लागलेला ‘तळतळाट’ सुख उपभोगू देत नसतो….!

Wealth acquired by deceit, fraud or coercion does not last even three generation’s. The bottom of the deceived does not allow the deceiver to sleep happily. No matter how much charity he does, he can not attain happiness. After all, after every three generations, the cycle of wealth-powerty cycle continues. Those who have enjoyed false wealth for three generations start moving towards poverty from the fourth generation.

लबाडी करून, फसवणूक करून किंवा जबरदस्तीने कमावलेली संपत्ती तीन पिढ्यापर्यंत देखील टिकत नसते. फसलेल्यांचा तळतळाट फसविणाऱ्याला सुखाची झोप लागू देत नसतो. कितीही दानधर्म केला, तरी देखील तो सुख मिळवू शकत नाही. असं म्हणतात की, दर तीन पिढ्यानंतर गरिबी-श्रीमंतीचे नियतीचे चक्र फिरतच असते. तीन पिढ्यापासून लबाडीने श्रीमंती भोगणाऱ्यांची चौथ्या पिढीपासून गरिबीच्या दिशेने वाटचाल सुरू होत असते.

माझ्या गावात अजूनही जुने दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीचे धनिक सावकारांचे टोलेजंगी वाडे अस्तित्वात आहेत. मात्र अशा चिरेबंदी वाड्यातून गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून कुणी रहात नसल्याने हे वाडे दुरुस्ती आणि देखभाली अभावी ‘खंडहर’ बनले आहेत. त्या वाड्यांचा आणि तिथे राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबाचा इतिहास म्हणजे गावातल्या जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलेली ‘दंतकथा’च वाटते. गर्भश्रीमंत सावकारांचे हे वाडे म्हणजे त्याकाळातील आर्थिक शोषणाचे प्रमुख केंद्र असायचे. एकतर निरक्षर-अशिक्षितांचे प्रमाण अधिक असण्याचा तो काळ होता. त्यामुळे गरजेपोटी सावकाराकडून चक्रवाढ पद्धतीच्या व्याजदराने घेतलेले कर्ज दोन-दोन पिढ्यापर्यंत फिटत नसायचे. व्याज भरले तर मुद्दल तशीच शिल्लक असायची. सावकार पुन्हा त्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज लावायचा. कधीही न फिटणारे कर्ज फेडण्यात त्या कर्जदाराच्या दोन पिढ्या खपायच्या. पिळवणूक करून लबाडीने पैसा कमावणारा सावकार म्हणजे सोन्याने मढवलेला हाडामासाचा अवाढव्य गोळा असायचा. सर्व सुखं पायाशी लोळण घेत असतानाही कर्ज घेतलेल्या लोकांच्या मिळणाऱ्या तळतळाटाने सावकार लोक सुख उपभोगू शकत नसायचे. स्वतः सावकार विविध रोगांनी वेढलेला असायचा. सावकाराच्या रोगी शरीराबरोबरच कर्तबगारी नसलेली, जन्मजात रोगट प्रकृतीची पिढी जन्माला घालण्याचे ‘पातक’ देखील त्याच्या हातून घडलेले असायचे. अल्पायुषी ठरणाऱ्या वारसदारांच्या मंदबुद्धी किंवा विलासी वृत्तीने सावकारांचे आयुष्य ‘शापित’ झालेले असायचे. कर्जदाराकडून मिळालेला तळतळाट सावकाराचे रोजचे जगणे हे नरकयातना भोगणारे जीवन असले, तरी देखील पैश्याचा मोह सुटत नव्हता. समाजाचा रोष पत्करून केलेल्या सावकारीमुळे अख्खं कुटुंबच एकाकी पडलेलं असायचं. पुढे सावकाराच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब वाडा कुलूपबंद करून दुसऱ्या गावी स्थलांतरित व्हायचे. वाडा निर्मनुष्य व्हायचा. आता असे वाडे ‘शापित’ जागा बनल्या आहेत. सावकाराने जमा केलेले धन- दागदागिने हंड्यात भरून वाड्यात पुरून ठेवले आहेत, या अफवेने सगळे वाडे आतून पोखरलेले-उकरलेले आहेत. पुढे लोकांनी वाड्यातील कलाकुसरीचे शिसवी, सागवानी खांब, दरवाजे, खिडक्या चोरून नेले. एव्हढंच काय, वाडे कोसळल्यावर दगड-माती देखील नेली. एकदा चिकटलेला ‘तळतळाट’ पिढ्या न पिढ्या सुटत नाही. आता ही दंतकथा म्हणावी की सत्यकथा..? पण अशा घटना आजही घडतात.

आत्ताही मी अनेक धनिक बघतो. जे आर्थिक व्यवहार करताना बँकेच्या व्याजदराच्या कैक अधिक दराने गरजूंना पत पुरवठा करतात. बँकांकडे कागदपत्रांची पूर्तता आणि जामीनदार लागतात. मात्र पतपुरवठा करणाऱ्या धनिकांकडे याची काही जरुरी नसते. ते अगदी सहजतेने पत पुरवठा करतात. हाच सहजतेने केलेला पत पुरवठा कर्जदाराचा जीवघेणा ठरत असतो. मग त्यातून ‘तळतळाटाचा’ जन्म होत असतो. या तळतळाटाची भीती स्वतः धनिकांना देखील वाटत असते. त्यातूनच मग ते दानधर्म करणे, सार्वजनिक उत्सवात सहभागी होत खर्चाचा भार उचलणे, महाप्रसादाचे वाटप करणे असे उपक्रम राबवत स्वतःचा ‘सामाजिक चेहरा’ तयार करत असतात. तळतळाट लागू नये म्हणून देवधर्म करणारे ‘धनको’ आणि आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी देवधर्म करणारे ‘ऋणको’ दोघेही श्रध्देला कवटाळून देवापुढे नतमस्तक होत असतात. शेवटी दोघेही देवाजवळ ‘सुखी जीवनाची’च मागणी करत असतात. देव तरी काय करणार…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)