We humans have lost the wisdom of genuinely resting and relaxing. We worry too much. We don’t allow our bodies to heal, and we don’t allow our minds and hearts to heal.
आपण माणसांनी खऱ्या अर्थाने विश्रांती घेण्याची आणि आराम करण्याची बुद्धी गमावली आहे. आपण खूप काळजी करतो. आपण आपले शरीर स्वस्थ ठेवत नाही आणि आपण आपले मन आणि हृदय देखील स्वस्थ ठेवत नाही.

धकाधकीच्या जीवनात विश्रांती, स्वास्थ्य हे शब्द फक्त वाचण्यापुरते आणि लिहिण्यापुरतेच राहिले आहेत. लाईफस्टाईल बदलत चालल्याने अधिक श्रम, अधिक धावपळ करून अधिक पैसे कमवायचे हा ‘फंडा’ सर्वांच्याच डोक्यात फिट्ट बसलेला असतो. त्यामुळे विश्रांतीला इथे जागाच नसते. विश्रांती किंवा शरीरस्वास्थ्य हे विषय वयाच्या ५५ व्या वर्षांपासून डोक्यात घ्यायचे हाच समज सर्वत्र रूढ झालेला आहे. ‘हेच तर कमवायचे दिवस आहेत’ हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडात इतके रुळले आहे की दिवसातून किमान दहा वेळा तरी हे वाक्य प्रत्येकजण बोलून दाखवत असतो. कुठलीही व्यवस्था स्थापित होण्याअगोदर काही वर्षे त्याचे संस्कार समाजाच्या अंगवळणी पडावे लागतात. कार्पोरेट कल्चरबाबत सध्या हेच दिसून येत आहे. आपल्याकडे कार्पोरेट सेक्टर एव्हढे मोठे नक्कीच नाही मात्र कार्पोरेट कल्चर वेगाने फैलावताना दिसत आहे. हे कल्चर अंगवळणी पडताना समाजाच्या प्रकृतीवर जो विपरीत परिणाम होतो त्याचे पडसाद आपल्याला आता जाणवू लागले आहेत. हे कल्चर सगळ्यात पहिल्यांदा तुमची जीवनशैली बदलायला भाग पाडते. बदलत्या जीवनशैली बरोबरच अस्थिरता आणि तणाव वाढत चालला आहे. त्यामुळेच सतत कार्यमग्न राहण्याच्या प्रयत्नातून आपण विश्रांती घेण्याचे विसरून चाललो आहोत. ‘हेच तर वय आहे कमवायचे’ याचा जप करत असताना विश्रांती अभावी आपले शरीर स्वास्थ्याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. याचा फटकाही सहन करावा लागत आहे. ऐन पस्तिशीच्या वयात हृदयविकार, अर्धांगवायू याबरोबरच मधुमेह, रक्तदाब या दीर्घकालीन आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे.

आपल्याकडे ५८ वय हे निवृत्तीचे वय समजल्या जाते. निवृत्ती म्हणजे तुमच्यातील कार्यक्षमता संपली म्हणून तुम्हाला दिलेली कायमची रजा. म्हणजे तुमच्या क्रयशक्तीची ही एकप्रकारे केलेली अवहेलनाच असते. वाढत्या वयानुसार तुमचे शरीर आणि मेंदू थकतो. त्याला विश्रांतीची आवश्यकता असते म्हणून तुम्हाला निवृत्त केले जाते हा समजच मुळात भ्रम निर्माण करणारा असतो. वाढत्या वयामुळे येणाऱ्या शिथिलतेकडे पाहून जर हाच तो विश्रांतीचा काळ असा समज जर आपण करून घेणार असू तर तोच सगळ्यात मोठा भ्रम आहे. विश्रांती फक्त वार्धक्य आल्यावरच घ्यावी हे अज्ञान झाले. कायमची सक्तीची विश्रांती घेण्यापेक्षा जर धावपळीच्या वयातही वर्षातून ठरवून आठ दिवस सक्तीची विश्रांती घेऊन पुन्हा ताजेतवाने होत कामाला सुरुवात करणे हे खूप फायदेशीर ठरते.

माणूस हा अनुकरणप्रिय असल्याने दुसऱ्याचे अनुकरण करण्याच्या नादात स्वतःजवळ असलेली ऊर्जा तो इतरांची बरोबरी करण्याच्या नादात वाया घालवत असतो. त्याचं जीवन आरामात चालले आहे मग मीच का कष्टात ही इतरांशी तुलना करण्याच्या नादात आपण विनाकारण वेदना आणि हतबलतेला जवळ करून तणावात जातो. यासर्व विकारांचा परिणाम आपल्या प्रकृतीवर होवुन आपण आजाराला आमंत्रण देत असतो. अस्थिर सैरभैर होणारे मन आणि अस्वस्थतेचा परिणाम कामावर देखील होतो. मग प्रभावशून्य कामगिरीने तुमचा कार्यक्षमतेचा आलेख घसरतो आणि मग अवहेलना झेलावी लागते. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा विश्रांती घेण्याबाबतचे बुरसटलेले विचार बाजूला टाकून सदा ताजेतवाने राहण्यासाठी वर्षातून किमान आठ दिवस विश्रांतीसाठी राखून ठेवण्याचे नियोजन करा. कारण ‘विश्रांती’ त्यांनाच गरजेची असते, ज्यांना पुन्हा जोमाने कामाला लागायचे असते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा