रक्ताची नाती आणि मानलेल्या नात्यांमधील संघर्ष अटळ…!

The fence of various ‘relationships’ that we have built around us while moving in society acts as a ‘safety net’ for us. That is why man arranges around himself blood relations as well as ‘perceived’relations in order to gain more security. This transaction of adding ‘supposed’ relationship while maintaining the ‘blood relationship’ that comes with birth sometimes creates a ‘storm’ in his life. Because the ‘blood relation’ that comes with birth is not his ‘choice’. But at some stage in his life he forms a ‘considered relationship’.

समाजात वावरताना आपल्या भोवती आपण जे वेगवेगळ्या ‘नात्यांचे’ कुंपण तयार केलेले असते ते आपल्यासाठी ‘सुरक्षा कवच’ म्हणून कार्य करीत असते. म्हणूनच अधिक सुरक्षा मिळावी या हेतूने माणूस स्वतःभोवती रक्ताच्या नात्याबरोबरच ‘मानलेल्या’ नात्यांची जुळणी करतो. जन्माबरोबर आलेली ‘रक्ताची नाती’ जपत असतानाच ‘मानलेली’ नाती जोडण्याचा हा व्यवहार कधी-कधी त्याच्या आयुष्यात ‘वादळ’ आणणारा ठरतो. कारण जन्मासोबत येणारी ‘रक्ताची नाती’ ही त्याची ‘चॉईस’ नसते. मात्र तो आपल्या आयुष्यात कोणत्या न कोणत्या टप्प्यावर ‘मानलेली नाती’ तयार करतो.

माणसात आणि प्राणीसमूहात एक मोठा फरक आहे. दोघेही ‘कळप’ करून रहात असले तरी मनुष्यप्राणी हा ‘नात्यांनी’ बांधलेला असतो तर प्राण्यांचा कळप हा ‘नियमांनी’ बांधलेला असतो. प्राण्यामध्ये नर आणि मादी या नात्याव्यतिरिक्त अन्य कुठलेही नाते नसते. असतो तो फक्त निसर्गाने घालून दिलेला एकमेकांवर ‘वर्चस्व’ राखण्याचा नियम. प्राण्यांच्या कळपाचे नियम हे वर्चस्ववादाचे असतात. त्यात भावनेला थारा नसतो. माणसाचं मात्र तसं नसतं. माणूस हा भावनाशील असल्याने समूहाने रहात असला तरी तो वेगवेगळ्या नात्यांच्या बंधनात स्वतःला अडकून घेतच जगत असतो. त्यातच त्याला सुरक्षितता वाटत असते. नात्यांमधून निर्माण होणाऱ्या ‘कर्तव्याची’ जबाबदारी पार पाडण्यातच त्याला आयुष्याची ‘सार्थकता’ मिळाल्याचे समाधान होते. त्यालाच तो ‘प्रपंच’ किंवा ‘संसार’ असं म्हणतो. एकूणच जन्माबरोबर आई, वडील, भाऊ, बहीण अशा रक्ताच्या नात्यांबरोबरच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्याशी जवळीकता साधणाऱ्या समविचारी लोकांशी तो नात्यांची गुंफण घालत असतो. त्यालाच ‘मानलेली’ नाती असं म्हणता येईल. ही मानलेली नाती परोपकारी वृत्तीमधून तयार झालेली असतील तर त्याच्या दृष्टीने काही वेळेस ती रक्ताच्या नात्यांपेक्षाही महत्वाची ठरतात. एकूणच सुखदायी आणि आनंददायी जीवनप्रवासासाठी माणसाला नात्यांची अनिवार्य गरज असते. यामध्ये काही नाती ही भौतिक अर्थाने नफा किंवा फायदा देणारी असतात. तर काही नाती ही जीवन समृद्ध करणारी असतात.

माणूस जसा सौंदर्याचा आणि सुखाचा भोक्ता आहे तसाच तो भावनेचा आधार घेत स्वतःचा हक्क प्रस्थापित करू पाहणारा ‘स्वार्थी’ देखील आहे. निसर्गाने किंवा ही सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्वराने (इथे प्रत्येकाचा परमेश्वर वेगळा असला तरी त्यानेच सृष्टी निर्माण केली ही एकवाक्यता असते.) मनुष्यप्राणी निर्माण करताना त्याला नक्कीच सर्व ‘सद्गुणांनी’ परिपूर्ण केले असले तरी यासर्व सद्गुणांचा ऱ्हास करणारा एक अवगुण त्याने माणसामध्ये अगदी ठासून भरला आहे. तो म्हणजे स्वार्थ. माणसा इतका स्वार्थी प्राणी या संपूर्ण चराचरात शोधूनही सापडणार नाही. त्याचा स्वार्थी गुण हा अमर्याद असा आहे. या स्वार्थापायीच वेळप्रसंगी तो स्वतःभोवती निर्माण केलेल्या ‘नात्यांच्या’ सुरक्षा कवचाला देखील नष्ट करत इतरांना हानी पोहोचवतो. नात्यांमुळे आयुष्यात ‘सुरक्षितता’ मिळवणारा माणूस स्वार्थापोटी, हव्यासापोटी ते नष्ट करू पाहतो. अशावेळी त्याच्या ‘अवती-भवती’ असलेल्या नात्यांनी त्याच्या स्वार्थाला आवर घातला तर कदाचित तो येणाऱ्या अनर्थ प्रसंगापासून दूर राहू शकतो. अर्थात त्याच्या भोवती जर विश्वासाचे वातावरण टिकवून ठेवणारी नाती असतील तरच हे शक्य होते. म्हणूनच विश्वास निर्माण करणारी ‘नाती’ टिकवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असते. भरतीच्या उसळलेल्या लाटांना भेदून तळाशी जाणाऱ्यांच्या नशिबात ‘मोती’ मिळण्याचा योग असतो. कारण मोती किनाऱ्यावर मिळत नाहीत.

स्वार्थापाठोपाठ आणखी एक अवगुण माणसाला चिकटलेला असतो, तो म्हणजे ‘संशय’. अर्थात संशय हा स्वार्थाचा सख्खा भाऊच असतो असं मानायला काहीच हरकत नाही. कारण स्वार्थाची पाठराखण करतच संशय त्याच्या पाठोपाठ माणसाच्या मेंदूत घर करत असतो. स्वतःच्या सुखदायी-आनंददायी आयुष्यासाठी निर्माण केलेल्या नात्यांच्या घट्ट जाळीला छेदण्याचे काम ‘संशय’ करत असतो. एकदा का संशयाने माणसाच्या मेंदूचा ‘ताबा’ घेतला की मग ‘संशय’ आपले काम सुरू करतो. उंदराला जसं दातांची झीज करण्यासाठी सतत कुरतडण्याची क्रिया करावी लागते अन्यथा सेकंदागणिक वाढणारे त्याचे दात त्याचाच जबडा फाडून त्याचा अंत करतील, अशीच भीती ‘संशयाला’ देखील असते. त्यामुळे तो एकदा का माणसाच्या मेंदूत शिरला की तो मेंदू कुरतडण्याचे काम इमानेइतबारे सुरू करतो. इथेच माणसाचा घात होत असतो. कारण माणूस त्याच्याच सुरक्षेसाठी निर्माण केलेल्या अगदी जवळच्या ‘नात्यावर’ आपला संशय व्यक्त करतो. विशेषतः हा संघर्ष रक्ताची नाती आणि मानलेल्या नात्यांमध्ये अगदी अटळ असा असतो. ‘संशय’ हा परावलंबी विषाणू आहे. तो मानलेल्या नात्यांच्या शक्तीच्या जोरावर रक्ताच्या नात्यांशी गृहयुद्ध छेडत असतो. अर्थात या युद्धात मानलेल्या नात्यांचा विजय होत असतो. माणूस रक्ताच्या नात्यापासून ‘विभक्त’ होतो. तेंव्हा हा संघर्ष टाळायचा असेल तर माणसाने ‘संशयाच्या विषाणूचा’ मेंदूत शिरकाव होऊ न देणारी ‘समाधानी’वृत्तीची प्रतिबंधात्मक लस टोचून घेणे आवश्यक असते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

2

)

  1. gosavimanik123

    ✍️✍️☑️☑️💐💐

    Liked by 1 person

  2. Pkmundo

    👋🙏 I started following your blog.
    My only goal is to grow together if you also follow my blog. Interacting in our posts. I hope you don’t mind the message and I look forward to your response. Thank you 🙏💯 🇪🇦

    (https://pkmundo.com/)
    David López Moncada.

    Liked by 1 person