‘महत्वाकांक्षा’ घरात तर ‘समाधान’ अंगणात राहतोय..!

‘Ambition’,’Satisfaction’ and ‘Anger’ are the children of ‘Poverty’ and ‘Tolerant’. The elder daughter ‘Ambition’ has usurped the father’s house in a fight. So the middle son ‘Satisfaction’ is living in the front yard of the house. Whereas the mother ‘Tolerant’ is living in a separate house with her son ‘Anger’. Which child should stay with ‘Poverty’ who is saddened by the behavior of his children ? This question is bothering…..This story of ‘Poverty and Tolerant’ couple who are financially weak is being seen from house to house these day’s.

‘महत्वाकांक्षा’,’समाधान’ आणि ‘क्रोध’ ही ‘गरिबी’ आणि ‘सहनशील’ या दाम्पत्याची लेकरं आहेत. मोठी मुलगी ‘महत्वाकांक्षा’ने भांडून बापाचे घर बळकावले आहे. त्यामुळे मधला मुलगा ‘समाधान’ हा घरासमोरच्या अंगणात रहात आहे. तर आई ‘सहनशील’ ही आपल्या ‘क्रोध’ या मुलासोबत वेगळं घर करून रहात आहे. आपल्या मुलांच्या वागण्याने दुःखी झालेला बाप ‘गरिबी’ याला कोणत्या मुलाकडे रहायचे ? हा प्रश्न सतावतोय….आर्थिक दुर्बल असलेल्या ‘गरिबी आणि सहनशील’ या जोडप्याची ही कथा आजकाल घरा-घरांमधून पहायला मिळत आहे.

परवा दिवशी दिव्यमराठी वृत्तपत्राचे युनिट हेड असलेले माझे मित्र नौशाद शेख आणि मी त्यांच्या गाडीतून ऑफिसकडे जात असताना फुटपाथवर कचाकचा भांडणारे लोक बघितल्यावर नौशाद मला म्हणाले, एक लक्षात येतंय का अप्पा….लोकं पैसे कमावत आहेत पण समाधानी नाहीत. तेंव्हा मी त्यांना चटकन बोलून गेलो, खरंय तुमचं ! समाधान अंगणात येवून थांबलाय पण घरात ठाण मांडून बसलेली महत्वाकांक्षा….ती बया घरातून निघायचं नाव घेईना….माझी ही तात्काळ प्रतिक्रिया तो विषय तिथेच थांबवायला पुरेशी ठरली की नाही मला सांगता येणार नाही. पण माझीच प्रतिक्रिया मला अंतर्मुख करून गेली. खरंच भलेही गरिबी हद्दपार झालेली नाही….तशी ती कधीच होणार नाही. पण गरिबीचा देखील मिळकतीचा स्तर निश्चितपणे उंचावलेला आहे. आज मजूर देखील किमान पाचशे रुपये दिवसाचे कमावतो. पूर्वी हीच कमाई साठ-सत्तर रुपये होती. मग त्यामानाने आज गरिबीचाही आर्थिकस्तर उंचावलेला असताना लोक एव्हढे असमाधानी, अस्वस्थ, क्रोधीत अवस्थेत का जगत आहेत ? वाढती महागाई हा मुद्दा जेव्हढा कळीचा आहे तेव्हढाच बदलती जीवनशैली आणि वाढती महत्वाकांक्षा हे माणसाला असमाधानी ठेवणारे ‘विषाणू’ आहेत. आपले वडीलधारी माणसे आपल्याला कायम बजावून सांगायचे….माणसाने अंथरुण पाहून पाय पसरावे…थोडक्यात आपली कमाई जेव्हढी आहे त्यातच थोडी बचत करून आपला चरितार्थ चालवावा. पण नेमकं हेच घडत नाही.

मर्यादित कमाईवर जगणाऱ्यांची प्रपंच चालवताना खरी ससेहोलपट सुरू होते ती त्यांची मुले मोठी होतात तेंव्हा. तरुणाईत आलेल्या मुलांची महत्वाकांक्षा आणि स्वप्नपूर्ती करताना आर्थिक विवंचनेत नोकरदार माणूस अर्धाधिक उसवला जातो. त्यातच विनासायास सहजतेने मिळणारे कर्ज त्याला चक्रव्यूहात खेचून आणते. इथेच त्याचा ‘अभिमन्यू’ होतो. आपणहून चक्रव्यूहात शिरल्यावर त्याला त्यातून बाहेर कसे पडायचे हेच माहीत नसते. मोहाचे असंख्य जबडे ऑनलाईन खरेदीच्या नावाखाली आ वासून आपले सावज टिपण्यासाठी रात्रंदिवस सज्ज आहेत. या आर्थिक पेचात मध्यम कमाई असलेले लोक अडकले आहेत. विशेषतः ज्यांची कमाईच ‘बटवा’ भरून आहे त्यांची महत्वाकांक्षा मात्र पोते भरून आहे. मग हात उसणे घेण्याचे व्यवहार पुढे चालून कर्जपर्यंत पोहोचतात. बदलत्या जीवनशैलीला चित्रपटातून पाहताना स्वतःचं मनोरंजन करून घेणारा हा वर्ग थिएटर बाहेर पडला की ती फॅशन अंगिकारण्यासाठी आसुसलेला होतो. मग एका मर्यादेपलीकडे गेल्यावर हतबल झाल्यामुळे त्याची चिडचिड वाढत जाते. त्यातूनच संयम नष्ट झाल्याने ‘क्रोध’ नावाचा विषाणू त्याच्या डोक्यात थैमान घालू लागतो. या सगळ्या दुष्टचक्रात अडकल्याने समाधान त्याला केंव्हाच सोडून दूर निघून गेलेले असते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

1

)

  1. gosavimanik123

    ” समाधानाला ” घरात घ्या ✍️✍️👌👌

    Liked by 1 person