It is said that man is a statue of mistakes. Just as trying to do something is natural,’right and wrong’ are also natural. This is called ‘life’. Nobel prize winning French dramatist, novelist, essayist and mystic author Romain Rolland, while commenting on the life debate, said that a person makes mistakes, that is his life but loving is not a mistake. It is appropriate to present the philosophy of the French dramatist here only because the father of bharat (india) Mahatma Gandhi and Ravindranath Tagore were influenced by Romain Rolland. He has used the word ‘love’ in the sense of humanism. That’s all.
माणूस हा चुकांचा पुतळा आहे असं म्हणतात. काहीतरी करू पाहणे जसं नैसर्गिक आहे अगदी तसंच ‘बरोबर आणि चूक’ हे देखील नैसर्गिक आहे. यालाच ‘जीवन’ असे म्हणतात. नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच नाटककार, कादंबरीकार, निबंधकार आणि गुढवादी लेखक रोमेन रोलँड यांनी जीवन वादावर भाष्य करताना म्हंटले आहे की, “एखादी व्यक्ती चूक करते, त्याचं ते आयुष्य आहे. पण ‘प्रेम’ करणं ही चूक नाही”. फ्रेंच नाटककाराची फिलॉसॉफी इथं मांडणं उचित एव्हढ्यासाठीच आहे की, भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यावर रोमेन रोलँडचा प्रभाव होता. त्याने ‘प्रेम’ हा शब्द मानवतावाद या अर्थाने वापरला आहे. एव्हढंच.

भारतीय लोकांच्या आणि फ्रेंच लोकांच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात थोडंफार साम्य आहे. त्यांच्याकडे देखील आपल्या सारखीच अमरत्व मिळविण्यासाठी ‘मरावे परी किर्तीरूपे उरावे’ या आशयाची विचारसरणी मांडली जाते. तुम्ही मृत पावल्यानंतरही पुढे जोपर्यंत या पृथ्वीवर माणूस जिवंत आहे तोपर्यंत तुमचे नाव कायम राहील असं काहीतरी कार्य तुमच्या हातून घडावे हाच संस्कार भारतीयांवर केला जातो. आपल्या पुराणकाळापासून वर्तमानापर्यंत इतिहास चाळून बघितला तर आपल्याला अशी अनेक उदाहरणे सापडतील. म्हणूनच भारतीय इतिहास हा शौर्य, जाज्वल्य राष्ट्रभक्ती, समर्पित भावनेने ओथंबलेला ‘ग्रंथ’ आहे. एखाद्या वाण्याच्या दुकानातील नफा-नुकसानीचा ताळेबंद मांडणारी ‘चोपडी’ नाही.

आजकाल मात्र भारतीय पुराण आणि इतिहासाची मोडतोड करीत आपलेच विकृत विचार लोकांच्या माथी थोपविण्याचे प्रकार वाढले आहेत. अगोदर केवळ राजकीय हेतूने प्रेरित होवून असे जहरी विचार समाजात पेरले जात असावेत असा बुद्धिवाद्यांचा दावा होता. मात्र ह्या विषारी विचारांचा ‘वेग’ पाहता ‘सत्यालाच’ गाडून ‘असत्याचा’ इतिहास नव्याने प्रखरतेने मांडण्याचा खटाटोप सुरू असल्याची शंका येतेय. जातीय, धार्मिक आणि प्रांतीय भावनांना उत्तेजित करत एखाद्या संख्येने दुर्बल असणाऱ्या समाजावर विविध माध्यमातून हल्लाबोल करीत समाजस्वास्थ्य दूषित करायचे हा उद्योग सोशल मीडियाच्या माध्यमातून राजरोसपणे सुरू आहे. अशावेळी जो तो आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी नवे वाद निर्माण करण्यात पुढाकार घेताना दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्षांचे प्रवक्ते तर प्रकांड पंडित असल्याच्या अविर्भावात रोज इतिहासातील तात्कालिक संघर्षाचे दाखले देत समाजातील संख्येने दुर्बल असणाऱ्या घटकाला बळीचा बकरा बनवताना दिसत आहेत. ही अशांततेची अवस्था फ्रेंचांनी देखील अनुभवली आहे. भारतीय राज्यघटना तयार करताना देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटनासमितीतील सदस्यांनी फ्रेंच राज्यघटनेचा अभ्यास केला होता. जेंव्हा आपल्या जवळचे ‘सत्य’ निस्तेज पडू लागते तेंव्हा समोरच्याचे ‘सत्य’ आधारभूत ठरू शकते म्हणूनच इथे फ्रेंच तत्त्ववेत्ता रोमेन रोलँडची फिलॉसॉफी आधार म्हणून घेतलीय. रोमेन रोलँडच्या मते, सत्याचा शोध न घेण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करणे अशक्य आहे. परंतु अशी माणसे आधीपासून चर्चेत आहेत. सध्या आपल्याकडे नेमकं हेच सुरू आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा