इतरांशी तुलना थांबविली तर आदरभाव वाढतो…!

Nowadays everyone seems to be becoming dissatisfied and irritable. There are many reasons for being dissatisfied. Such as lack of fulfillment of desires, financial constraints. It seems that the feeling of inferiority that no one listens to us, no one takes us for granted, no one respects us is behind the increase in irritability. What did you do to increase respect for you ? The thought that people will start respecting us, when the answer goes unanswered, the irritation seems to increase.

आजकाल प्रत्येकजण असमाधानी आणि चिडचिड्या स्वभावाचा बनत चालल्याचे दिसून येते. असमाधानी राहण्यामागे इच्छापूर्ती न होणे, आर्थिक विवंचना अशी अनेक कारणे आहेत. तर चिडचिडेपणा वाढण्यामागे आपले कुणी ऐकत नाही, आपल्याला कुणी गृहीत धरत नाही. आपला कुणी सन्मान करत नाही ही न्यूनगंडाची भावना वाढीला लागल्याचे दिसते. काय केलं म्हणजे आपल्याबद्दल आदरभाव वाढेल ? लोक आपला आदर करू लागतील, या विचारातून उत्तर मिळेनासे झाले की, चिडचिडेपणा वाढलेला दिसतो.

चिनी तत्त्ववेत्ता लाओ त्झू याच्या म्हणण्यानुसार, जेंव्हा तुम्ही फक्त स्वतः असण्याचे अस्तित्व मान्य करत असताना इतरांशी तुलना किंवा स्पर्धा करत नाही, तेंव्हा प्रत्येकजण तुमचा आदर करायला लागतो. परवा दिवशी एक ओळखीचे सद्गृहस्थ एका कार्यक्रमात भेटले. कार्यक्रम दुसऱ्याचाच होता. मिळालेल्या आमंत्रणावरून मी हजेरी लावली. तशीच हजेरी त्या सद्गृहस्थाने लावली होती. पण आल्यापासून ते शेजारी बसलेल्या व्यक्तीला कुजबुज करीत भंडावून सोडत होते. कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा सोडून कार्यक्रमातील उणिवा ते शोधून काढत शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या कानात तप्त लोहरस ओतल्या सारखे एकसारखे तक्रारीच्या स्वरात किरकिरत होते. त्यांच्या वयोमानाकडे पाहून शेवटी शेजारी बसलेला माणूस त्या जागेवरून उठला…रिकामी झालेली खुर्ची पाहून मी झटक्यात खुर्चीचा ताबा मिळवला. तोपर्यंत माझ्या शेजारी एक ‘कर्ण पिशाच्च’ बसले आहे याचा मला जरासुद्धा अंदाज आलेला नव्हता. मी अजून खुर्चीत बसत नाही तोपर्यंत त्या सद्गृहस्थाने माझ्या कानाचा ताबा मिळवायला सुरुवात केली. एकूणच ते ‘कॅरेक्टर’ मला माहितीचे असल्याने चांगल्या ‘शेलकी’ शब्दात मी आपल्या मूळ व्यक्तिरेखेत परतल्याने त्याचा नाईलाज झाला. मग त्याने आपला मोहरा दुसरीकडे वळविला. हा प्रसंग सांगण्याचे कारण म्हणजे हे सर्वांच्याच बाबतीत घडत असते. अशी कर्ण पिशाच्चे जागोजागी आपल्याला भेटत असतात. खरं म्हणजे अशी माणसं कुणालाच सोबतीला हवीशी वाटत नसतात. चुकून जरी समोर आले तर संकट वाटत असतात. अशा कर्ण पिशाच्च वृत्तीच्या माणसांबद्दल कुणालाच आदर वाटत नसतो. कारण अशी माणसे नेहमी इतरांशी तुलना किंवा स्पर्धा करण्यातच स्वतःचे अस्तित्व शोधत असतात.

प्रतिक्रियावादी असणं हे माणसाचे जिवंत असल्याचे लक्षण मानले जाते. पण प्रतिक्रिया ही नैसर्गिक आणि स्वतःला काय वाटते हे सांगणारी असावी. ती प्रतिक्रिया इतरांशी तुलना किंवा स्पर्धा करणारी असेल तर आपोआपच तुम्हाला नकारात्मक व्यक्ती म्हणून समजल्या जाते. इतरांबद्दल कायमच तुम्ही तुलनात्मक किंवा नकारात्मक बोलू लागलात तर त्याच्यासमोर तुम्हाला तुमचे अस्तित्व गमावण्याची भीती वाटते असाच त्याचा अर्थ लावला जाईल. आपल्याला जसे आपले अस्तित्व मान्य असते तसेच इतरांचे देखील अस्तित्व आहे हे मान्य करणारे लोकच आदरार्थी म्हणून समाजाला मान्य असतात. शेवटी सूर्य दिवसभर कितीही आग ओकत स्वतःचे अस्तित्व दाखवत असला तरी त्याला रात्रीच्या काळोखाचे अस्तित्व मान्य असते. म्हणूनच अस्ताला जाताना तो अधिक शांत आणि अधिक सुंदर दिसायला लागतो. म्हणूनच तो आपल्याला आदरार्थी आहे.

माणसं फक्त माणसांचाच ‘आदर’ करायला विसरलीत असं नाही तर आजकाल माणसं कुणालाच जुमानत नाहीत. आपण प्रगत झालोत या अहंकाराने त्याने पक्षी-प्राणी इतकंच काय त्याने निसर्गाचा देखील अनादर करायला सुरुवात केली आहे. आज बरोबर एक वर्ष होतंय. वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांची सोलापूर मुक्कामी मुलाखतीसाठी भेट घेण्याचा योग आला होता. नागपूरहून कायमस्वरूपी सोलापूरला स्थायिक होण्याच्या इराद्याने गावाकडे परतलेल्या या वनमहर्षीची ही खंत खूप विचार करायला लावणारी आहे. ज्याने आख्खे आयुष्य वनात निसर्गाच्या कुशीत घालवले त्याची ही खंत हेलावून सोडणारी आहे. आपण सिमेंटची जंगलं उभारण्याच्या नादात वनराईचे अस्तित्वच नाकारतो आहे. पर्यायाने आपण आपल्याच अस्तित्वाला ‘सुरुंग’ लावत आहोत. जंगले नष्ट झाली तर पर्यावरणाला धक्का बसेल. पर्यायाने सर्वच जीवसृष्टी धोक्यात येईल. माणूस नावाचा प्राणी स्वार्थाने आणि अहंकाराने एव्हढा लिप्त झाला आहे की, त्याला स्वतःच्या अस्तित्वापुढे काहीच दिसेनासे झाले आहे. शेवटी ‘आदर’ म्हणजे काय ? आपल्याबरोबरच इतरांचे देखील ‘अस्तित्व’ आहे हे मान्य करणे म्हणजेच ‘आदर’ करणे आहे. नव्वदी पार करणाऱ्या या वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांची ही कळकळ नव्या पिढीला समजेल का ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

2

)

  1. jnzende

    सुंदर लेख

    Liked by 1 person

  2. gosavimanik123

    ” अहंकार ” मुळे खुप काही वाईट घडत
    माणसाच्या आयुष्यात ✍️✍️👌👌

    Liked by 1 person