Who is the ‘happiest’ person in the world…? One who has a lot of wealth, inherited property worth crores from ancestors. An army of servants ‘Surrounds’ him to give him whatever he asks for. One who regularly gives charity to the beggar who comes to the door, can such a person be called the ‘happiest’ person in the world…? On the otherhand, he has to work to provide two meals a day. He has to do all the work him self . He has to dream to get small things. But even in such adverse situation he always has a ‘Smile’ on his face, which he inherited from his mother. Now tell me who is the ‘happiest’ person in the world…?
जगातील सर्वाधिक ‘आनंदी’ व्यक्ती कुणाला म्हणायचं..? ज्याच्याकडे खूप धन-दौलत आहे. पूर्वजांची वारसाहक्काने आलेली कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे. तो जे मागेल ते त्याला देण्यासाठी नोकर-चाकरांचा फौजफाटा त्याच्या ‘अवतीभवती’ आहे. जो नियमितपणे दारात येणाऱ्या भिकाऱ्याला दानधर्म करतो. अशा व्यक्तीला जगातील सर्वाधिक आनंदी व्यक्ती म्हणायचं का ..? तर दुसरीकडे ज्याला दोनवेळेच्या खाण्याची सोय करण्यासाठी त्याला राबावं लागतं. सगळी कामं त्याला स्वतःच करावी लागतात. त्याला छोट्या छोट्या गोष्टी मिळविण्यासाठी स्वप्ने पहावी लागतात. पण अशा विपरीत स्थितीतही त्याच्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असते. जे त्याला त्याच्या आईकडून वारसा म्हणून मिळालेले असते. आता सांगा, जगातील सर्वाधिक ‘आनंदी’ व्यक्ती कुणाला म्हणायचं…?

लहानपणी आपले नाक धारदार का नाही ? यावरून मी खूप दुःखी रहायचो. माझ्या वर्गातले सर्व धारदार नाकाची मुले मला चिडवायची. कित्येकदा शाळा सुटल्यावर रडत-रडत मी एकटाच घरी यायचो. माझी आई मात्र माझीच समजूत घालायची. ‘कोण काय बोलतं याकडे आपण फारसं लक्ष द्यायचं नसतं, हाथी चले बाजार…कुत्ते भोंके हजार’ असं ती कायम मला सांगायची. तिची तटस्थ वृत्ती आणि सोशिकता अंगी अगदी वारसा पद्धतीने आल्याने ती गेल्यानंतर आता मला त्याचा खूप फायदा देखील होतो. सामान्य जीवन जगताना खरंच तुमच्या सुंदर असण्याचा काहीच फायदा होत नसतो. जॉब मिळवताना तुम्ही सुंदर, उठावदार आहात म्हणून तुमचं ‘सिलेक्शन’ होवू शकते. पण जॉब टिकवण्यासाठी जो कामातला स्मार्टनेस लागतो, तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नुसतेच सुंदर असण्याचा काहीही फायदा होत नाही. हे मी अनुभवले देखील आहे. सोशिकतेचं म्हणाल तर आता निवृत्तीकडे झुकणाऱ्या वयापर्यंत खासगी क्षेत्रात केलेली नोकरी हा माझ्या सोशिकतेचा परमोच्च बिंदू असल्याचे मी समजतो. अगदी कडीपत्ताच्या फुलोऱ्या सारखं माझं सौंदर्य आहे. कडीपत्याचा फुलोरा आकर्षक आणि सुगंधी मुळीच नसतो…कडीपत्ताची पाने स्वयंपाकात उपयोगी असली तरी त्याचा फुलोरा आणि बियांचा असा कोणता उपयोग होतो याबद्दल फारशी शास्त्रोक्त माहिती नाही. पण निसर्गाची कृपा म्हणून कदाचित त्याचं देखील काही काळाचं अस्तित्व असावं. शेवटी प्रत्येकाच्या सुंदरतेच्या कल्पना आणि उपयोगीत्व वेगवेगळे आहे. आपल्याला होणारा ‘आनंद’ हा इतरांना होणाऱ्या आनंदापेक्षा कदाचित महत्वाचा नसेलही पण इतरांच्या जगण्याशी आपण त्याचा संबंध का जोडायचा…?

माझ्या आईचं लग्नाआधीचं नाव ‘पुष्पा’ होतं तर लग्नानंतरचे नाव ‘मधुवंती’ दोन्ही नावे तिच्या दिसण्याच्या अगदीच विरोधात होती. मी तिला कायम गंमतीने म्हणायचो, आई तुझ्या दिसण्यात आणि नावात पण प्रॉब्लेमच आहे. तेंव्हा ती म्हणायची, दिसण्यात डावं मूल जन्माला आलं की त्याचं असणं सुंदर व्हावं म्हणून सुंदरतेचं प्रतीक असणारी नावे दिली जायची. मी तर नकोशीच अन लग्नानंतर त्यांनी नाव बदललं. नकोशीचं प्रभावहीन जगणं आपल्या सोशिकतेच्या स्मितहास्याने सहजतेने उधळणारी माझी आई तिच्या जाण्यानंतर माझ्यात उरली ती अशी. हे सगळं व्यक्तिगत मी तुम्हाला का सांगतोय ? तर अस्तित्वातलं मोठेपण हे कधी सुंदरतेनं मापायचं नसतं. अन्यथा माणूस जवळ असेपर्यंत त्याची खरी सुंदरता अन त्याच्या सहवासातून मिळणारा आनंद आपल्याला मनमुराद घेताच येत नाही.

आपल्या आयुष्याचे किंवा आपल्या जगण्याचे सरळ-सरळ दोन विभाग करून टाकावेत. म्हणजे आपलं जगणं मापायला सोपं जातं. एक विभाग म्हणजे आपलं घरातलं जगणं आणि दुसरं म्हणजे आपलं घराबाहेरचं जगणं. घरात जसं आनंदी आणि एकोप्याचे वातावरण आपल्याला हवं असतं अगदी तसंच वातावरण आपल्याला घराबाहेरच्या दुसऱ्या विभागात मिळालं तर आपण स्वतःला कायम आनंदी ठेवणारे भाग्यवान समजायला काहीच हरकत नाही. घरात जशी आपल्याला सकारात्मक ऊर्जा कायम असावी असं वाटतं अगदी असंच वातावरण आपल्याला घराबाहेरच्या जगात हवं असतं. घरात आपल्याला तळहातावर झेलणारी आपली माणसं आपल्या ‘अवतीभवती’ असतात. त्यांच्यादृष्टीने आपण घरातील कर्ता असतो. आपल्यावर अवलंबित्व असल्याने कदाचित ते अधिक ममत्वाने काळजी घेत असतात. पण घराबाहेरच्या जगात असं वातावरण मिळणं अगदीच मुश्किल असतं. बाहेरच्या जगात एकच नातं तुमची काळजी घेणारं असतं ते म्हणजे मैत्रीचं नातं. त्यामुळे तुमची असलेली मैत्री हीच घराबाहेरच्या जगात तुमची ‘ताकद’ बनलेली असते. तुम्ही कुणाशी मैत्री करावी हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. वेव्हलेंथ जुळली, ट्युनिंग जमलं की मैत्री आपोआप होते. त्यासाठी त्याची जातपात, धर्म, वर्ण, कुळ, गोत्र, शाकाहारी की मांसाहारी कशाचाही संबंध गरजेचा नसतो. फक्त मैत्रीही पवित्र आणि आनंददायी असावी अशी दोघांचीही उत्कट भावना असावी लागते. म्हणूनच आयुष्यभरात हजारो लोकांच्या सानिध्यात आपण कोणत्या न कोणत्या कारणाने येत असलो तरी जिवलग म्हणून चार मित्रांच्यावर आपली कधीच मजल जात नसते. मोबाईलच्या फोनबुकमध्ये सेव्ह असलेले हजारो जण थोडीच आपले मित्र असतात…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा