचा त्यांचा उद्देश नसतो. तेंव्हा ‘कसे आहात ?’ असा प्रश्न विचारणारा हा खिशातल्या ‘चिल्लर’ नाण्यासारखा आहे का..? हे मात्र तपासून अवश्य पहा.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा