Often there is a sudden change in someone’s life that they never imagined. We get to see a scene that is unbelievable. When we see life transformed like a magic wand, we feel jealously that person. That person also starts walking around saying, I have changed my life because of my hard work. But then what we say that there is an invisible force called ‘destiny’ is false…?
बरेचदा अगदी अचानक एखाद्याच्या आयुष्यात कल्पना केली नाही असा बदल झालेला दिसतो. अविश्वसनीय असंच म्हणावं लागेल असे दृश्य आपल्याला पहायला मिळते. एखादी जादूची छडी फिरावी तसा आयुष्याचा कायापालट झालेला पाहिल्यावर आपल्याला त्या व्यक्तीचा हेवा वाटायला लागतो. तो व्यक्ती देखील दिमाखात सांगत फिरायला लागतो, माझ्या मेहनती मुळेच मी आयुष्याला बदललं आहे. पण मग ‘नशीब’ नावाची एक अदृश्य शक्ती असते असे आपण जे म्हणतो ते खोटं असतं का…..!

मी सध्या ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याच परिस्थितीत मी जन्मभर राहणार नाही, हा तर मनुष्याचा स्थित्यंतराचा स्वभाव असतो. मग आयुष्यभरात जे काही चढ-उतार तो अनुभवतो, संकटांना सामोरे जातो, त्याला तो प्रारब्ध म्हणतो. अगदी शास्त्रीय भाषेत सांगायचे तर, पृथ्वीला जसं वायुमंडलाचे आवरण असते अगदी तसेच माणसाच्या आयुष्य गोलाला ‘प्रारब्धा’चे आवरण असते. एव्हढं सगळं असताना देखील माणूस प्रारब्धाच्या पुढे जावून ‘कर्मा’ची नवी समीकरणे मांडत असतो. आपल्या आयुष्यात येणारी संकटे, अडथळे, अपयश याला तो प्रारब्ध समजतो. पण त्याच संकटावर मात करून मिळविलेला विजय, सुख याला तो स्वतःचे ‘कर्म’ मानतो. ‘मी केले….माझ्यामुळेच झाले’ ही भावनाच या कर्मामधून जन्माला येत असते. पण आयुष्यात ठरवून काहीच होत नसतं. तुम्ही जे ठरवता ते न होता वेगळंच काहीतरी अनपेक्षितपणे तुमच्या पुढ्यात येत असते. अश्यावेळी तुम्ही तुमच्या नशिबाला दोष देत बसता. किंवा पुढ्यात आलेले अपेक्षेपेक्षा अधिक सुखकारक असेल तर तुम्ही ते ‘मी केले..मी केले’चा जप करत प्रारब्धापासून त्याला वेगळे करता. सिकंदराने जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहिले होते. फार इतिहासकालीन उदाहरण कशाला अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण पाहू, पॉप सिंगर मायकल जॅक्सनला दीडशे वर्ष जगायचं होतं पण आयुष्याची पन्नाशीच तो पूर्ण करू शकला. मग याला काय म्हणावे. माणूस आयुष्यात जे ठरवतो ते होतंच असं नाही आणि जे होतं ते ठरवलेलं असतंच असं नाही, यालाच कदाचित आयुष्य म्हणत असावेत.

आता अगदी आपल्यातीलच एक उदाहरण सांगतो. पत्रकारितेत असल्याने राजकीय नेतेमंडळींना खूप जवळून अभ्यासण्याची संधी मिळत असते. तर भारतीय राजकारणातील ‘हसमुखराय’ म्हणून सुपरिचित असणारे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठनेते सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबतीत आहे. गाववाले असल्याने जरा जास्त जवळीकता आहे एव्हढंच. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पुढे केंद्रात गृहमंत्री झाले तेंव्हा, दोन्हीवेळेला सोलापूरला आल्यावर त्यांनी आपल्या भाषणातून ‘आता मी फक्त सोलापूरचा राहिलो नाही’ असे सांगत असतानाच जर मी राजकारणात आलो नसतो तर गल्लीतील नामधारी गुंड झालो असतो अशी मखलाशी केली होती. मुळात आपण काय व्हायचं हे ठरवतो हाच आपला ‘कल्पनाविलास’ असतो. मी ‘अमुक एक’ झालो नसतो तर मी ‘तमुक एक’ झालो असतो हे म्हणणं म्हणजे आपल्या आयुष्याला पूर्णत्वाचा आकार देण्यासारखे असते. अर्थात सर्वधर्म समभाव मानणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांना प्रारब्ध, नशीब हे थोतांड वाटणार…साहजिकच आहे त्यांनी समाजात आज जे काही स्थान मिळविले ते व्यक्तिगत संघर्षातून मिळविलेले असते. पण हा व्यक्तिगत पातळीवरचा संघर्ष त्यांच्या वाट्याला का यावा..? मग हे त्यांचे प्रारब्ध किंवा नशीब नाही का..? पण एकमात्र खरं आहे काही माणसे अशीही असतात, जी आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात आपला वेळ वाया घालवत नाहीत. तर वेळच ठरवते आत्ता त्यांनी काय करायला हवे…शेवटी आपण त्या अदृश्य शक्तीच्या बोटावर नाचणारे बाहुले असतो….यालाच जीवन ऐसें नाव म्हणतात.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा