वृत्तपत्रीय जाहिरात विभागाचे काम म्हणजे ‘अडथळ्यांची’ शर्यत.. !

On the one hand, while the newspaper business is highly competitive, the advertising sector, which is seen as the main source of income for newspapers, has also become extremely volatile and working in the advertising department with the pace of advertising, creativity and the ever-changing flow of media is an invitation to daily ‘stress’ and ‘volatility’ has been. A runner who practices hurdles on the same track everyday has the ‘hurdles’ in front of him. But what about unexpected obstacles ? The one who overcomes it today will be seen at work tomorrow. We are doing this much deadly competition only because of ‘mistakes’ happening around us unconsciously.

एकीकडे वृत्तपत्र व्यवसायात कमालीची स्पर्धा वाढलेली असतानाच वृत्तपत्रांचे उत्पन्नाचे स्रोत म्हणून ज्या जाहिरात क्षेत्राकडे बघितले जाते ते क्षेत्र देखील कमालीचे अस्थिर झाले असून जाहिरातींचा वेग, कल्पकता आणि माध्यमांचे सतत बदलते प्रवाह यामध्ये जाहिरात विभागात काम करणे म्हणजे रोजच्या तणावाला आणि अस्थिरतेला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. रोज एकाच धावपट्टीवर सराव करणाऱ्या धावपटूला त्यातील ‘अडथळे’ तोंडपाठ असतात. पण अनपेक्षितपणे येणाऱ्या अडथळ्यांचे काय ? आज त्यावर मात करणाराच उद्या कामावर दिसतो. ही एव्हढी जीवघेणी स्पर्धा आपणच आपल्याभोवती केवळ नकळतपणे होणाऱ्या ‘चुकांमुळे’ करत असतो.

सुरुवातीलाच स्पष्ट करतो की बावीस-तेवीस वर्षांचा संपादकीय विभागातील कामाचा अनुभव घेतल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून एक प्रतिथयश वृत्तपत्र समूहाशी फ्रिलान्स कंटेंट रायटर म्हणून कमर्शियल आर्टिकल्स लिहिण्यासाठी जोडल्या गेल्याने वृत्तपत्रक्षेत्रातील जाहिरात विभागातील रोजच्या अडथळ्यांशी मैत्री करता आली. त्यामुळे माझे म्हणणे कदाचित तुम्हाला ‘शैक्षणिक पाठ्यपुस्तकाला’ छेद देणारे वाटू शकते. पण मला येणारा अनुभव मी मांडतोय. तर मूळ विषयाकडे येवू, आपल्या उत्पादनाची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून जाहिरात देण्यासाठी वर्तमानपत्राकडे धाव घेणाऱ्या जाहिरातदाराचा जमाना आता संपलाय. पारंपारिक पद्धतीने व्यवसायाची जाहिरात करण्याचे दिवस संपले…हे म्हणत असताना वृत्तपत्रांची वाढती संख्या, त्यामानाने वाचकांची घटती संख्या, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट, वाढते जाहिरात दर अशा सर्व विषयांवर यथेच्छ ताव मारत बोलतो, पण खरा, जाहिरातदार कितीवेळा ओळखतो ? हाच आज या क्षेत्रातील संघर्षाचा ‘कळीचा’ मुद्दा आहे. जाहिरात क्षेत्रात विविध माध्यमांचा प्रभावीपणे प्रवेश होणे हे बाजाराच्या मागणीप्रमाणे अपेक्षित आणि नैसर्गिक आहे. त्यामुळे त्याविषयी ओरड करत बसण्यापेक्षा गर्दीतूनही शामियानाचा कळस कापून आणणारा संताजी घोरपडे किती जणांना व्हायचं ? यावर तुमचं यश अवलंबून असते. त्यासाठी राहुट्यांच्या गर्दीतील बादशहाचा शामियाना ओळखता आला पाहिजे. जाहिरातदाराच्या मुखवट्या मागचा त्याची नेमकी गरज व्यक्त करणारा चेहरा आपल्याला वाचता आला पाहिजे. तरच तो त्याच्या गरजेची पूर्तता म्हणून तुम्हालाच जाहिरात देण्यासाठी तयार होईल.

बऱ्याचवेळा कल्पकतेचा भडीमार करताना जाहिरात अधिक आकर्षक करण्याच्या नादात ती अधिक क्लिष्ट आणि बटबटीत स्वरूपाची होवून बसते. चार ओळींच्या आकर्षक ‘कॅच लाईन’ मधून जाहिरातीचे प्रयोजन स्पष्ट झाले तरच वाचकांना जाहिरात कळेल. केवळ लक्षवेधक सजावट आणि मांडणीने केवळ जाहिरातदार संतुष्ट होवू शकतो पण त्याला प्रतिसाद देणाऱ्या वाचकांच्या हृदयाला जर ती जाहिरात भिडणार नसेल तर ती जाहिरात प्रतिसादशून्य होते. याचा परिणाम जाहिरातदार वर्गावर देखील होतो. याबरोबरच वर्तमानपत्रांच्या बाजारातील प्रतिष्ठेला देखील धक्का बसू शकतो. जेंव्हा ‘कन्सेप्ट सेलिंग’ करताना विशेषतः जाहिरातदाराला कन्सेप्टशी निगडीतच राहण्याचा मुद्दा हा पटवून द्यावा लागतो. अन्यथा तो तुमच्या कन्सेप्टची मोडतोड करीत स्वतःचे आग्रही मत घुसडायला सुरुवात करतो. शेवटी जाहिरातदार हा जाहिरातीसाठी पैसे मोजतोय या व्यावहारिक भावानेपोटी आपण त्याच्या आधीन होतो. शेवटी परिणामकारक जाहिरातींचा प्रतिसाद मिळावा ही दोघांचीही प्रामाणिक इच्छा असते. पण कन्सेप्ट सेलिंग करताना बऱ्याचवेळा जाहिरातदार हातून निसटेल या भीतीपोटी जाहिरात प्रतिनिधी ‘कन्सेप्ट’ची तपशीलवार माहिती जाहिरातदाराला द्यायचे टाळतो. इथेच जाहिरातदारांमध्ये अविश्वास निर्माण होण्याचा दाट संभव असतो. जर जाहिरातदार बाहेरून एजन्सी मार्फत जाहिरात बनवून घेणार असेल तर संबंधित एजन्सीला ‘कन्सेप्ट’ तपशीलवार समजून सांगा. यात टाळाटाळ झाली तर त्याचा परिणाम हा कन्सेप्ट सेलिंगवर होतो. वृत्तपत्राची एक स्वतंत्र टीम अपडेट्स विचारात घेत अभ्यासपूर्ण पद्धतीने ‘कन्सेप्ट’ तयार करत असते. केवळ टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात चुकीच्या पद्धतीने जर कन्सेप्ट सेलिंग केले तर त्याचा व्यवसायावर परिणाम होतो.

जाहिरातीची तंत्र बदलत चालली तशी व्यवस्थापनाने देखील आपली ‘टूल किट्स’ बदलली आहेत. कन्सेप्ट सेलिंगच्या जमान्यात जाहिरात व्यवस्थापन चांगल्या आणि हमखास आकर्षित करणाऱ्या ‘कन्सेप्ट’ तयार करणारी टीम आपल्यासोबत ठेवू लागली आहे. या क्षेत्रात रोज नवी आव्हाने अंगावर घेवून ती लीलया पेलणारे ‘सोल्जर’च टिकू शकतात. मात्र हे म्हणावं तितके अवघड पण नसते. फक्त अलर्ट असणे कायम आवश्यक असते. मुळात जाहिरात मागायला चाललो म्हणजे चार घरी ‘शिधा’ मागायला चाललोय हा तुमचा अविर्भाव असेल तर अशा तरुणांनी या क्षेत्रात येवून अपयशाचा शिक्का माथी मारून घेवू नये. शेवटी समुद्र मंथनातूनच ‘अमृत’ आणि ‘जहर’ निघाले होते. तुमच्या ओठाला काय लावायचं ? हाच तर खरा ‘टास्क’ असतो. काहीच जमलं नाही म्हणून वृत्तपत्र क्षेत्रात ते देखील जाहिरात विभागात नोकरीला आलो ही अपराधी भावना घेऊन इथे काम करण्याची मानसिकता तयार होवू शकत नाही. सगळ्यात शेवटी वाचल्याशिवाय लक्षात रहात नाही आणि विश्वासही बसत नाही हीच भारतीय जनभावना आहे. त्यामुळे वृत्तपत्रांचा काळ संपला ही हाकाटी म्हणजे अर्धवटपणाचा कांगावा असतो. कितीही तंत्र वेगवान झाले तरी जाहिरात वाचनीय असेल तरच प्रतिसाद मिळतो आणि हे फक्त वर्तमानपत्रातूनच शक्य आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)