What are you doing this evening?
A gentle but yearning ‘call’ . While waiting for someone, surrounded by doubts whether we will get a response or not, if this ‘call’ comes….The mobile rings and a quick look at the screen. The one we’ve been waiting for so much….Yes, that number ‘quoted’ in symbolic code on the screen finally responds happily to our wait, and heaven feels like it’s just two fingers away. What will be asked from there ? Before hearing this, yours answer is ready…. I am free this evening, where to meet ?
एक हळुवार पण हवाहवासा वाटणारा ‘कॉल’. कुणाच्या तरी प्रतीक्षेत असताना आपल्याला प्रतिसाद मिळेल की नाही या शंकेने घेरलेले असताना जर हा ‘कॉल’ आला तर….मोबाईलची रिंग वाजली अन चटकन नजर स्क्रीनवर पडली. ज्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहतोय…..होय ! स्क्रीनवर सांकेतिक कोड मध्ये ‘कोट’ केलेला तो नंबर अखेर आपल्या प्रतिक्षेवर खुश होत प्रतिसाद देतोय म्हंटल्यावर स्वर्ग अगदी दोन बोटाइतक्या अंतरावर असल्याचा भास होतो. तिकडून काय विचारणा होणार ? हे ऐकण्यापूर्वीच आपलं उत्तर तयार….आज संध्याकाळी मी मोकळाच आहे, कुठं भेटायचं ?

आपल्याला आवडू लागलेल्या व्यक्तीचा आपल्याला ‘कॉल’ येणे हे खरंतर ‘फायनल डेस्टिनेशन’ म्हणता येईल, तोपर्यंतचा प्रवास हा तितकाच रोमांचक, हुरहूर लावणारा, अस्वस्थ करणारा तर कधीकधी अपघात घडविणारा असाच असतो. खूप चढ-उतारांनी भरलेला दूरवर नेणारा प्रवास वाटतो. पौगंडावस्थेतील प्रेम हे खरं प्रेम नसतंच मुळी…. वर्गात मुलींच्या बेंचकडे तिरपा कटाक्ष टाकून ‘आपलीवाली’ आज आली की नाही ? याचा अंदाज घेणं, उगीचच बेंचमधून वाट काढत जाताना ‘तिचं’ लक्ष वेधून घेण्यासाठी अनपेक्षित अशा ‘हरकती’ करणं, मुली आपल्या वहीत जसं कोवळे पाने, फुले, मोरपीस ठेवतात, त्याची कॉपी करत आपल्या वहीत पण मोरपीस, फुलांच्या पाकळ्या ठेवणे, झालंच तर तळहातावर अंगठ्याच्या उंचवट्यावर ‘तिच्या’ नावाचं अद्याक्षर बॉल पेनने घोटून त्याला ‘बदामाच्या’ आकाराचा वेढा देणे हे पौगंडावस्थेत आपल्याच मनाशी चाललेले चाळे असतात. तारेवर बसलेल्या पक्षांचा ‘प्रणय’ जर नजरेस पडला तर ‘आपलीवाली’ नक्की ‘हो’ म्हणते ही फिलॉसॉफी फक्त त्या वयातच फेमस असते. कदाचित एव्हढे सगळे उद्योग करून देखील ‘तिने’ रिस्पॉन्स दिलाच नाही तर….गप चड्डीत रहा… असं म्हणाली तर ? तिला डायरेक्ट विचारायचं धाडस होत नसतं म्हणून लक्ष वेधून घेण्याचे खटाटोप करणे म्हणजे ‘प्रेम’ नसतंच मुळी… त्याला फारतर येडछाप पणा म्हणतात. पण सुरवंटाचं फुलपाखरू होण्याचं वय असतं… नर-मादी या शब्दाचा गूढ अर्थ पहिल्यांदाच समजणारे वय असते. फक्त ‘ती’ आवडते हे आकर्षण असते, प्रेम नाही….’तिच्या’ शिवाय दुसरं कुणीच नाही हे खरं प्रेम असतं. पण ते समजायचं वय आणखी पुढे असते.

एकदा का पौगंडावस्था संपली की मग कुणावर तरी जीव ओवाळून टाकायला तुम्ही मोकळे आहात. घटकाभर तुम्ही मला ‘लव्हगुरु’ समजलात तरी हरकत नाही….पण खरंच ! प्रेम करणं हा काही गुन्हा नाही किंवा ती सुंदर दिसणाऱ्या पैसेवाल्यांची मक्तेदारी नाही. प्रेम कुणीही करू शकतो. गोरा-काळा, गरीब-श्रीमंत, मागास-सवर्ण, शिक्षित-अशिक्षित अगदी प्रत्येकाला ‘प्रेम’ करण्याचा अधिकार आहे. पण हो….फक्त काही काळासाठी स्वतःच्या मनाचं किंवा शरीराचं रंजन करण्यासाठी नव्हे ! माजचं दाखवायचा असेल तर खिडकीत बसून ‘शुक-शुक’ करणाऱ्या ‘नगरवधू’ वाट पाहतात.

‘प्रेम’ हे बेभान होवून करायचं असतं ही कल्पना कथा-कादंबरी, कविता, नाटक वगैरे साठी ठीक आहे. पण वास्तवात प्रेमाचा रस्ता हा आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी असतो. तुमच्या घरातील, नातेवाईक-हितचिंतकामधील वडीलधाऱ्या मंडळींनी तुमच्यासाठी जोडीदार निवडायची परंपरा तुम्हाला नको ही तुमची ठाम भूमिका असेल तरच तुम्ही प्रेमाच्या गावाला जाणारी गाडी पकडा. मग पुढे येणाऱ्या प्रसंगांना धैर्याने तोंड देण्याची हिम्मत बाळगा. या प्रवासात पळपुटेपणा चालत नाही. मुळात ज्याच्या अंगी स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची हिम्मत नसते अशा पाठ फिरवणाऱ्या भित्र्या माणसांनी ‘प्रेमा’च्या वाटेला जावू नये. प्रेमाच्या दुनियेचे दरवाजे अशा लोकांसाठी उघडत नाहीत. कारण प्रेमात त्याग आणि समर्पणाची भावना महत्वाची समजली जाते. म्हणूनच प्रेम करा….पण जागे राहून, डोळसपणे ! लक्षात ठेवा….प्रेम करायला निघालात म्हणजे तुम्ही तुमच्या निवडीचा अधिकार सिद्ध करायला निघालेला असता. त्यामुळे अनुरूप जोडीदार मिळेपर्यंत भावी जोडीदाराबद्दल मनात उत्पन्न झालेलं प्रेम मनातच ठेवा. नाहीतर तुमचा ‘मजनू’ झालाच म्हणून समजा. आपल्याला हवा तसा अनुरूप जोडीदार भेटला की मग सुरू होतो नजरेचा खेळ. नजरेतून ओळख होईपर्यंत आणि त्या ओळखीचे प्रेमात रूपांतर होईपर्यंतची अस्वस्थता, अधीरता, घालमेल यासर्वांचा एकाक्षणी शेवट होतो. मग तिकडूनच आपल्याला ‘कॉल’ येतो…आज संध्याकाळी तू काय करतोस ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा