Whoever you are, have you ever audited living in solitude ? Of course you don’t even remember trying to answer this question. If we do not plan the tasks to be done during the day, then we will certainly not have a balance sheet of what has escaped our hands today.
तुम्ही कुणीही असाल, कधी एकांतात जगण्याचं ऑडिट केलंय का तुम्ही ? अर्थात या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचं देखील तुम्हाला आठवत नसेल. दिवसभरात करावयाची कामे याचे जर नियोजन आपण करत नसाल तर आज आपल्या हातून काय निसटून गेलंय ? याचा ताळेबंद आपल्याकडे नक्कीच नसणार.

आज तुम्हाला मी ‘ग्यान गुरू’च्या भूमिकेत शिरल्या सारखं वाटतंय का ? नक्कीच वाटत असणार. कारण ‘आपल्या हातून काय निसटून गेलंय..?’ याचा विचार योग्यवेळी कधीच आपण करत नसतो…हा प्रश्न आपल्या डायरीत कुठल्याच पानावर आढळत नाही. कारण आपण आशियायी आहोत…त्यातही आपण भारतीय आहोत…मग आपण धर्मवादी, जातीवादी, भाषावादी आणि सगळ्यात शेवटी आपण प्रांतवादी असतो. आता दिवसभर या टाईट शेड्युल नंतर संध्याकाळी आपल्या हातून काय निसटून गेलंय ? याचा विचार करायला उसंत तरी मिळते का ? आणि समजा मिळाली तरी त्या विचार करण्याचा उपयोग तरी काय ? उद्या पुन्हा नवे प्रश्न आणि नवी आव्हाने आपल्या समोर उभी असतात. अजून आपण इतके प्रगत झालो नाहीत की किमान स्थिर जीवन जगू शकतो. त्यामुळे ‘डायरी’नुसार जगणे आणि हातून निसटून गेलेल्या क्षणांचा ऑडिट रिपोर्ट तयार करणे ही युरोपियन जीवनपद्धती आपल्याला लागू होत नाही. चार-दोन सुविचार लिहिलेले फोटो डकवले म्हणजे ते लगेचच आचरणात आणले जातील हा निव्वळ भ्रम आहे….माझ्या पत्नीनेच मला एव्हढं सुनावल्यावर माझ्यातील ‘ग्यान गुरू’ कुठच्या कुठे पळून गेला. खरंच आपल्याला एव्हढं हिशोबी जगणं जमत नाही. आयुष्यभर सोसणे या व्यतिरिक्त देखील जगणे असते, हे आपल्या देशात दारिद्र्यात जगणारे आणि स्वप्नरंजन करत जगणारे मध्यमवर्गीय या दोन्ही वर्गांना नियोजनबद्ध जगणे कसे असते ? हे माहीतच नसते. कधी पुस्तकातून तर कधी सिनेमाच्या पडद्यावर समृद्ध जीवन पाहिल्यावर डोकं सटकतं…. पण त्यांचं जग वेगळं, आपलं जग वेगळं हीच मनाची समजूत घातली जाते. मग हे रोजच्या रोज ऑडिट करण्याचा विचार कधी मनाला शिवणार..?

परवा रात्री कामावरून घरी परत येत असताना भिकाऱ्यांचं एक कुटुंब फुटपाथवर दिवसभराच्या कमाईचे ‘ऑडिट’ करताना दिसलं आणि मी जाम टरकलोच. काय चाललंय ? म्हणून करकोचा सारखी मान वळवून मी त्यांच्याकडे लक्षपूर्वक पहात होतो. एक म्हातारी आपल्या नातवंडांना जवळ घेऊन दिवसभरातील गोळा केलेल्या भिकेचा हिशोब घेत होती. याबरोबरच समोरच्या माणसाला (आपल्या भाषेत क्लाएंटला) आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी कशी भावनिक साद (इमोशनल ट्रॅप) घालायची याचं अनुभवातील शहाणपण ती आपल्या नातवंडांना देत होती. सोबतच भुकेजले असतील म्हणून वडापाव खाऊ घालत होती. मी मनातून चरकलोच…. आयला हे सगळं आपल्या बरोबर पण रोज घडत असते….त्यालाच तर आपण कार्पोरेट कल्चर म्हणतो. फक्त आपण कंपनीचं प्रॉडक्ट खपवण्यासाठी रोज इमोशनल ट्रॅप लावून बसतो. ज्याच्यासाठी कंपनी आपल्याला घसघशीत रकमेचा पगार देत असते. सोबत खर्चिक आणि ड्रीमफुल जगण्याची सक्ती करत असते. कारण तुम्ही कोणत्या वर्गाला आकर्षित करणार आहात, त्याला साजेशी वेशभूषा तुम्ही केलीच पाहिजे. ‘मार्केटिंग अँड ऑडिट’चं लॉजिक एकदा का तुम्हाला कळलं की मग तुम्ही ‘ग्यान गुरू’ व्हायला मोकळे झालात.

मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा