What exactly do we look for in our daily work ? Success…. Reward or Satisfaction…? Because even if we are completing the work that comes in front of us in a very mechanical way even in the rush of daily routine , at the end of the day i.e. when lying in bed at the night, while putting aside the stress of the days work and fatigue, a thought definitely comes to mind….What have we earned today ? We definitely want greater success than this, so what exactly is success ?
आपण रोजच्या कामातून नेमकं काय शोधतो ? यश….मोबदला की समाधान ? कारण रोजच्या, अगदी दिनचर्येतील व्यस्ततेच्या गर्दीतूनही आपण समोर येणारे काम अगदी यांत्रिकी पद्धतीने पूर्ण करीत असलो तरी दिवसाच्या शेवटी म्हणजे रात्री अंथरुणावर पडल्यावर दिवसभराच्या कामाचा ताण, थकवा बाजूला सारताना एक विचार मनात नक्कीच येतो…..आज आपण कमावलं काय ? आपल्याला यापेक्षा नक्कीच मोठं यश हवंय, मग यश म्हणजे नक्की काय ?

भारत हा प्रगतीच्या वाटेवर चाललेला विकसनशील देश आहे. मूठभर धनिकांनी करोडो शिक्षित-अर्धशिक्षित, मध्यमवर्गीय-गरीब, कष्टकरी-शेतमजुरांना कामाला जुंपून देशाच्या अर्थकारणाचा ‘गाडा’ हाकायचा ही इथल्या लोकशाहीची ‘अर्थनीती’ आहे. साहजिकच ज्या देशात आपण राहतो त्या देशाच्या अर्थनीतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या उत्कर्षाची स्वप्ने बघायची आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न करायचे असतात. हे सर्व विस्ताराने सांगण्याचं कारणच हे आहे की, ज्यांची स्वप्नेच मुळात रोजच्या उदरनिर्वाहावर आधारित असतात. त्याची पूर्तता केली की स्वप्नपूर्तीच्या मिळणाऱ्या आनंदाला प्रत्येक भारतीय मिळालेले ‘यश’ समजतो. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जो रोजगार लागतो त्यातच जर स्थिरता नसेल तर त्याची स्वप्नांची मालिका वेगळ्या विषयाकडे वळणार कशी ? म्हणूनच रोजच्या कामातील अडथळे पार करण्याचे स्वप्न बघणे आणि त्याची पूर्तता झाली की त्याला ‘यश’ समजणे एव्हढंच त्याच्या हाती आहे. यशाची यापेक्षा वेगळी व्याख्या असते हे भारतीयांना मान्य होणार नाही. त्यामुळेच रोजच्या कामात ‘यश’ मिळे पर्यंत मेहनत करणे, त्यात कोणतीही कुचराई होवू न देणे अशीच शिकवण प्रत्येक भारतीयाला दिली जाते. चाकोरी बाहेरचे जगणे आणि त्यासाठीचा संघर्ष करीत त्यावर विजय मिळवणे म्हणजे यश हे भारतीयांना मान्य होत नाही. चाकोरी बाहेरच्या जगण्याला भारतीय लोक ‘उनाडक्या’ समजतात.

मुंग्या कशा कुणाचेही मार्गदर्शन नसताना एका रांगेत आपले ‘खाद्य’ शोधायला मार्गस्थ होत असतात. अगदी तसंच नोकरदार मंडळी, कष्टकरी माणूस रोज मुकाटपणे आपला रोजगार शोधायला घरातून बाहेर पडतो. मुंग्यांना आपण ‘आदर्श’ समजतो. त्यांचं एका रांगेत, एकाच गतीने चालण्याला आपण स्वयंशिस्तीचे उदाहरण समजतो. जसं काही मुंग्यांची भाषा, त्यांचं मन आपल्याला समजते. सगळा भंपकपणा…. दुसरं काय ? एकतर मुंग्या रोजगाराच्या शोधार्थ (त्यांच्या दृष्टीने खाद्याच्या शोधार्थ) बाहेर पडतात, हीच समजूत बाळबोध वाटते. सतत चालत राहणे हीच त्यांची प्रकृती आहे. आत्ता मुंग्या आरामखुर्चीत ‘आराम’ करत आहेत किंवा दुपारच्या जेवणानंतर सदाशिव पेठेतील मुंग्या ‘वामकुक्षी’ घेतात असं कधी ऐकलं आहे का ? सतत चालत राहणे हाच त्यांचा जीवनक्रम आहे. त्यामुळे मुंगीचा ‘आदर्श’ डोळ्यासमोर ठेवून ‘प्रयत्नवाद’ सांगणे म्हणजे कोणतेही ध्येय समोर न ठेवता निव्वळ प्रयत्नवादी राहण्याचा सल्ला देण्यासारखेच आहे. समोर उद्दीष्ठ असेल तर ते साध्य करण्यासाठी नक्कीच संघर्ष केला पाहिजे. त्यात यश मिळेल किंवा अपयश ! त्याची पर्वा न करता संघर्ष हा केलाच पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिले स्वप्न असे पाहिले पाहिजे जे आयुष्याचे उद्दीष्ठ होईल. मग त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठीचा संघर्ष हा तुम्हाला यश म्हणजेच समाधानाची फलप्राप्ती नक्कीच देईल. चाकोरी बाहेर जगण्याची स्वप्ने पाहणाराच ‘विकसित’ देशाचा नागरिक समजल्या जातो. इथे रोजच्या जगण्यातील अडथळे पार करण्यात आयुष्य खर्ची पडते. आत्ताशी कुठं आपण चांद्रमोहिम फत्ते केली आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे लागलेलं आहे. भारतीयांच्या संस्कृतीचे अनुकरण करण्याची पाश्चात्यांची ‘फॅशन’ बनू लागली आहे. अशा टप्प्यावर भारतीयांची ‘यश’ म्हणजे मोबदला हे समीकरण सुरू आहे. मग चंद्रावर पोहचून आपण मोबदला काय मिळवला ? स्वप्ने बदलण्याचे उद्दीष्ठ ठेवले तर हे शक्य आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा