After more than half a lifetime, we have accumulated a wealth of experiences and memories. Then we literally live on ‘those’ experiences and memories for the rest of our lives. Of course, in the eyes of the world, at the age of retirement, we have to wake-up these ‘memories’. Either old age is an attempt to avoid loneliness or it is an attempt to convince oneself that one’s memory is still intact. Well, even ‘those’ memories are pretty hazy. Even the rustling of leaves in the dark or the chirping of nocturnal animals and birds can be frightening. But even so, people keep trying to rekindle ‘those’ dim dim memories.
अर्ध्याहून अधिक आयुष्य पार केले की आपल्याजवळ अनुभव आणि आठवणींचा खजिना तयार होत असतो. मग उर्वरित आयुष्य आपण ‘त्या’ अनुभव आणि आठवणींवर अक्षरशः जगतो. अर्थात जगाच्या दृष्टीने निवृत्त होण्याच्या वयात या ‘आठवणी’ जागविण्याचा चाळा आपल्याला लागलेला असतो. एकतर म्हातारपण हे एकाकीपणात जावू नये हा खटाटोप असतो किंवा अजून आपली स्मरणशक्ती चांगली शाबूत आहे अशी स्वतःचीच समजूत घालण्याचा तो प्रयत्न असतो. बरं ‘त्या’ आठवणी देखील बऱ्याचशा अंधुक झालेल्या असतात. अंधारात झाडांच्या पानांची सळसळ किंवा निशाचर प्राणी-पक्षांचं चित्कारणे देखील भयावह वाटत असते. पण असं असतानाही ‘त्या’ पुसट, अंधुक झालेल्या आठवणींना पुन्हा गडद करण्याचा आपला खटाटोप सुरूच असतो.

वयाच्या प्रत्येक टप्प्यावरच्या आठवणी आपल्या मेंदूच्या पटलावर कधीतरी ठसठशीत कोरल्या गेलेल्या असतात. हळूहळू त्यावर अनेक आठवणींचे ‘थर’ एकमेकांवर घट्ट चिटकून बसतात. यात बऱ्याच उथळ, काही भडक, काही लोभस, काही भयप्रद आठवणींचे पुटं एकमेकांवर आदळून चक्काचूर झालेली असतात. नेमक्या त्यातल्या आकर्षित करणाऱ्या, खुणावणाऱ्या आठवणींचे मेंदूत इतस्ततः पसरलेले काही छोटे तर काही मोठे तुकडे अगोदर एकमेकांना जोडावे लागतात. हा आठवण जोडण्याचा ‘खेळ’ एकदा का तुम्हाला जमला की मग त्यात ‘रमायला’ तुम्ही मोकळे होता. या आठवणीतल्या सावल्या तुमच्यासमोर मागे कधीतरी घडून गेलेला प्रसंग पुन्हा एकदा पडद्यावरच्या चित्रपटासारखा तुम्हाला उलगडून दाखवतात. त्यात रोमांच, थरार असतो, काहीतरी हरवलेलं सापडल्याचा आनंद असतो अन हो….चकवा पण असतो. बरं स्वप्न पाहण्यासाठी झोपावं लागतं. मात्र आठवणींचं तसं नसतं. त्या कधीही जागवता येतात. अगदी दुसऱ्याशी गप्पा मारताना, गर्दीच्या ठिकाणी, एकांतात, तिन्ही त्रिकाली अगदी कधीही….त्यातल्या त्यात एकांतात किंवा मध्यरात्रीच्या निरव शांततेत जागवलेल्या ‘आठवणी’ अगदी आमने-सामने आपल्याशी संवाद साधतात. काही आठवणी तुमच्याशी गप्पा मारत तुमच्या मेंदूवर नियंत्रण मिळवतात. मग त्याच तुमच्या मेंदूला कंट्रोल करू लागतात….चकव्या सारख्या !

मेंदूत खोलवर कुठं तरी रुतून बसलेल्या आठवणींचा समूह म्हणजे चकव्याचे ‘मायाजाल’ असते. जेंव्हा तुमचा मेंदू दुर्बल, क्षीण झालेला असतो, अशावेळी तुमच्या आयुष्यात घडणारे प्रसंग तुमच्या मेंदूत आठवण म्हणून अगदी खोलवर रुतून बसतात. जेंव्हा आयुष्यात तुम्हाला एकाकीपणा येतो, तेंव्हा हीच आठवण चकवा बनून तुम्हाला भरकटत ठेवते. माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग सांगतो…१९८४ सालची ही घटना आहे. मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी औरंगाबाद (आत्ताचे छत्रपती संभाजीनगर) येथे रूम करून रहात होतो. तर वडील गंगापूर जवळ असलेल्या रघुनाथनगर येथील साखर कारखान्यावर नोकरीला होते. संभाजीनगर पासून गंगापूर अवघ्या तीस-पस्तीस किलोमीटर अंतरावर तर गंगापूरपासून रघुनाथनगर हे अंतर डांबरी रस्त्याने अंदाजे ७ कि. मी. तर पाउलवाटेने ४ कि मी अंतरावर. एकेदिवशी मला बऱ्यापैकी ताप आला. दोन दिवस ताप अंगावर काढल्यानंतर घरी रघुनाथनगरला जायचं ठरवलं. रात्री साडेदहाची शेवटची एसटी पकडून पहिल्यांदा गंगापूर गाठले. जवळपास रात्रीचे साडेअकरा-पावणे बाराचा सुमार असावा. गंगापूरच्या बसस्थानकावर सामसूम होती. इथंच थंडीत कुडकुडत बसण्यापेक्षा शेतातून जाणाऱ्या मधल्या वाटेने रघुनाथनगर गाठायचे ठरवून चालत निघालो. कारखान्याच्या गळीत हंगामाचे दिवस असल्याने अंधाऱ्या रात्रीसुद्धा कच्च्या रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांची टोळी सोबतीला मिळेल या आशेने चालत राहिलो. अंगातला ताप फणफण करत होता. मला चालण्याची सवय असल्याने तासा-दिडतासात मी चार किलोमीटर एव्हढे अंतर सहज पार करायचो. पण त्यादिवशी सगळ्या रस्त्याने एक चिटपाखरूही दिसलं नाही. शेतातल्या उसातून अधूनमधून ‘खसफस’ झालं की जाम टरकायचो. पुन्हा मोठमोठ्याने ‘राम-राम’ म्हणत पुढे चालायचो. उंच आणि डेरेदार असलेल्या वडाच्या, चिंचेच्या झाडाच्या फांद्या वाऱ्याने हलल्या की काहीतरी विचित्र आकृत्यांचा भास व्हायचा. त्यादिवशी मी रात्रभर त्या कच्च्या रस्त्यावर चालत होतो. कुठल्यातरी यावेळी मी मूर्च्छा येवून रस्त्याच्या कडेला पडलो होतो. पहाटे चारच्या ड्युटीसाठी सायकलवर जाणाऱ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मला रस्त्यात पडलेलं बघितलं. ओळख पटल्यावर त्यातल्या दोघांनी मला घरी पोहोचतं केलं. पुढे दोन दिवस मी बेशुद्धावस्थेत होतो. नंतर जवळपास महिनाभराने मी बरा झाल्यावर मला त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले त्या चिंचेच्या झाडावरील ‘चकव्या’ने तुला धरलं होतं. डॉक्टरांनी तर मला टायफाईड झाल्याचे सांगितले होते. मी अंधश्रध्देच्या विरोधात असल्याने मला ‘चकवा’ झाला होता हे मुळात मलाच मान्य होत नव्हते. पण ही आठवण आजही माझ्या मेंदूत रुतून बसली आहे. तापाने एव्हढा फणफणलेला असताना मी चालतच होतो…ते कुणाच्या आदेशावर…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा